Skip to content

सतत टेन्शनमध्ये असणाऱ्या व्यक्तींनी हा लेख जरूर वाचा.

दृष्टिकोन (Attitude)


ज्योत्स्ना शिंपी


जगात संपूर्ण बरोबर संपूर्ण चूकही काहीच नसते. आपला एखादा कट्टर शत्रू हा दुसऱ्याचा अगदी जवळचा मित्रही असू शकतो. आपण ज्याला एखादी दुर्घटना म्हणतो ती एखाद्या वेळेला दुसऱ्याला अमर्याद संधी उपलब्ध करून देणारी घटना ठरू शकते.

फक्त ती घटना बघण्याचा आशावादी माणसाचा दृष्टीकोन वेगळा असतो आणि दयनीय परिस्थितीतल्या एखाद्या निराशावादी माणसाचा वेगळा असतो.

एखाद्या परिस्थितीकडं तुम्ही कसं पाहता ते म्हणजे दृष्टीकोन.

तुम्ही त्याकडं एक समस्या म्हणून बघता की समाधान म्हणून?

अडचण म्हणून बघता ही संधी म्हणून?

तुम्ही त्याकडे सुरुवात म्हणून पाहता की अंत म्हणून?

रस्ता संपला असं समजता की वळण आहे असं समजता?

अपयश म्हणून पाहता की केवळ एक अल्पविराम म्हणून पाहता?

हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. या प्रश्नांना तुम्ही कशी उत्तर देतात ते खूप महत्त्वाचे आहे.

जो दृष्टिकोन तुम्ही स्वीकाराल त्यावर तुमची निर्णय प्रक्रिया अवलंबून असेल. हा निर्णय तुमचं कार्य ठरवेल आणि त्यावरच तुमचे निकाल ठरतील आणि भविष्य घडेल.

प्रतिकूल परिस्थिती ही काहीजण प्रेरणा म्हणून बघतात. त्यातून त्यांना ताकद मिळते, तर काही जण स्वतःला मर्यादा घालून घेतात. प्रतिकूल परिस्थितीकडं कसं पाहतो ही गुरुकिल्ली आहे. सकारात्मक दृष्टिकोन बाळगायला शिकलं पाहिजे.

हाच आपला दृष्टिकोन पुनरागमन करण्यासाठी उपयोगी पडतो. पुनरागमन करण्यासाठीचा स्वतःवर असलेला विश्वास तुम्हाला हा दृष्टीकोन देतो.

आता ह्याच गोष्टीचे एक उदाहरण घेऊ या.

मी एका महिलेला भेटले, तिचे नाव होते कमला. ही महिला कमी शिक्षण असल्यामुळे शिलाई काम करून आपले घर चालवत असे. गरजू व्यक्तींना तिच्या परीने खूप मदत करायची. समाजात तिची प्रतिमा अतिशय चांगली होती.

तिचे तिच्या मुलांवर प्रचंड प्रेम आहे. ती जास्त शिकू न शकल्यामुळे, तिचे स्वप्न आणि प्रबळ इच्छा होती की आपली सगळी मुलं खूप शिकावीत आणि स्वतःच्या पायावर स्वकर्तुत्वाने उभे राहावीत.

पण एके दिवशी दुर्दैवाने तिचा अपघात झाला आणि तिच्या पायाला जबरदस्त मार बसला आणि आणि वर्षभर ती बिछान्यावर होती. सर्वांना अतिशय दुःख झाले.

तिच्या मानाने नुकसानही भरपूर झाले कारण ती आता शिलाई काम करायला असमर्थ होती. परंतु ती स्त्री अतिशय वेगळी होती. एक दुर्दम्य आशावादी स्त्री होती ती. तिचा तिच्यावर आणि तिच्या स्वप्नांवर अढळ विश्वास होता.

या सर्व परिस्थितीमध्येही ती खूप सकारात्मक होती. हाच विश्वास, हीच सकारात्मकता तिच्या मुलांमध्येही कळत नकळत उतरली होती. आणि म्हणतात ना जेव्हा एक दरवाजा बंद होतो तेव्हा देव आपल्यासाठी दुसरे दार उघडतो.

तिच्या मुलींपैकी एकीने कॉलेज शिक्षण करता-करता नोकरी केली तसेच दुसऱ्या मुलींनी घरातल्या घरात राहून आईची सेवा करता करता शिकवणी घ्यायला सुरुवात केली. आपल्याजवळील ज्ञानाचा, कौशल्याचा उपयोग करून आव्हानात्मक परिस्थितीमध्येही त्यांनी संधी नक्कीच शोधू काढली.

या दुर्घटनेचे विश्लेषण करता असे आढळून आले की जरी ही दुर्घटना झाली तरी सकारात्मक दृष्टिकोनामुळेच, त्या स्त्रीला थोडी तरी शारीरिक आणि आर्थिक विश्रांती मिळाली. तिची मुलं आत्मविश्वासी, कणखर, स्वावलंबी, जबाबदारीची जाणीव घेण्यास समर्थ झाली.

ती मिळवत असलेल्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न मिळू लागले होते. आज तिची सर्व मुलं पोस्ट ग्रॅज्युएट होऊन स्वकर्तृत्वावर समाजात चांगले नाव मिळवित आहे. आणि कमलाच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद उजळून दिसत आहे.

तुमच्या आयुष्यात कुठलीही घटना घडली तरी त्याला प्रत्युत्तर द्यायची तुमची क्षमता असली पाहिजे. जेव्हा तुम्ही प्रतिकूल परिस्थितीत सकारात्मक उत्तर शोधायची सवय अंगी बाणवून घ्याल, त्याच वेळी तुमचे आयुष्य उच्च दिशेला मार्गक्रमण करेल हा एक नि:संशय महत्त्वाचा सिद्धांत आहे.

सकारात्मक दृष्टिकोनात अफाट ताकद आहे.

आपणा सर्वांना सुंदर दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ??



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

1 thought on “सतत टेन्शनमध्ये असणाऱ्या व्यक्तींनी हा लेख जरूर वाचा.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!