Skip to content

पत्नी ही पतीला साथ देतेच, पण पतींचं काय ???

समृद्ध सहजीवन- सुदृढ समाज रचनेचा पाया !


सौ. सुचिता ज्ञानेश्वर पेंसलवार


बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो !

असा सुंदर भारत करायचा असेल तर ….काही गोष्टी जाणीवपूर्वक समजून घेऊन त्यात मूलभूत बदल करणे आवश्यक आहे .देश बनतो तो समाजापासून आणि समाज म्हणजे कुटुंबांचा समूह …असे साधारणतः आपण म्हणू शकतो.

कुटुंबातील सर्वात महत्त्वाचे आधारस्तंभ म्हणजे पती-पत्नी तेव्हा घराघरातील पती-पत्नी यांचे परस्परसंबंध,सौहार्द्रता, दृष्टिकोन , जीवन मूल्य, विचारधारा अशा अनेक गोष्टींनी मिळून कुटुंब व त्यांच्या समुह रूपाने सामाजिक दर्शन होत असते,परीणामी यामुळे समृद्ध सहजीवन हाच मूलतः सुदृढ समाजरचनेचा पाया आहे हे सिद्ध होते.

आपण प्रत्येक कुटुंबातील सहजीवन कसे समृद्ध होईल याकडे लक्ष देणे हे कुटुंब, समाज परिणामतः देश या सर्वांसाठीच आवश्यक आहे, हे जाणून प्रयत्न करणे गरजेचे झाले आहे .

भारत हा पुरुषप्रधान संस्कृतीचा देश आहे असे म्हटले जाते परंतु प्राचीन काळापासून पाहिले तर , आदिम संस्कृतीतही स्री चा सन्मान दिसतो , स्री शक्ती स्वरूपिणी म्हणून आदिशक्ती रूपात पूजन करून स्वीकारलेले दिसते .

निसर्गाने स्री ला मातृत्व ,वात्सल्य, संगोपन ,पाककला,गृहव्यवस्था कौशल्य अशा अनेकानेक गुणांनी युक्त निर्मिले आहे हे सारे ती पुरुषापेक्षा अधिक संवेदनशीलतेने,निपुणतेने करु शकते तर पुरुष हा शिकार, सरपण ,पुढे शेती अशी बाहेरची कामे करण्यास पुरेसा बलवान असल्यामुळे विचारपुर्वक त्यांनी नैसर्गिकरीत्या स्वभाव व शरीर अनुसार आपली आपली कामे स्वीकारली.लिंग भेदाभेद केला नाही हे विशेष !

आजही काही संस्कृतीत लग्नानंतर पुरुष हा पत्नीच्या घरी नांदायला जातो ही उदाहरणे स्त्रीप्रधान संस्कृतीची झलक दाखवितात, स्त्रीप्रधान किंवा पुरुषप्रधान संस्कृती यात खरे तर दोन्ही पेक्षा दोघांची प्रगती कुटुंबाची उन्नती असा संतुलित विचार रास्त राहिल.

कुटुंबातील सदस्यांमध्ये सुसंवाद,एकोपा,विश्वास, मोकळेपणा ,व्यक्तिस्वातंत्र्य ,स्नेह प्रेम ,ऋजुता ,एकमेकांना समजून घेऊन परस्पर प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत करणे , साथ देणे ,आदर करणे हे खरे समृद्ध सहजीवन आहे .

स्वामी विवेकानंद म्हणतात की, “स्त्री व पुरुष हे समाज पक्षी चे दोन पंख आहेत यातील एक जरी पंख सक्षम नसेल तरी हा समाज पक्षी उडू शकत नाही” या स्वामीजींच्या विचारातून दोघेही समान महत्वाचे घटक आहेत हेच दर्शविले जाते .

