सक्षम ऊर्जेचे रहस्य ??…
ज्योत्स्ना शिंपी
आपल्या आजूबाजूला आपण अशी काही माणसं नक्की बघितली असतील की जी अत्यंत मोठ्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी रात्रंदिवस न थांबता अविरतपणे कठोर परिश्रम करीत असतात.
तरीही त्यांच्याकडे पाहून असे वाटते की ते या भाराखाली दबली न जाता उलट जास्तीच्या जबाबदाऱ्या घेण्यास नेहमीच तयार असतात. आपले काम सहजतेने तरीही पूर्ण कार्यक्षमतेने करण्याची युक्ती त्यांनी साध्य केलेली असते….
तर अशा या कार्यक्षमतेचे, अफाट वाटणाऱ्या ऊर्जेचे कारण तरी काय असेल? तर अशी माणसे भावनिकदृष्ट्या सुस्थिर आणि अध्यात्मिकही असतात. शक्तीचा अपव्यय कसा टाळावा हे त्यांनी शिकले असते.
वास्तविक, काबाडकष्टाने ऊर्जा घटत नाही तर भावनांच्या उद्रेकाने घटते आणि अशी माणसं अशा उद्रेकांपासून मुक्त असतात. जर माणसाने योग्य आहार, व्यायाम, झोप घेऊन आणि व्यसनांचा त्याग करून शरीराची योग्य काळजी घेतली तर शरीर आश्चर्यजनक पातळीपर्यंत ऊर्जा निर्माण करून ती टिकवू शकते आणि निरोगी आणि निरामय राहू शकते.
जर आपण आपले भावनिक जीवन सु-नियोजित ठेवण्याकडे लक्ष पुरवले तर ऊर्जेचे संवर्धन ही होते….आपली शारीरिक स्थिती ही मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते ती आपल्या भावनिक स्थितीवर आणि आपल्या भावनिक जीवनावर आपल्या वैचारिक जीवनाचे नियंत्रण असते.
आपल्या आजूबाजूला बरेच असेही लोक असतात जे केवळ यामुळे थकलेले असतात की त्यांना कशातच रस नसतो, कशाचीच आवड नसते. कुठलीही गोष्ट त्यांना खोलवर स्पर्श करीत नसते. काय चालले आहे, परिस्थिती कशी आहे यामुळे काही लोकांच्या बाबतीत काहीच फरक पडत नसतो.
मानवी जातीवर वाटेल तेवढी संकटे आली तरी त्यांना त्यांच्या वैयक्तिक काळज्यांसमोर त्या गोष्टीची काहीच घेणे देणे नसते. कूपमंडूकासारखे ते आपल्याच चिंता, इच्छा आणि तिरस्काराच्या छोट्या विश्वात गुंग असतात.
खरोखरच काहीच महत्वाच्या नसलेल्या ढिगभर शिल्लक गोष्टींनी स्वतः त्रस्त असतात. म्हणून ते थकतात. अगदी आजारी ही पडतात.
थकव्यापासून दूर राहण्याचा खात्रीशीर मार्ग आणि उत्साहाचे मर्म म्हणजे ज्या गोष्टीवर तुम्हाला अपार विश्वास किंवा श्रद्धा आहे अशा गोष्टीत स्वतःला विसरुन गुंग होणे.
स्वतःवर पूर्ण विश्वास असणे. तुमच्यापेक्षा मोठ्या असलेल्या एखाद्या ध्येयाच्या प्राप्तीत तुम्हाला जर स्वतःचा विसर पडला, तर तुम्हाला अधिक ऊर्जा मिळते. कारण त्यामुळे तुम्हाला स्वतः विषयी विचार करण्यासाठी आणि स्वतःच्या भावनिक अडचणींच्या दलदलीत रुतण्यासाठी वेळच मिळत नाही.
ऊर्जेचा झरा जीवनात सतत खळाळता ठेवण्यासाठी आपले भावनिक दोष दूर करणे महत्त्वाचे असते. सक्षम ऊर्जा मिळविण्यासाठी भीती, अपराध अशा भावनेवर ईश्वराच्या क्षमेची याचना करून त्यावर इलाज करता येतो…
क्षमाशीलता, कृतज्ञता या भावनेमुळे तसेच शारीरिक आणि भावनिक सुव्यवस्थापन करून आपण आपल्या जीवनात नवीन ऊर्जा, शांती, नवा जोम नक्कीच मिळवू शकतो…
आपणा सर्वांना सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ??


