सकारात्मक दृष्टीकोन
सौ. भारती गाडगीलवार
बरेचदा आपण बघतो की, एखादी मुलगी एखाद्या मुलासोबत पळुन जाऊन लग्न करते.
१. काही लोकं म्हणतात मुलगी ही वाईट चालीची होती मुलासोबत अफेअर होतं. पळून जाऊन बापाचं नाक कापलं इ.
२. काही लोकं म्हणतात की, बरंच झालं पळून गेली आपल्या मनासारख्या जोडीदारासोबत सुखाचा संसार करेल. नाहीतर अरेंज मॅरेज तरी कुठे यशस्वी होतात तिथेही वाद होऊन घर तुटतात. त्यापेक्षा तिने तिच्याशी समरुप स्वभाव असलेल्या मुलाशी लग्न केले सुखी राहील.
वरील १ आणि २ वाक्यात आपल्याला विचारांचे दोन दृष्टीकोन दिसुन येतात. एकात नकारार्थी भाव म्हणजेच नकारात्मक विचार तर दुसऱ्यात सकारात्मक विचार दिसतो. म्हणजेच त्यातुन केवळ मन दुखतील, वाईट गोष्टींची बीज रोवल्या जातील याकडे जाणारी विचारांची श्रृंखला म्हणजे नकारात्मक दृष्टिकोन होय.
सकारात्मक दृष्टीकोन म्हणजे ज्या विचारांतून केवळ चांगल्या गोष्टी घडतात, जीवन सुखमय होण्यात मदत होते अशी विचारधारा म्हणजेच सकारात्मक दृष्टीकोन होय.
कोणत्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टीकोन हा अत्यंत महत्वाचा असतो. जेव्हा आपण सकारात्मक दृष्टिकोनातून एखादी वस्तू/घटनेकडे बघतो तेव्हा त्यातुन आपण काही प्रेरणा घेऊन नवीन काही निर्माण करु शकतो. जर आपला दृष्टिकोन नकारात्मक असेल तर आपण त्या घटनेमध्ये स्वतःला हरवून बसतो आणि आणखी नवीन संकटांना आमंत्रण देतो.
आपल्या जीवनातील प्रत्येक घटना आपल्या चांगल्यासाठीच घडतेय असा विचार केला तर आपल्यात कोणतेही कार्य यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक असतो. एक छोटासा सकारात्मक विचार आपल्या जीवनाची दिशा बदलण्याचं सामर्थ्य बाळगतो.
बरेचदा जीवनात काही सतत वाईट घडत असतं. कुटुंबात, मित्र परिवारात, नोकरी व्यवसायात. अशा वेळी नकळतच का होईना पण मनुष्यावर नकारात्मकता वरचढ ठरु शकते. अशा वेळी सकारात्मक दृष्टीकोन कसा मेन्टेन ठेवावा आणि आपल्या जीवनात कायम आनंद कसा राहील या द्विधा मनःस्थितीने व्यक्ती घेरला जातो.
अशावेळेस जर सकारात्मक दृष्टीकोन जर आपण मेन्टेन केला तर आपल्याला नकारात्मकता कधीच घेरणार नाही. आता हा मेन्टेन कसा करायचा याचीच चर्चा आपण काही उदाहरणांवरुन करुयात.
आपल्याला माहीत आहेतच की, या जगात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत. याचा स्विकार करणं महत्त्वाचं असतं. समजा एकिकडे आपण खड्डा खणतो तर दुसरीकडे डोंगर उभा राहणारच.
कारण खड्ड्यातील माती जर दुसरीकडे टाकाल तर त्या जागी डोंगर उभा राहतोच. अनेकदा नकारात्मक काही घडलं तर आपण वैतागतो, चिडतो, त्रासतो. असे वाटते की, नकारात्मक काही घडूच नयेत. पण असं होत नाही.
