Skip to content

खूप एकटं-एकटं वाटतं… आणि खूप रडावसंही वाटतं.

निचरा…


मधुश्री देशपांडे गानू


हल्ली आपण सगळीकडे नेहमी ऐकतो की सकारात्मक विचार करावा.. कृती ही सकारात्मकता दर्शवणारी असावी. आपण जसा विचार करतो तेच आपल्याकडे येतं. अगदी खरं आहे हे.. मी तर नेहमीच सांगत असते.

मी स्वतः अनुभवही घेतेच आहे. जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही चांगले बदल करायचे असतील , एखाद्या क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल तर इच्छा , सातत्य , मेहनत घेण्याची तयारी याच बरोबर सकारात्मक दृष्टिकोन आणि ऊर्जा ही तेवढीच गरजेची आहे..

पण कधीतरी ( once in a while ) तुम्हाला उदास , अनुत्साही वाटतं. काहीही करू नये , कोणाशीही बोलू नये असं वाटतं. अर्थात हे नैसर्गिक आहे.. माणूस आहोत रोबो नाही.. कायम आनंदीच असलं पाहिजे असं नाही ना..

सगळ्या भावना तितक्याच उत्कट असतात. खूप काही साचून आलेलं असतं.. रोजच्या व्यग्र दिनक्रमात लक्षात येत नाही… पण या भावनांचा निचरा होणंही तितकंच आवश्यक आहे..

खूप एकटं वाटतं. खूप रडावसंही वाटतं.. मानसिक , वैचारिक , भावनिक , बौद्धिक सगळी कोंडी होते. नक्की काय होतं हे सांगता येत नाही.. अगदी आपल्या प्रेमाच्या जिवलगाची खूप आठवण येते , काही ही ठीक नाहीये असंही वाटत राहतं.. ही एक मानसिक अवस्था आहे..

दोन ते तीन दिवसांचा कालावधी असलेली.. या कोंडलेल्या भावनांचा निचरा होणे अत्यावश्यक आहे.. ज्या व्यक्तीवर तुमचा विश्वास आहे अशा व्यक्तीकडे मन मोकळे करा. रडू येत असेल तर स्वतःला अडवू नका.. रडणं हे दुबळेपणाचे लक्षण नाही तर तुमच्या भावनिक कोंडीचा निचरा होतो..

एकटं रहावसं वाटतं अशा वेळी जनसंपर्क कमी करा. फक्त स्वतःला वेळ द्या. हलकं संगीत तुम्हाला आवडणारं ऐका.. एखादं छानसं पुस्तक वाचा. या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी हे सोपे उपाय आहेत. विश्रांती घ्या. मुख्य म्हणजे या अवस्थेतून बाहेर येण्यासाठी सहज प्रयत्न करा..

स्वतःवर मनापासून प्रेम करा. स्वतःला आहात तसे स्वीकारा.. म्हणजे तुमच्या भावनांचा निचरा होईल आणि याच अवस्थेत तुम्ही अडकूनही राहणार नाही. चाळीशी पन्नाशीच्या आत बाहेरच्या स्त्रीयांना मी काय सांगतेयं हे नीट कळत असेल. पुरुषांनाही अशा अवस्थेतून जावं लागतं.. अशा वेळी स्वतःवरचा विश्वास अबाधित ठेवायचा..

जसं श्रावणात पावसाच्या सरी बरसून गेल्यावर लख्ख ऊन पडते ना.. तसं या अवस्थेतून बाहेर पडल्यावर होतं. सगळे मार्ग स्वच्छ दिसू लागतात. परत आपण नव्या उमेदीने आयुष्याला सामोरं जातो..

हे मन रूपी कपाट वेळोवेळी उघडून स्वच्छ केले पाहिजे.. नको असलेले कपडे जसे आपण देऊन टाकतो.. तशाच नको असलेल्या आठवणींचा असा निचरा व्हायला हवा.. आणि नवीन आनंददायी आठवणींसाठी जागा करायला हवी.. बरोबर ना!……



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!