Skip to content

आपला ताण/तणाव आपण समजून घ्यायला हवा!

ताण/तणाव आपण समजून का घेत नाही??


सौ. भारती गाडगिलवार


काही वर्षांपासून एका नवीन आजाराने जनसामान्यांना ग्रासलं आहे आणि तो म्हणजे “ताण किंवा तणाव” होय. ज्यातून बरेचदा लोकांना मुक्त होता येत नाही किंबहूना त्याचा परिणाम लोकांच्या जीवनशैलीवर देखील होताना दिसतो आहे. याचा थेट परिणाम मानसिक आरोग्यावर होताना दिसतो आहे.

आज आपण बघतो की ताण असणाऱ्यांमध्ये लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच समावेश आहे. बरं ताणाचेही दोन प्रकार आहेत. शारीरिक आणि मानसिक याप्रमाणे.

मानसिक ताण हा अनेक विचारांतून आकारास येतो. जसं कुणाशी पटत नसेल तर, भांडणातून, आॅफिसच्या कामामुळे, नवरा बायकोतील मतभेद, इ.

शारिरीक ताण हा प्रवासाच्या दगदगीतून, अती शारीरिक श्रम इ. या कारणांमुळे येतो.

शारीरिक ताण आला असता आराम केल्यास, झोप घेतल्यास शरीराचा क्षीण निघून जातो. शरीर पुन्हा ताजेतवाने होते. परंतु मानसिक ताण हा आराम केल्याने दूर होणारा नाही. तर त्याला वेळेवर नियंत्रण घातले नाही तर दुरगामी परिणाम अत्यंत वाईट सिद्ध होतात.

उदाहरणार्थ ताणामुळे बी.पी., शुगर, हृदय रोग होण्याची शक्यता असते. म्हणूनच ताण कोणत्याही स्वरुपाचा असो त्याला योग्य पद्धतीने हाताळणे आवश्यक आहे.

व्याख्या :
आपल्या नैसर्गिक क्षमतेपेक्षा खुप जास्त शारीरिक आणि मानसिक कार्य केल्यामुळे आपल्यावर येत असलेला दबाव म्हणजेच ताण होय.
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर आपल्या सभोवती घडणाऱ्या अनेक प्रसंगांना, परिस्थितीला, बदलांना आपण शारिरीक, मानसिक, आणि भावनिक रित्या हाताळण्यात असमर्थ राहतो त्याला आपण ताण म्हणतो.

ताणाची लक्षणे :

चिंता वाटणे.
अस्वस्थ वाटणे.
लहानसहान गोष्टी विसरणे.
सतत दडपण आहे असे वाटणे.
डोकेदुखी

जरी मानसशास्त्र ताण या संज्ञेला मानसिक अवस्था संबोधित असेल तरीही मला वाटते ताण ही एक भावना आहे. भावना म्हणजेच विचार होय. बरेच लोकं म्हणतात ना की मला खूप ताण आहे. जेव्हा अनेक विचारांची गुंतागुंत निर्माण होते आणि काय करावे हे सुचेनासे होते ती अवस्था म्हणजेच ताण होय.

म्हणूनच मग एका गुंतागुंतीच्या विचारांच्या श्रृंखलेला जर तोडायचं असेल तर पर्याय देखील दुसरा विचारच असणार. म्हणजेच ताणाचा उगम जर मेंदूत आहे तर त्यावर उत्तर देखील मेंदूच देणार हे नक्की.

आता बघा, जर एखाद्या मुलाने वर्षभर अभ्यासात लक्ष दिले नाही आणि महिन्याभरात त्याची परीक्षा आहे. आता त्याला अभ्यास न झाल्याने परिक्षेत नापास होण्याच्या ताणाने घेरलंय. ही परिस्थिती बऱ्याच मुलांची असते.

जर त्यातून मार्ग काढण्यासाठी माझ्याकडे अजुनही एक महिना आहे अभ्यास करायला, असा विचार मनात आला तर ताणाची तिव्रता कमी होते किंवा तो निघून जातो आणि मुलगा पास देखील होऊ शकतो.

