माझी लैंगिकता आणि त्याचा होत गेलेला कुविकास !!
आपलं मानसशास्त्र टीम
शाळेत असताना असे अनेक प्रसंग आठवत आहेत, ज्याचा प्रत्यक्ष संबंध सध्याची लैंगिकतेची मानसिकता निर्माण होण्यामागे कारणीभूत ठरू शकतील. एखाद्या शिक्षिकेच्या पाठमोऱ्या शरीराकडे पाहणे, मुलींच्या वॉशरूमकडे ‘सहज’ नजर फिरवणे, बाकावरून उठल्या-उठल्या मागच्या पृष्ठभागावर एक नजर अजूनही का फिरावीशी वाटते, कोण जाणे.
परंतु अजूनही हे सामान्य आहे, असेच आपण मानतो. परंतु प्रत्यक्ष लैंगिक जीवनात जेव्हा आपण आपल्या जोडीदारासोबत प्रवेश करतो आणि त्याच्यातून ज्यावेळी असमाधान पदरी पडतं तेव्हा मात्र वरील या सर्व गोष्टी आपल्याला हेलकावणी देऊन सोडतात.
खरंतर लहानपणापासून आपला झालेला लैंगिक कुविकास आपल्या असमाधानतेला कारणीभूत आहे, असं प्रकर्षाने म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. लैंगिकता हि अत्यंत संकुचितपणे आपल्या सभोवताली वावरत आहे. त्याचेच आपण सर्वजण बळी ठरलेले पात्र आहोत.
जसे कि,
सगळ्यात जास्त स्त्रियांना आकर्षण असतं, लिंग किमान ६-७ इंच मोठे असले तरच लैंगिक समाधान मिळते, लैंगिक आयुष्य सुखी तरच वैवाहिक आयुष्य सुखी, एक कॉटर घेतली तर उत्तेजना वाढते, बायकोला सुख दिलं तर तिचं प्रेम दुपटीने वाढतं, पॉर्न फिल्म पाहून तशा पद्धतीने करायचा अट्टाहास करणे, तसेच पॉर्न फिल्मशिवाय जोडीदाराशी कनेक्ट न होता येणे…
या व्यतिरिक्त असे असंख्य कारणे आपण स्वतः जाणून आहोत, ज्याच्या छटा लहानपणापासून आपल्या कोवळ्या मनावर उमटत होत्या आणि आता ऍडव्हांस किंवा प्रो-व्हर्जनच्या रूपात आपल्या मुलांच्या मनावर त्या उमटत आहेत.
त्यानंतर मग महाविद्यालयाच्या अद्भुत वातावरणात आम्ही शिरलो. शाळेत असताना पर्यंत ज्या काही थेअरीने मनाला बिंबवलं होतं, त्याची लॅबोरेटरीमध्ये जाऊन आम्ही खुशाल प्रॅक्टिस केली. सुरुवातीला निरोधनाचे अक्खे गट्ठे आम्ही एकतर बॅगेत किंवा पाकिटात ठेऊन होतो. नंतर हि थेअरी आणि प्रॅक्टिकल एकदा लक्षात आली कि निरोधनाला आम्ही उडवून लावलं. इतरांसाठी आम्ही लव्हगुरु बनत गेलो.
आणि ज्यांना काही जमलंच नाही त्यांची पार हेटाळणी करू लागलो. त्यांना डिवचू लागलो. पण कधीतरी हीच उलट रिऍक्शन आपल्या बेडरूममध्ये प्रवेश करणार याची कुठेच बातमी त्या पॉर्न फिल्ममध्ये किंवा ‘शीला कि जवानी’ या पुस्तकात आम्हाला सापडली नाही.
म्हणूनच आमचा प्रवास बहुतेक या दिशेने होत गेला.
आपल्या पार्टनरला शरीरापेक्षा आधी मनाने जिंकायचं असतं, हे असं कोणत्याही केवळ शारीरिक घर्षण असणाऱ्या दुनियेने आम्हाला दाखवलंच नाही. आम्ही आकर्षकता जिथे केवळ तिथे सुटत होतो. पुढच्या पिढ्यांसाठी आम्ही काय वाढून ठेवतोय याचं आकर्षण आम्हाला त्या आकर्षणाने स्पष्ट कधी जाणवूच दिलं नाही.
आणि आम्हाला सुद्धा नेमका अर्थ सांगायला कोण होतं ? जे भेटले ते या विषयात आमच्यापेक्षाही ज्ञानी निघाले. म्हणून हे वर्तुळ अजूनही तसंच अनंतपणे सुरूच आहे.
बोलायला कोणी नाही, सांगायला कोणी नाही. प्रत्येकाचे हात खिशामध्ये लपलेले. जो तो फक्त हेच बोलत होता की खूप भारी वाटतं, खूप मज्जा येते. म्हणून आम्ही आजूबाजूतुन मिळणाऱ्या चटपटी बातम्यांना ज्ञान समजू लागलो.
शेवटी एकच सत्य आज आम्ही ओळखतो, दोघांपैकी केवळ एकाला कामतृप्ती मिळत असेल किंवा ती व्यक्ती जबरदस्ती मिळवत असेल तर तो कुविकासच.
आणि लैंगिक तृप्ती शमविण्यासाठी लेडीज टॉयलेटकडे नजर फिरविणे, कुणा एकाला रोखून पाहणे, गर्दीत चान्स मारणे ही लक्षणे सुद्धा उध्वस्त लैंगिक जीवनाची उदाहरणे आहेत.