राग आणि चिंता
सौ. भारती गाडगिलवार
एका गावात एक साप होता. सापाला खूप भूक लागली होती. इकडे तिकडे फिरताना समोरच्या सुताराच्या दुकानात शिरला. दुकान बंद होते. पण दाराच्या खालच्या जागेतून तो आत शिरला. तो सगळीकडे खायचं शोधत होता.
एवढ्यात त्याला काहीतरी लागले. त्याला जखम झाली. सापाला खुप राग आला. ज्यामुळे त्याला जखम झाली तो एक चाकू होता. सापाने त्या चाकूवर आक्रमण केले. जसजसे तो चाकूवर वार करत, त्याला आणखी जखम होत होती.
जसजशी जखम होत होती, त्याला आणखी राग येत होता. तो चाकूवर वार करतच राहिला. शेवटी तो इतका रक्तबंबाळ झाला की तो मृत्यू पावला. आता प्रश्न आहे की, सापाला कोणी मारले? सुताराने? चाकूने? तो तर असाच पडलेला होता. मग सापाला कोणी मारले? उत्तर आहे त्याच्याच रागाने.
राग हा माणसाचा शत्रू आहे. त्यामुळे माणसाच्या हातून नको असलेल्या गोष्टी देखील घडतात. राग जेव्हा असतो तेव्हा काहीतरी घटना असते जी भुतकाळातील असते किंवा कोणीतरी व्यक्ती असतो, त्यावर राग असतो.
त्या व्यक्तीने काहीतरी भुतकाळात किंवा वर्तमानकाळात केलेल्या कृतीवर राग असतो. बऱ्याचदा राग हा भुतकाळातील गोष्टींवरच असतो. अनेकदा ती व्यक्ती किंवा ती घटना ज्यामुळे राग असतो तो प्रत्यक्षात समोर नसतो. पण त्यावरील राग आपल्या बरोबर, आपल्या आत असतो.
जसजसे वेळ पुढे जातो राग वाढत जातो त्याचा परिणाम शरीरावर, मनावर होतो. त्या रागाचा परिणाम म्हणजे अशांत मन, झोपमोड, चिडचिड होते. हळूहळू त्या रागाचे विष होते आणि हे विष आपल्या शरीरात पसरते.
जेव्हा आपल्या मनात राग असतो तेव्हा आपण शांत नसतो. आपली झोपमोड होते. आपल्या शरीरात खूप काही नकारात्मक बदल होतात. आपलं डोकं शांत नसतं. आपला जो राग असतो तो त्या घटनेवर/व्यक्तीवर असतो, पण आपल्या मनात असतो. ती व्यक्ती/घटना आपल्या बरोबर नसते पण त्यांच्या बद्दलचा राग आपल्या आतमध्ये असतो.
अनेकदा आपण काय करतो की, आपल्या कुटुंबातील लोकांवर हा राग काढतो. त्यांना काहीतरी रागात बोलतो. त्यामुळे त्यांचेही मन दुखावले जाते.
कुटुंबात कलहाची स्थिती निर्माण व्हायला लागते. आणि जर या रागाला नियंत्रण घातले नाही तर परीणाम आणखी ही भयंकर होऊ शकतात.
तुमचा राग आहे तो बरोबर असेलही, त्याला योग्य कारणं असतीलही पण आज साध्या स्वरुपात दिसणारा राग हा भविष्यात रौद्र रूप धारण करु शकतो त्याचे परीणाम आपलेच जीवन प्रभावित करेल याची वेळीच जाणिव ठेवावी.
ज्या कारणांसाठी राग आहे ती कारणं वर्तमान वेळेत आपल्या समोर आहेच नाही तर त्या रागाला देखील आपल्या वर्तमानात जागा नक्कीच नसावी. रागावर नियंत्रण देखील सोपेच आहे ते म्हणजे क्षमा करणे.
आजच्या या धकाधकीच्या जीवनात वेळच कुठे आहे आनंदाने मजेत जगायला. प्रत्येक गोष्ट ही वेळेच्या बंधनात अडकली असताना रागासारख्या भावनेची जोपासना करण्यात कसला शहाणपणा?
मनुष्य जीवन आहे चुका तर होणारच. पण त्यांना मनात ठेवून साध्य काहीच होणार नाही तर क्षमा करुन त्यांनाही आपल्या आनंदात सहभागी करा. आनंद अधिक द्विगुणित होईल नक्कीच!
चिंता
चिंता हा असा रोग आहे जो आपल्याला आयुष्यभर छळतो. चिंता एक भावना आहे तीचं अस्तित्व भितीवर अवलंबून असते. येणाऱ्या भविष्याची चांगले/वाईट परिणामांची भिती म्हणजेच चिंता. एकाच गोष्टीवर सतत विचार करत राहण्याच्या एकुण प्रकाराला चिंता म्हटले जाते.
ज्यावर आपलं नियंत्रण नसतं त्यावर सतत विचार करणं म्हणजे चिंता. अति चिंता करणं हे मानसिक आरोग्यावर परिणाम करतं. अति चिंता केल्याने प्रश्नांची उत्तरे तर मिळतच नाहीत. शिवाय आपल्या सततच्या विचाराने परिस्थितीत बदल देखील होत नाही. जर बदल होणारच नाही तर विचार/चिंता करण्यालाही अर्थच नसतो.
चिंता केल्याने आपल्या जीवनात येणारे प्रश्न सुटत नाहीत. पण आजचा आपला आनंद नक्कीच आपल्याला घेता येणार नाही. असा विचार केला की, आपण आपले पुर्ण समर्पन दिले आहे एखाद्या कामात, तर ते नक्कीच पुर्ण होईल. उदा. परिक्षेची चिंता, नोकरीची चिंता, एखाद्या आजाराबाबत चिंता इ.
जर तुम्ही अभ्यासात सातत्य ठेवले आहे तर नक्कीच पास होणार. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही तुम्हाला अपडेट ठेवले आहे तर कोणताच ताण/चिंता येऊ शकत नाही. आजाराबाबत म्हटलं तर आपण सर्व उत्तम उपाययोजना करतोय. डॉ.नी सांगितल्या प्रमाणे वागतोय. कोणतीच कमतरता ठेवत नाहीत. मग चिंतेचा प्रश्नच येत नाही.
उलट आपल्या सर्वोत्तम देखरेखीखाली ती व्यक्ती स्वस्थ होते आहे. आपण आपलं सर्वोत्तम प्रयत्न करताना चुक होण्याची शक्यताच नसते. त्यामुळे चिंता हा प्रश्नही निर्माण होत नाही.
मनुष्याने कायम लक्षात ठेवावे, चिंता आणि चिता यातील फरक.
चिता मनुष्याला एकदाच जाळते. परंतु चिंता आयुष्यभर.
तेव्हा नसलेल्या गोष्टींचा विचार करून आपला वर्तमान खराब करण्यापेक्षा आपल्या आजच्या वर्तमान वेळेचा विचार करावा. तो क्षण आनंदाने जगा.
त्या क्षणात चांगली कामं करा की त्याचा भविष्यावरील परीणाम ही चांगलाच असेल नक्कीच. कारण भविष्य काळ हा वर्तमानाच्या उदरातूनच जन्म घेतो. प्रश्न आहे तर उत्तरही आहेतच. हे जाणून कृती केल्यास कोणतीही चिंता मनुष्याला कधीच घेरणार नाही!!



Lekh Aawadla
अतिशय छान आणि तर्कसंगत विचार मला या समूहातून प्रसिद्ध होणाऱ्या लेखांतून वाचावयास मिळतात. वाचून मन खरोखरच मोकळं होतं.