आपल्या देशात स्री तर नेहमीच साथ देते परंतू पुरूषांनी सुद्धा स्री ला साथ दिल्याची अनेक सुंदर ऊदाहरणे आहेत…

देश पर चक्रात असताना जिजाबाईं नी अतिशय धैर्याने आपल्या पुत्रांना शूरवीर संस्कारी घडविले ,पती शहाजीराजे दूर मुलुखावर असताना जिजाबाईंनी मुलांच्या जडनघडनीत तसूभरही कमी पडू दिले नाही ,स्वराज्याची ज्योत मुलांच्या मनात पेटवली व तशीच तालीम देऊन त्यांना घडविले, शिवाजीराजां नी मातेचे स्वराज्याचे स्वप्न साक्षात साकार केले!

तसेच महात्मा ज्योतिबा फुले खंबीरपणे सावित्रीबाई यांच्या पाठीशी उभे राहिले आणि परचक्राच्या भीतीने स्वसंरक्षणार्थ स्री घरात राहिली यामुळे ज्ञानापासून हि वंचित राहिली , क्रांतीज्योती ने पुन्हा ज्ञानाचे दरवाजे उघडले गेले ते केवळ ज्योतिबा व सावित्री यांच्या समृद्ध सहजिवन मुळेच !

आजहि हे दांपत्य उदात्त हेतूने परस्परपूरक कार्य करून समाजास प्रेरणा देत आहे. भारतातील पहिली महिला डाॕक्टर म्हणजे डॉक्टर आनंदीबाई जोशी ! यांचे उदाहरण सुद्धा ऐतिहासिक आहे देश पारतंत्र्यात असताना त्यावेळी गोपाळ रावांनी स्वतः समाज दूषणे,आर्थिक विवंचना ई.

असे सारे सोसून एकट्या स्त्रीस परदेशी डॉक्टर होण्यास पाठविले व त्यांना खंबीर साथ दिली ,सतत प्रोत्साहन दिले त्या कर्मठ काळी हे काम मुळीच सोपे नव्हते,परंतू समृद्ध सहजिवनाने अशक्य ते शक्य करून दाखविले !

अहिल्याबाई होळकर यांना त्यांचे सासरे *मल्हारराव* होळकरांनी सती जाण्यापासून परावृत्त केले व राज्याची सारी धुरा सांभाळण्यास भक्कम पाठिंबा दिला !

राणी लक्ष्मीबाई यांचे पेशवे नी गुण हेरले व *तात्या टोपे* यांनी पैलू पाडले युद्ध कुशल घडविले !

वैदिक काळातही तत्व चर्चेत महान विदुषी अशा गार्गी ,मैत्रेयी,सुलभा चुडाला या ब्रम्हवादिनी सहभाग घेत, यांची उपस्थिती सभागृहात सक्रीय व सन्माननीय असे !

इंद्रपत्नी इंद्राणी हिला स्रीमुक्तीची आद्य प्रणेती मानले जाते, महिलांमधिल आत्मसन्मान तीने जागृत केला,समाज व राष्ट्राचे रक्षणासाठी स्रीयांना ऊद्युक्त केले.शबरी हि आश्रमाची व्यवस्थापक होती.

अनुसया समाजकार्य करीत ,दुष्काळग्रस्त आधार व मार्गदर्शन साठी येत असत. मेगॕस्थेनीस ने लिहिले की,चाणक्य च्या अंगरक्षक या महिला होत्या.

रावण सीतेला संबोधताना तिचा ऊल्लेख पंडिता असा करीत.
द्रौपदी राज्यातील सर्व हिशोब आय व्यय बघत असे!
आदि शंकराचार्य यांना तत्व चर्चेत वादविवादात मंडनमिश्रा यांच्या पत्नी ऊभया भारती कडून हार स्वीकारावी लागली असा उल्लेख आहे!
युद्धात कैकयी ने दशरथ राजाचे प्राण वाचविले होते त्याचेच बक्षीस म्हणून दोन वचन राजाने दिले होते यातून कैकयी एक कुशल योद्धा होती हे कळते !

