Skip to content

नैराश्यावर हे साधे आणि सोपे उपाय करून पहा.

नैराश्यावर हे सोपे उपाय करून बघा


सौ. भारती गाडगीलवार


आजचा विषय हा मानसशास्त्रावर आधारित आहे… नैराश्य म्हणजे काय? आपल्याला नैराश्याने घेरलं आहे म्हणजे काय? हे जाणून घेण्यासाठी आधी आपण वर्तमान स्थितीतील घटनांवर लक्ष देऊ….

रोज न्युज मध्ये असतं अमुक एकाने नैराश्यातून अमुक अमुक कृती केली….एका १२ वर्षाच्या मुलाने गळफास लावून घेतला… या आणि अशा कित्येक….पण यात साम्य काय आढळतं तर आत्महत्या…..!

विचार करण्यास भाग पाडतात या गोष्टी की असं इतकं काय घडतं की तरुण पिढीला हाच एक पर्याय दिसतो….

आपल्या वडील पिढीतील लोकांना नैराश्य नसेल का?असा प्रश्न आजच्या तरुणाईला पडायलाच हवा….का नाही?

आज सारखं सगळं रेडीमेड नव्हतं मिळालं त्यांना….स्वकष्टाने उभारलंय सर्व…. आपल्या सुखाची होळी करून आपल्या मुलांसाठी सगळं तयार ठेवलंय…. आणि या सर्वांची परतफेड आत्महत्येने??

नजिकच्या काळात काही लोकांच्या आत्महत्येने समाजात नैराश्य या विषयावर चर्चा घडतांना आपण बघतोय….तर सर्वप्रथम आपण नैराश्य म्हणजे काय हे समजून घेऊ…..

नैराश्य

नैराश्य हा एक मानसिक आजार आहे. ज्यात व्यक्तीला नेहमी उदास वाटतं. काहीच करावसं नाही वाटत. सतत नकारात्मक विचार मनात येतात.

‌‌यात प्रामुख्याने सतत उदास वाटतं, चिडचिडेपणा, थकवा येणे, जेवणाची इच्छा नसणे, कामात लक्ष न लागणे, निर्णय क्षमता कमी होणे, आपण काहीच कामाचे नाही, आपलं काहीच चांगले होणार नाही, आपल्याला कोणी मदत करु शकत नाही, आत्महत्येचे विचार मनात येणं, आत्महत्येचा प्रयत्न करणं या सर्व लक्षणांचा समावेश होतो.

नैराश्य का येते?

नैराश्याच्या कारणांचा विचार केला तर असं आढळलं प्रत्येकाची कारणं वेगवेगळी आहेत. जसं नोकरी गेल्याचा ताण, लग्न मोडल्याचा ताण, प्रियकर सोडून गेल्याचा ताण, परिक्षेत अपयश आल्याचा ताण, घरातील अपमानास्पद वागणुकीचा ताण, प्रिय व्यक्ती कायमची सोडून गेल्याचा ताण या सर्व कारणांमुळे व्यक्तीला नैराश्य घेरते.

जागरुकता

‌सर्व प्रथम नैराश्य म्हणजे काय हे प्रत्येकाने समजणं आवश्यक आहे सोबतच त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणं जास्त महत्वाचा आहे. आजही ग्रामीण तथा शहरी भागात मानसिक आजार म्हणजे वेड्यांचा आजार समजला जातो. मानसोपचारतज्ज्ञ म्हणजे वेड्यांचा डाॅक्टर समजला जातो.

नैराश्य ही मानसिक अवस्था आहे. त्याची कुठलीही लक्षणं ही वेडं लागली आहेत असं स्पष्ट करत नाहीत. सर्वप्रथम त्या व्यक्तीला आत्मविश्वासात घेऊन त्यास समजावून त्याला नैराश्यातून बाहेर काढता येते…. बरेचदा डॉ. चीही गरज पडत नाही… गरज आहे सामंजस्याने घेण्याची….

उपाययोजना

नैराश्यातुन बाहेर येण्यास सर्वप्रथम सगळ्यां सोबत चर्चा करावी… मित्र परिवारात मनमोकळेपणाने संवाद साधावा. याद्वारे मनावरील ताण कमी होण्यास मदत होते. प्रेरणादायी लोकांबद्दल माहिती वाचावी. ज्यांनी जीवनात संघर्ष केला आहे त्यांचा संघर्ष प्रवास जाणून आपल्यात आत्मविश्वास निर्माण करावा.

स्वतः काही छंद जोपासावे. सृजनात्मक प्रयोगावर भर द्यावा, जसं की लिखाण, गार्डनिंग, कुकींग इ. या सर्वातुन मनातील ताणाची जागा सृजनात्मक गोष्टी घेतात आणि परिणामी नैराश्यातून बाहेर येता येते.

ही झाली शास्त्रीय पद्धत नैराश्य म्हणजे काय आणि त्यावरील उपाययोजना…..खरंतर नैराश्य म्हणजे खूप काही मोठा प्रकार नाही… आपल्या घरात/ परीसरात / मित्र परिवारात कायम खेळीमेळीचं, विश्वासाचं वातावरण असलं न तर नैराश्य सारखं काही असतं हेदेखील कोणाला समजणार नाही.

प्रत्येक गोष्ट आपसात सामंजस्याने सोडवली की ताणाचा उगम अशक्यच आहे. स्पर्धांना स्पर्धा न समजता आपला सर्वोच्च प्रयत्न समजुन बघितलं तर यश नक्कीच आपलं असतं, हे निर्विवाद सत्य आहे.

आता आधीच्या लोकांचचं बघा ना कितीही अपयश आलं तरी पुन्हा नव्या जोमाने कामाला सुरुवात करणं अन् यशस्वी होणं हाच मंत्र होता…. नैराश्य हा प्रकार तर ऐकीवातच नव्हता….

स्वतःच आपल्या प्रश्नांवर उत्तर शोधली की सापडतातच….

उगाच वाईट मार्गाला जाऊन घरच्यांना घोर लावण्यापेक्षा सतत काहितरी नविन करण्यात तत्पर राहिले तर नैराश्य कधीच कोणाला ग्रासणार नाही हे निश्चित…!!

‌माझा स्वतःचा व्यक्तिगत अनुभव हाच आहे मी नैराश्यातून बाहेर पडण्यासाठी कायम सृजनात्मतेवरच भर दिला आहे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!