Skip to content

आपल्याला आपल्या जबाबदरींची जाणीव नेमकी केव्हा होते .. ???

गौरवी देशपांडे


जबाबदारीची खूप जाणीव होते जेव्हा….


रस्त्याने चालताना, क्रॉस करताना आई विश्वासाने हात घट्ट धरते तेव्हा,
एखादी वस्तू विकत घ्यायच्या आधी किमतीचा विचार मनात डोकावून जातो तेव्हा,
आई-बाबांना थकलेलं बघते तेव्हा,

आईशी भांडण झाल्यावर लगेच स्वतःचंच मन स्वतःला खातं तेव्हा,
काहीतरी उद्योग करीन म्हणून गॅस पाशी ही जाऊ न देणारे आई-बाबा ‘चहा कर,काहीतरी खायला कर’ असं म्हणतात तेव्हा,

एकटीच्या जीवावर ते घर सोडून जातात तेव्हा,
लहान भावाच्या Parents मीटिंग मध्ये Parents sign sheet वर सही करते तेव्हा,

आई सोबत गर्दीच्यावेळी ट्रेन ने जाताना स्वतः ऐवजी ‘तिला व्यवस्थित बसायला मिळेल ना?’ हा विचार सतत मला काळजीत पाडतो तेव्हा,
मजेमजेत आई ‘काय आता आम्ही म्हातारे झालो’ असे म्हणते तेव्हा
लग्नानंतर ‘घर सोडावं लागेल’ या ऐवजी ‘मी गेल्यानंतर आई-बाबांना करमेल ना?, त्यांची काळजी कोण घेणार?’ या विचाराने खूप रडायला येतं तेव्हा,

दाटून आलेले असतानाही आई बाबांसमोर ते अश्रू थांबवून ठेवण्याची ताकद येते तेव्हा,

कॉलेजची फी आईला भरायला सांगताना स्वतः कमवत नसल्याचा राग येतो तेव्हा,

पहिल्या पगारातून ‘आई बाबांना काहीतरी छान घ्यायचं’ ही इच्छा दिवसेंदिवस तीव्र होते तेव्हा,

बाबा कामाला जाताना Bye नंतर आपोआपच ‘पाण्याची बाटली घेतली ना?,नीट जा, लवकर या’ हे शब्द तोंडातून बाहेर पडतात तेव्हा…..

अशा कित्येक लहानसहान गोष्टी असतात ज्या पदोपदी ‘आता आपण मोठे झालो आहे’ ही जाणीव करून देतात. मॅच्युरिटी ही वयाने नाही तर अंगावर पडणाऱ्या जबाबदाऱ्यांमुळे येते.लहान असताना देवाकडे ‘मला लवकर मोठ्ठं कर’ असं मागायचे. पण आता त्याच देवाकडे आई-वडिलांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्याची प्रार्थना करावीशी वाटते तेव्हा खरच मोठं झाल्याची जाणीव होते….


आपले सुद्धा प्रेरणादायी लेख आम्हांला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.

“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया !”

3 thoughts on “आपल्याला आपल्या जबाबदरींची जाणीव नेमकी केव्हा होते .. ???”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!