सत्यभामा युद्धात तरबेज आहे हे जाणून ती *श्रीकृष्ण* सोबत युद्धात जात असे !

अशी कितीतरी उदाहरणे प्राचीन काळापासून आजपर्यंत पाहायला मिळतात …हे सांगायचे कारण म्हणजे भारतात पूर्वापार स्त्री चा सन्मान आहे तीला समान सर्वाधिकार होते,अगदी प्रत्येक क्षेत्रात हे च वरील ऊदाहरणातून सिद्ध होते .

आताचे श्री.सौ.बाबा आमटे, श्री.सौ. प्रकाश आमटे ,डाॕ.अभय व राणी बंग , नारायण व सुधा मुर्ती किती सांगाव यांच समृद्ध जिवन सुदृढ समाज साठी अगदी आदर्शवत !!

स्त्री तर नेहमीच पुरुषाच्या मागे उभी असते हे आपण नेहमीच पाहतो , तरी विशेषतः उदाहरण म्हणून आपले सैनिक जवान व यांच्या पत्नी व वीर माता यांचे योगदान अतुलनीय आहे पती वा मुलाला जेव्हा वीर मरण येते तेव्हा ती न डगमगता स्वतः जॉईन होते , कधी आई आपल्या बाकीच्या मुलांना देशसेवेत पाठविते , खरच या विरांगणा त्यांचा त्यागबलिदान यांचे शब्दात कैसे वर्णन करावे ?

अशी अतिशय थोर संस्कृती असलेल्या देशातील आपण नागरिक आहोत याचा अभिमान तर आहे पण तो आचरणातून दाखविला तर सोने पे सुहागा !

वर काही उदाहरणे दिलीत कारण पुरुषप्रधान संस्कृती भारतात एकमेव आहे असेही नाही तर येथे स्त्री सन्मानाची सुध्दा परंपरा आहे ते ध्यानात घ्यावे म्हणून ही उदाहरणे दिलीत, पुरुषांनी स्त्री ला आणी स्रीयांनी सुद्धा पुरूषांना सपोर्ट केल्याची उदाहरणेही दिलेली आहेत….

परंतु समाजात चांगले व वाईट दोन्ही असते, इथे अजूनही हुंडाबळी ,बलात्कार, शोषण ई. वाईट वृत्ती हि आहेत, स्त्रियांना उपभोग्य वस्तू समजून वागवतात त्यांनी आपली स्त्री सन्मानाची परंपरा जाणावी व चुकीचा दृष्टीकोन बदलावा हे गरजेचे आहे .

जे काही निंदनीय ,वाईट आपल्या समाजात आहे ते सारे हिणकस त्याज्य असे त्यजावे त्यागावे व जे चांगले ,सर्व कल्याणकारी जणू अस्सल सोने सम आहे त्याचे संवर्धन करून जोपासावे .

सर्वांचे कल्याण साधावे हा माऊलींचा ऊदात्त हेतू चे पसायदान ईथे आठवते …जे खळांची व्यंकटी सांडो , तया सत्कर्मी रती वाढो ,भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे …..!!!

पती-पत्नीने परस्परपूरक राहणे किती व कसे हे आपण पाहिले तरी याचा विचार करताना मला माझ्या सखीचे एक वाक्य नेहमी आठवते ते असे की जहाँ जहाँ कम वहाँ वहाँ हम खरंच जर पती पत्नीने वा कुटुंबातील सदस्यांनी असा दृष्टिकोन स्वीकारून एकमेकांना त्यांच्या प्रगतीसाठी उन्नतीसाठी सहकार्य केले तर तेच समृद्ध सहजीवन असेल व असा समाज निश्चित सुदृढ समाज बनेल यात शंका नाही .

एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ ! अशा समृद्ध सह जीवनाने रोवू सुदृढ समाजरचनेचा पाया !



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!