चांगले, वाईट हा जगाचा नियम आहे. वाईटा शिवाय चांगल्याची किंमतही कळत नाही. पण यांचाही आपण स्विकार करायला हवाच. जे स्विकारतात ते प्रयत्नाने पुन्हा यशस्वी होतात. पण ज्यांना स्विकारता येत नाही ते वाईट मार्गी लागतात.
कोणतीही गोष्ट घडली की, यातुन आपल्याला काय फायदा होईल हा विचार केला पाहिजे. म्हणजेच वाईट घडतंय तर यातुन चांगले कसं होऊ शकतं हा विचारच आपल्याला नकारात्मकते पासून दुर घेऊन जातो.
उदा. एखाद्या व्यवसायात आलेलं अपयश. यावर असा विचार केला की बरं झालं असं घडलं आता मी नव्याने दुसऱ्या गोष्टीची सुरुवात करु शकतो आणि ती गोष्ट माझ्यासाठी अत्यंत यशस्वी ठरणारी असु शकते. अशावेळेस आपलं मन सुखावते.
नवीन उर्जा आणि उत्साह संचारतो. भविष्यातील आपली वाटचाल नक्कीच यशाकडे असणार हा विचार अनेक प्रकारच्या मानसिक ताणावर नियंत्रण घालणारा ठरतो.
आपल्या सभोवताली घडणाऱ्या घटनांकडे बघण्याचा दृष्टीकोन हा व्यक्तीपरत्वे भिन्न असतो. काही लोकं कायम वाईटच विचार करणारे असतात तर काही चांगले.
उदा. बायकांच्या हळदीकुंकू कार्यक्रमाचं घेऊया. काही बायकांना सवय असते चुका शोधून लगेच बोलुन दाखवण्याची. काही बाया मिळून मिळुन प्रत्येकीकडे जातात वाण घ्यायला.
एकीकडे समोरचा हाॅल अतिशय सुंदर सजवलेला दिसतो तर खुप स्तुती करतात. तर दुसरीकडे मुलांची बोरन्हान झाल्यामुळे, मुलांच्या मस्तीमुळे घर अस्तवस्त दिसतं. लगेच बोलतात बाया घर टिपटाप ठेवलं नाही. तिसरीकडे एक स्त्री अगदी साध्या साडीत वाण देताना दिसते.
चेहऱ्यावर देखील विशेष मेकअप केला नाही यावर बोलणारे बोलतातच. आता यात तीन स्त्रीयांबद्दल काही बायकांनी नकारात्मक विचार व्यक्त केलेत. त्यामागची कारणं न जाणुन घेता. वास्तविक पहिली स्त्री ही नोकरी करणारी असल्याने वेळ न मिळाल्याने फक्त समोरची बैठक खोली सजवते.
दुसरी स्त्री ही मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे खेळु देण्याला महत्त्व देते. तर तिसऱ्या स्त्रीच्या जवळच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने ती दुःखात असते. पण रित निभवायची असल्याने साध्या वेशात तयार होते. अशावेळेस तिला खूप सजायची इच्छा होणारच नाही. हळदीकुंकू हे घरा शेजारच्या लोकांमध्ये केले जाते.
साधारण इतकी सामान्य माहिती ही शेजाऱ्यांना असतेच. पण ज्यांना कायम वाईटच बघायचं असते ते याच घटनेला दोन प्रकारे अर्थात सकारात्मक आणि नकारात्मक दृष्टिकोनातून बघतात आणि त्याप्रमाणे व्यक्त होतात.
काही लोकं म्हणतात, त्यांच्यासोबत नेहमीच कसं चांगलं घडतं, माझ्यासोबत तर नेहमीच वाईट घडतंय. अशी ओरड करणाऱ्यांची संख्या कमी नक्कीच नाही. इथे नेमकं काय घडतंय तर जे लोकं कायम सकारात्मक दृष्टिकोनातून प्रसंगांना सामोरे जातात त्यांच्यात सकारात्मक दृष्टीकोन विकसित झालेला असतो.
