आयुष्य असे कसे ? उत्तरं मिळत नाहीत पण प्रश्न वाढताहेत.
राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
लहान असताना प्रश्नोत्तरांमध्ये आपण फारसे अडकत नव्हतो. आता मोठे झालो आहोत तर एक एक प्रश्न बारकाईने पाहण्याची, चाचपडून अलगद पुन्हा गोंजारण्याची सवय जडली आहे. जणू तो प्रश्न आयुष्यातील प्रत्येक श्वासाशी कनेक्ट आहे.
कोणत्या प्रश्नांना किती आणि कुठे महत्व द्यावे यामध्येच मानसिक गोंधळ असल्याने उत्तरं तर मिळत नाहीत पण प्रश्नच वाढत जातात.
कोणत्या रंगाची साडी नेसू, NIKE चे शूज घेऊ कि PARAGON चे, उद्या सुट्टी आहे तर बायकोला जवळच्या गणपती मंदिरात आणि गार्डन मध्ये नेऊ कि बाईकवर मस्त लॉन्ग ड्राइव्हवर नेऊ, नातेवाईकांनी आज जेवायला बोलावलंय जाऊ कि नको, इतक्या उशिरा कोण आमंत्रण देतं का, नेमकी माझीच लोकल ट्रेन आज सुटायची होती, त्या नालायक माणसाने माझा रेल्वे पासच उशिरा दिला, पैसे इन्व्हेस्ट करू कि बँकेतच राहू देऊ, आज बाहेर जेऊ का, त्याला खरं सांगू का कि अजूनही खोटंच राहू देऊ..
वगैरे वगैरे…
अशा कित्येक प्रश्नांच्या ओझ्याखाली आता केवळ आपले हातच नव्हेतर संपूर्ण शरीर चेम्बलेलं आहे आणि त्याच अवस्थेत आपण आपली रोजची ढकलगाडी चेहऱ्यावर मुखवट्यांच्या स्वरूपात हाकत आहोत.
कोठे पोहोचायचे आहे….माहित नाही.
मग असले वारंवार अतार्किक प्रश्न संपणार कधी ? कि मला घेऊनच ते एकदाचे संपणार आहेत ? कि आता असे अतार्किक प्रश्न असणे जिवंतपणाचं लक्षण बनले आहे…
पुन्हा प्रश्न.. पुन्हा पुन्हा प्रश्न…एक प्रश्न संपत नाहीत कि तेवढ्यात मेंदूवर असे हजारो-लाखो विचारांची सेना आदळते आणि शृंखला बनून सारखी डिवचत असते.
मग हे असले प्रश्न थांबणार कधी ?
एक मिनिट….
फॉर युवर काईन्ड इन्फॉर्मशन प्रश्न कधीच थांबत नसतात. फक्त त्या प्रश्नांना आपल्या मेंदूकडून योग्य प्रतिसाद (Response) आणि प्रतिक्रिया (Reaction) देण्याची सवय आपल्याला रुजवावी लागेल.
म्हणजेच कोणत्या रंगाची साडी नेसू किंवा कोणते शूज घेऊ हा प्रश्न तुम्ही सामान्यपणे हाताळून तात्काळ त्या प्रश्नातून बाहेर पडत असाल तर तुमचा मेंदू योग्य प्रतिसाद आणि प्रतिक्रिया देतोय असं म्हणायला काहीच हरकत नाही.
परंतु साडी किंवा शूज घेण्यासाठी तुम्ही एकाच ठिकाणी १० दुकाने फिरताय आणि ते फिरून आणखीन गोंधळून जाताय. तसेच घेतलेली वस्तू वापरून तुम्ही इतरांना सांगताय कि, अरे तिसऱ्या दुकानाची वस्तू घ्यायला हवी होती. याचा अर्थ तुम्हीच त्या प्रश्नाची तीव्रता इतकी वाढवली कि त्यातून मिळणारं असमाधान तुम्हाला तुमचं दैनंदिन जीवन सामान्यपणे जगू देणार नाही.
म्हणजेच, मी माझ्या मित्राला किंवा मैत्रिणीला मदतीसाठी बोलावलं होतं पण ते आले नाही, नाहीतर तिसऱ्याच दुकानाची वस्तू आम्ही घेतली असती. आता मी सुद्धा त्याच्या सोबत कुठेच जाणार नाही.
नकारात्मक प्रश्नांची, विचारांची, वर्तनाची सावली हळू हळू अशी पसरते. त्यातून सवय जडून प्रत्येक लहान-सहान प्रश्नांना आपला मेंदू उलट प्रतिसाद आणि प्रतिक्रिया दयायला लागतो. जणू ते प्रश्न आपल्यासाठी खूपच महत्वाचे आहेत, सतत अशी कठोर भूमिका घेणारी माणसं आपण पदोपती पाहतोय.
हि तीच माणसं आहेत, ज्यांच्यापासून इतर जवळीक माणसं पार दुरावलेली असतात किंवा ऑप्शन नाही म्हणून सोबत असतात.
म्हणून आपल्या सभोवताली प्रश्नांचा गोतावळा जरूर असतो, पण त्यापैकी कोणते प्रश्न पडू द्यायचे आणि किती वेळेसाठी पडू द्यायचे हे संपूर्णपणे आपला मेंदूच ठरवत असतो.
अर्थात ज्या पद्धतीने त्याच्या प्रतिसाद आणि प्रतिक्रियेचा विकास झाला आहे, यावरही ते अवलंबून आहे.