म्हणजेच काय तर वस्तुस्थितीचा स्विकार करुन जर त्या प्रश्नावर उपाय शोधला तर उत्तर मिळतेच. जर असा विचार केला की, नापास तर होणारच आहे मग जो वेळ उरलेला आहे त्यात जर अभ्यास केला तर पास होण्याची शक्यता जास्त आहे हा विचार म्हणजेच त्या ताणावर औषध होय.

काहीही न करता येणाऱ्या परिणामांची वाट पाहत किंवा त्यावर इतरांची प्रतिक्रिया ऐकण्यापेक्षा एक प्रयत्न म्हणजेच त्या ताणावर प्रभावी उपाय ठरतो.

बरेचदा असं होतं की आपण खूप हुशार असतो. सगळीकडे यश अशी आपली प्रतिमा असते अन् अचानक अनपेक्षितपणे कुठल्यातरी घटनेने आपल्याला अपयशाला सामोरे जावे लागते.

मग असं वाटतं की आता पुन्हा नव्याने सुरुवात होणं अशक्य आहे अशी मनाची समजूत होते. म्हणजेच त्या अपयशाचा एक ताण आपल्या मनावर कोरल्या जातो.

उदा. एखादी दुर्घटना परिवारात घडली असेल, घरातील दुःखाचे वातावरण मनावर वरचढ ठरत असेल तर, यापेक्षा आणखी काय वाईट घडू शकते? असा विचार त्या परिस्थितीतून बाहेर येण्यास मदत करतो.
परीक्षा जवळ असल्या की एखाद्या कठीण विषयाची तयारी करतांना तो विषय कठीण आहे जमतंच नाही, महिलांना सुद्धा वेळेत कामं पुर्ण न होत असल्याने तणावाला सामोरे जावे लागते.

यावर उपाय एकच आहे मुलांनी समजून घेतले की ताण ताण करत बसल्याने हातात आहे तो वेळ देखील नष्ट होईल. साध्य काहीच होणार नाही. त्यापेक्षा मन लावून अभ्यास केला तर विषय आत्मसात होऊ शकतो हा विचारच ताणाला बाजूला करण्यात प्रभावी असतो.

महिलांनी देखील ताण आहे म्हणण्यापेक्षा जर दिवसभराच्या कामाची विभागणी करत कामं केली आणि सोबतच त्यात विविधता ठेवली तर कामाचं व्यवस्थापन देखील होतं, कामात एक लय राहते आणि ताण देखील येत नाही.

एका परिचिताचा अनुभव सांगते, त्या व्यक्तीला हृदय विकाराचा तीव्र झटका आला. घरांतील कर्त्या व्यक्तीला पाहून इतरांना प्रचंड ताण आला. काय करावं?

पैशाची सोय, जगण्याचा दर, आणि इतरही प्रश्नांनी सगळ्यांना त्रस्त केलेले. त्याचवेळेस त्यांची लहान मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत असल्याने हृदय विकाराच्या झटक्याची तीव्रता कमी करण्यासाठी एक गोळी जर जीभेच्या खाली ठेवली तर हृदय अटॅक ची गती मंदावते म्हणून लगेचच त्या गोळीचा उपयोग करते.

हे प्रसंगावधान साधल्याने व्यक्तीला वेळेत वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाली. सोबतच त्या ताणाचा घरातील इतरांवर होणारा परिणाम म्हणजेच बी. पी. सारख्या प्रश्नांना अडथळा आला.

सारांश असा की प्रसंगावधान साधले की अनेक विचार जन्म घेतात. अमुक अमुक गोष्टींचा परिणाम काय होऊ शकतो यावर विचार करण्यापेक्षा हे सुद्धा करता येते हा विचार अनेक ताणांना आपल्या पासून नक्कीच दूर करण्यास मदत करतात.

याव्यतिरिक्त जीवनशैलीत बदल आवश्यक आहे. मेडीटेशन, व्यायाम, खाणंपिणं, छंद जोपासणं, आनंदी वातावरण असेल तर आपल्या जीवनात तणाव प्रवेश करुच शकत नाही नक्कीच!!



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!