ते लोकं कायम नाण्याच्या दोन्ही बाजुंचा विचार करतात. म्हणजेच प्रसंग तर वाईट आहेच पण यातुनही चांगले होण्याची शक्यता नाकारता येत नाही असा विचार ज्यांना येतो त्यांचा सकारात्मक दृष्टीकोन हा विकसित झालेला असतो. आणि असे लोकं कायम यशाच्या शिखरावर असतात.
आपल्या रोजच्या जीवनातील एक उदाहरण बघुया. घरात गृहिणी भाजी चविष्ट बणन्यासाठी झणझणीत फोडणी देते. त्यावेळी फोडणीच्या उग्र वासाने सगळ्यांना ठसका बसतो.
काही लोकं ओरडतात, धूर झाला, खोकला येतोय इ. पण सकारात्मक विचार करणारा व्यक्ती विचार करतो की, आता काय करायला हवं. तो घराच्या खिडक्या, दारे उघडतो, आणि म्हणतो की ज्यांना त्रास होतो त्यांनी बाहेर हवेशीर बसावे.
सोबतच सांगतो की ती गृहिणी अजुनही गॅस समोरच उभी आहे. आपल्याला चविष्ट जेवण मिळावे म्हणून त्रास सहन करतेय आणि आपण तिच्या वर ओरडतोय. ही घटना नकारात्मक आणि सकारात्मक विचार दोन्हींचे उदाहरण आहे. या घटनेकडे बघण्याचा दृष्टिकोन सांगत असताना त्या व्यक्तीचा सकारात्मक दृष्टीकोन विकसित होत असतो.
बरेचदा असं होतं की, आपण प्रचंड मेहनत घेतो तरीही कार्यात अपयश येते. म्हणजेच कुठेतरी आपण कमी पडतो तेव्हाच असं घडतं. उदाहरणार्थ स्पर्धा परीक्षा देताना बरेचदा अपयश येते. सर्व अभ्यास झालेला असतानाही. काही लोकं अभ्यासात कमी असले तरीही त्यांना यश मिळते.
नोकरी मिळते. पण आपल्याला नाही. यावेळी आपण हार न मानता अपयशाची कारणे शोधून स्वतःवर विश्वास ठेवावा की मी हे नक्कीच करु शकतो. होऊ शकते की पेपर सोडविण्याचा सराव कमी पडत असेल, वेळेत पेपर सोडवण्याच्या प्रयत्नात चुकीचं उत्तर अंकीत होतं.
निगेटिव्ह मार्किंग असल्याने चुकीच्या उत्तरासाठी मार्क्स कटतात, प्रत्येक वर्गासाठी लागणारी cut of line ही वेगळी असते. ही सर्व कारणे आहेत स्पर्धा परिक्षेत अपयशी होण्याची. ती लक्षात घेऊन स्वतःवर विश्वास ठेवला आणि त्यानुसार परीक्षेची पुन्हा तयारी केली तर नक्कीच यशप्राप्ती होते.
आज जरी मी अपयशी झालो तरीही पुन्हा प्रयत्नाने यशस्वी होईल. हाच विश्वास आपला सकारात्मक दृष्टीकोन विकसित करतो.
जीवनात कोणतीच गोष्ट ही कायमस्वरुपी नाही मग घटना/प्रसंग/ वाईट परिस्थिती ही सुद्धा कायम नसते. तिचा कालावधी संपला की, ती देखील निघून जाते. फक्त माणसाने त्यावेळी कठोर भूमिका ठेवावी. हतबल होऊन परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर मार्ग निघतोच.
सारांश असा आहे की, वरील सर्व उदाहरणांवरुन आपण आपला सकारात्मक दृष्टीकोन विकसित कसा करु शकतो आणि जीवन कसं सुखमय होऊ शकते हेच दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
जीवनात सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही गोष्टी आहेत फक्त तुम्ही त्याकडे कसे बघतात यावरच तुमच्या जीवनाचं यश अवलंबून असते.


