योगा, श्वसनाचे व्यायाम नि ध्यानाची शक्ती.
ज्योत्स्ना शिंपी
योगा, श्वसनाचे व्यायाम नि ध्यान म्हणजे आपल्या शरीरातल्या चैतन्याच्या ठिणगीला प्रज्वलित करण्याची सुवर्णसंधी आहे.
धावपळीचे आयुष्य, कामाची कधीही न संपणारी मागणी, कामाचा सतत दबाव आणि रोजची धकाधकीची जीवनशैली या सर्व गोष्टींमुळे स्वाभाविकरित्या आपण शारीरिक आणि मानसिकरित्या पुरते कोलमडून पडतो…
थकवा, मरगळ छोटे मोठे आजार, अकाली वार्धक्य यामुळे आयुष्यातला सगळा आनंद आणि हास्य नाहीसे होते. खळाळता उत्साह गायब होतो आणि कधीकधी तर जगण्याची उमेद ही संपते…
योगा, श्वसनाचे व्यायाम नि ध्यान म्हणजे अतिश्रमाने थकलेल्या शरीराला आणि मनाला फक्त विश्रांतीच नव्हे तर स्वत्व शोधून परिपूर्ण आणि अर्थपुर्ण आयुष्य कसे जगायचे हे शिकवणारी संजीवनीच आहे. स्वतःच्या शरीरावर, मनावर, भावनेवर कसा ताबा मिळवायचा आणि संतुलितही कसे ठेवावे हे शिकण्याचा हा राजमार्गच आहे.
शरीर, मन आणि आत्म्याची मशागत केल्यावर प्रकाशमय जीवन प्राप्त होते.
अंतर्मनात खोल, आत मध्ये प्रवास घडत असतो… एक प्रकारची सजगता आणि जाणीव निर्माण होत असते…. पूर्वीच्या नेहमीच्याच गोष्टींना नंतर नव्याने बघण्याचा दृष्टिकोन, मानसिकता मिळते. आयुष्यात मोठ्या सुखाच्या आणि आनंदाच्या मागे धावताना छोटी-छोटी सुख अनुभवायची राहिली याची हळूच जाणीवही होते.
1) श्वसन (Breathing)
आयुष्याची पहिली कृती – श्वास घेणे.
आयुष्याची शेवटची कृती – श्वास सोडणे.
या दोन कृत्यांमध्ये आपलं संपूर्ण आयुष्य वसतं. ‘ श्वास ’ आपल्या जीवनातील अत्यंत महत्वाचा भाग आहे. श्वासाविना जगणं अशक्य आहे. श्वासावर लक्ष दिल्यास स्वास्थ्य संबंधित फायदे मिळतात. जसे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, मन स्थिर होते आणि प्रसन्न रहाते.
2) प्राणायाम (Pranayam)
श्वास आपला सर्वात जवळचा सोबती आहे. आपल्या मनोभावनांची त्याला खबर असते. पहा नां – जेंव्हा तुम्हाला राग येतो तेंव्हा श्वासाची गती वाढते. जेंव्हा तुम्ही शांत असता तेंव्हा श्वास संथ असतो. म्हणजेच श्वासाचा फक्त शरीराशीच नव्हे तर मनाशी देखील संलग्न आहे. आपल्या सर्वाना आनंदी मन हवे आहे नां? इथे प्राणायामाची गरज आहे.
प्राणायाम हा शब्द दोन शब्दांनी बनला आहे – प्राण म्हणजे जीवन शक्ती आणि आयाम म्हणजे नियमात बांधणे. प्राणायामात आपण श्वासाच्या सामान्य गतीला खंडित करून त्यावर लक्ष देतो. श्वासावर लक्ष केंद्रित केल्याने मन प्रभावित होते. प्राणायाम केल्याने शरिरात भरपूर प्राण शक्तीचा संचार होतो आणि मन ताजेतवाने होते.
प्राणायाम केल्याने शरिरातील सर्व नाड्या खुल्या आणि शुध्द होऊन मनाला आणि शरिराला ऊर्जा प्राप्त होऊन स्वास्थ्य लाभते.
3) सुदर्शन क्रिया (Sudarshan Kriya)
सुदर्शन क्रिया अद्वितीय आणि अमूल्य आहे. सुदर्शन क्रियेमुळे शारीरीक, मानसिक आणि भावनिक समन्वय साधला जातो आणि आपण पुन्हा नैसर्गिक लयीशी जोडले जातो. सुदर्शन क्रियेतील लयबद्ध श्वसनामुळे ९०% पेक्षा ज्यादा विषारी द्रव्ये बाहेर पडतात.
४) ध्यान (Meditation)
तुमच्या शरीरासाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी ध्यानाचे असंख्य फायदे आहेत. ध्यानामुळे मिळणारा आराम हा गाढ झोपेमुळे मिळणाऱ्या आरामापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. आराम जितका जास्त गहन, तुमचे काम तितकेच जास्त गतिशील.
ध्यानामुळे तणाव मुक्ती
ध्यानाचे दोन महत्वपूर्ण फायदे आहेत :
1) तणावाला आपल्या शरीर-मन प्रणालीमध्ये येण्यापासून प्रतिरोध आणि
2) आपल्या शरीर-मन प्रणालीमध्ये असलेला तणाव बाहेर काढून टाकायला मदत.
हे दोन्ही फायदे आपल्याला एकाच वेळी मिळतात व ते आपल्याला टवटवीत आणि आनंदी ठेवतात.
जगामध्ये “सुख कणभर आहे तर दुःख मणभर”, याचे प्रमुख कारण लोकांनी पैशाला वाजवीपेक्षा जास्त महत्त्व देऊन ज्ञानाकडे पाठ फिरवली हे होय. थोडक्यात, जीवनात ज्ञानाला पर्याय नाही. मानवी जीवनात ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे. ज्ञानाइतके पवित्र, मंगल व उपयुक्त अन्य कांहीही नाही. हे ज्ञान संपादन करण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो त्याला शिक्षण असे म्हणतात.
“क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण”
त्यामुळे प्रत्येकाने ह्याचे महत्व समजून वरील गोष्टी शिकण्याची कास धरली पाहिजे
श्वसनाचे व्यायाम, प्राणायाम, सुदर्शन क्रिया आणि ध्यान केल्यावर खालील गोष्टींवर आपण नव्या जाणिवेने, सजगतेने, सकारात्मक दष्टीकोनातून बघतो आणि तिथूनच अंतर्बाह्य बदलाला सुरवात होते.
जेव्हा तुम्ही स्वतःसाठी वेळ काढून संयम उत्साहशक्ती आणि आशावाद या गुणांनी परिपूर्ण असे व्यक्तिमत्त्व घडवाल त्यावेळी बाह्य जगात तुम्हाला हवे ते तुम्ही साध्य करू शकता. जर तुम्ही तुमच्या मनाला हवे तसे वाकवू शकलात, शारीरिक काळजी घेतलीत आणि आत्म्याचे संगोपन नीट करण्यासाठी वेळ काढलात तर तुम्हाला आयुष्यात चैतन्य, आनंद आणि उत्साहाचा खजिना मिळेल. ज्या माणसाची स्वतःवर मालकी असते तो माणूस कधीही मुक्त असतो.
आपणा सर्वांना हसत-खेळत मजेत राहा आणि आनंददायी वातावरणात जगा या मनःपूर्वक सुंदर शुभेच्छा??



Very nice