आनंदी मन
मधुश्री देशपांडे गानू
आयुष्याच्या एका वळणावर असे लक्षात येते की आपण आतापर्यंत अनुभवलेलं सुख , पचवलेलं दुःख , न पचवता आलेलं दुःख या सगळ्याला आता आपल्या लेखी काहीच महत्व उरलेलं नाही.
आपल्यामध्ये इतकी ताकद आलीयं की याकडे आपण अलिप्तपणे पाहू शकतो. फक्त आजचा दिवस आताचा क्षण महत्वाचा आहे हे समजतं. मग मात्र सगळे सहज सोपे सुंदर होऊन जातं..
गतकाळाच्या आठवणी आपल्याला भिववत नाहीत.. आणि येणार्या काळाची चिंता हुरहूर वाटत नाही.
आताचा हा क्षण फक्त माझा आहे आणि तो मी अत्यंत आनंदाने अनुभवणार.. एवढंच लक्षात ठेवायचं.. मला माहित आहे हे अजिबातच सोपे नाहीयं. पण असे प्रयत्नपूर्वक संस्कार करायचे मनावर.. मग बघा.. जगणं किती सुंदर होतं..
मग ना आपण दुसर्याकडून अपेक्षाही करत नाही कसल्याच.. आपली प्रेमाची माणसे ज्यांच्यावर आपलं जीवापाड प्रेम आहे.. त्यांना त्यांच्या गुण दोषांसकट स्वीकारतो आपण.. त्यांच्यावर बंधनं नाही घालत.. त्यांना फुलपाखरासारखं मुक्त स्वच्छंद उडू देतो..
आपला आपल्या नात्यावर विश्वास हवा फक्त.. आपली जी प्रेमाची माणसं असतात ना ती फिरून आपल्याकडे येतातच.. अपेक्षा , राग , तक्रार , चिडचिड , हक्क बजावणे , संशय , आपलं तेच खरं मानणे.. अशा विकारांना थारा नाही द्यायचा. हे प्रयत्नपूर्वक करायचे.
आपण सगळे एकाच ऊर्जेने बनलो आहोत.. ही ऊर्जा आनंद देण्यासाठी वापरायची. अगदी साधं जेवण करतानाही मनात आनंद हवा..मग वेगळीच चव येते..
माझा मुलगा मला गंमतीने नेहमी म्हणतो.. ” अगं जरा प्रेम कमी घालत जा पदार्थात.. तिखटपणा कमी होतो ना “..? आपल्या प्रेमाच्या माणसांसाठी काहीही काम करताना चिडणं रडणं कुढणे असे करू नये.. जबाबदारी आनंदाने पार पाडली की ओझं नाही वाटत.
माझी मोठी आत्या नेहमी सांगायची कधीही घरात ‘ कंटाळा आला ‘ असे म्हणू नये.. चांगली ऊर्जा कमी होते. जितका आनंद द्याल तितका तुम्हाला परत मिळतो.
स्वतःवर प्रेम करायला शिकलं की सोपे होतं सगळे.. मनातून आतून आनंद झिरपला पाहिजे.. मन शांत सुंदर स्थिर आनंदी हवं..मग शारीरिक स्वास्थ्य पण उत्तम राहते.. हे प्रयत्नाने शक्य आहे.. मला जमू लागलंय तसं तुम्हालाही जमेल..
मनाला सकारात्मक विचार करायची सवय लावा.. प्रार्थना कराल ती स्वतःपुरती न करता विश्वासाठी करा..
तुम्ही म्हणाल फारच उपदेश चाललायं आज.. म्हणून थांबते.. पण खरंच मन आनंदी ठेवा आणि किती छान जगण्यात बदल होतो बघा.. माझ्या मनापासून शुभेच्छा…?



मनस्वी आभार..
मनाला ऊर्जा देणारा लेख.अभिनंदन.