मनासारखं घडलं नाही तर अशावेळी काय करावं !!
मिनल वरपे
श्वेता आई-वडिलांची एकुलती एक मुलगी. जन्मल्यापासून तिचे खूप लाड झालेले. शाळेत असताना शारीरिक आजारामुळे अचानक तिचे वडील गेले. वडील खाजगी कंपनीत काम करत होते. त्यामुळे त्यांच्या निधनानंतर कोणत्याही प्रकारची पेन्शन त्यांना मिळाली नाही. पण आतापर्यंत आपल्या मुलीच्या डोळ्यात कधीच पाणी येणार नाही आणि पुढे सुद्धा तिला कोणत्याही गोष्टीची कमी नको, तिला वडिलांची कमी पडू द्यायची नाही, हाच विचार सामोर ठेऊन मिळेल ते काम करून श्वेताच्या आईने श्वेताचे पूर्ण लाड पुरविले.
तिला जे हवंय ते सर्व तिची आई तिला द्यायची. स्वतः शिकलेली नसून सुद्धा मुलीला चांगलं शिक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न तिने केला. श्वेताचे शिक्षण, तिचे कपडे, तिला आवडेल तसेच जेवण, श्वेता जे बोलेल तसेच करणे अशी सवय तिच्या आईला झाली.
मी मागेल ते मला मिळते अशी सवय श्वेताला झाल्यामुळे कोणत्याही वेळी नकार ऐकण्याची सवय श्वेताला अजिबात नव्हती. आईने केलेल्या कष्टाची जाणीव सुद्धा तिला राहिली नव्हती आणि वडिलांची कमतरता भासू नये म्हणून सर्व लाड पुरवण्याची, मुलीच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून तिच्या प्रत्येक गोष्टीला होकार देण्याची सवय तिच्या आईला झालेली.
अशा लाडावलेल्या मानसिकतेत श्वेता लग्न करून माहेरी जाते. लग्नानंतर सासू-सासरे, नणंद, नवरा आणि श्वेता अशा पाच व्यक्तींचं कुटुंब श्वेताला लाभलं. सासरची माणसं साधी होती. मध्यमवर्गीय असल्यामुळे श्वेता जे मागेल ते तिला देता येत नव्हतं. शिवाय श्वेताच्या स्वभावाची सवय जशी तिच्या आईला होती, तसं सासरी मात्र अजिबात नव्हतं.
जे आहे ते तसंच स्वीकारावं असं त्यांना श्वेताकडून अपेक्षित होतं, पण श्वेताच्या अपेक्षा पूर्ण होत नव्हत्या. तिच्या मनासारखं घडलं नाही कि श्वेताची चिडचिड सुरु व्हायची. ती तिच्या अपेक्षा पूर्ण होण्यासाठी खूप हट्टीपणा करायची आणि याचा त्रास तिला स्वतःला व्हायचा आणि तिच्या सासरी सुद्धा.
हि झाली श्वेताची कहाणी. तिच्या या प्रवासातून तिची मानसिक, बौद्धिक जडणघडण कशी होत गेली हे आपण पाहिलं. तसेच श्वेताने आत्ताच तिची मानसिकता पारखून वागण्यात, बोलण्यात आणि विचार करण्याच्या शैलीत तार्किकता आणायला हवी.
जेव्हा आपल्या मनासारखं घडत नाही, तेव्हा आपल्यामध्ये पुढील गोष्टी प्रकर्षाने आढळतात.
- चिडचिड होणे, नाराजी येणे, समजून घेण्याची क्षमता कमी होणे.
- संताप येणे, स्वतः नाराज होऊन दुसऱ्यांना त्रास देणे.
- मनातला राग आतल्या आत वाढत जाणे आणि मानसिक त्रास होणे.
- अपेक्षा वाढणे आणि त्या पूर्ण झाल्या नाही कि जास्त संताप होणे.
- मनातील राग आपल्या आजूबाजूच्या व्यक्तींवर काढणे.
- शांत झोप न लागणे.
वरील हि लक्षणे आपल्याला कायमस्वरूपी टाळता तर येणार नाहीत. ती प्रत्येकात कमी-अधिक प्रमाणात असतात. केवळ त्या लक्षणांची जर अतिशयोक्ती होत असल्यास जास्तीत जास्त समोर येणारे प्रसंग स्वीकारून योग्य रीतीने ते हाताळता यायला हवेत. कोणतीही सवय अचानक जडत नाही तर हळूहळू सुरुवात करावी लागते. त्यामुळे आपल्या मनाची तयारी करायची कि आलेली परिस्थिती मी स्वीकारणार.
जसा श्वेताचा स्वभाव आपण अनुभवला अगदी तशाच गोष्टी आपण सुद्धा इतरत्र करत असतो. जसं कि, आज जेवणात श्रीखंड पुरी पाहिजे, असं मनात आलं, पण ते न मिळाल्याने चिडचिड करणे, दोघांनी फिरायला जायचं ठरवलेलं असतं, पण नवरा उशिरा आला आणि फिरायचं रद्द झालं. त्यामुळे रागावून बसणे, वाद घालणे, आणि यासारख्या लहान-सहान तक्रारीतून आपला एक स्वभाव बनत जातो.
आणि अशा स्वभावाचा आपल्या आजूबाजूच्या म्हणजेच कुटुंबातील व्यक्ती, कार्यालयातील सहकारी या सर्वांना त्रास होतो, अर्थात आपल्याला सुद्धा.
समोर जे आहे तसं स्वीकारलं तर आपण कुठेही सहज जुळवून घेतो आणि आपला त्रास कोणालाच होत नाही. जेव्हा आपण समाधानी असतो. तेव्हा आपण दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो. यामुळे आपल्याला कोणताच मानसिक त्रास होत नाही.
म्हणून यापुढे आपण जशी परिस्थिती आहे अगदी तशीच स्वीकारून स्वतः आनंदी राहून दुसऱ्यांना सुद्धा आनंदी ठेवायचा प्रयत्न नक्की करूयात.


