राग येण्याची कारणे आणि त्यावरील उपाय !!
सौ. वृषाली बिवरे
आज च्या भागात आपण राग येण्याची कारणे आणि त्यावरील उपाय पहाणार आहोत.
तर आपल्याला राग का येतो? राग येणे हे आनुवंशिक असू शकते. एखाद्या ताण तणावामुळे, मानसिक त्रासामुळे राग येऊ शकतो, एखाद्या भीती मुळे, अपेक्षा भंग झाल्याने, अपूर्ण अतृप्त ईच्छा,एकटेपणा, चिंता, सतत अपमान ,कधी मान न मिळणे, आर्थिक विवंचना, स्वभाव,जवळच्या व्यक्तीचा मृत्यू,लैंगिक नैराश्य, कामाचा ताण/थकवा,ट्रॅफिक जाम, अती भूक,अशी एक नाही शेकडो कारणे असू शकतात.
सुरुवातीला कुरबुर, मग चिडचिड ,राग आणि मग त्याचे रूपांतर संतापात होते. पण हा संताप स्वत:साठी तसेच दुसर्यासाठीही नुकसानदायक ठरू शकतो.
मनात दाबून ठेवलेल्या रागाचा स्फोट होऊन बाहेर आल्याने मानसिक संतुलन बिघडून त्याच्या जीवावरही बेतू शकते. पण हा संताप स्वत:साठी तसेच दुसर्यासाठीही घातक असू शकतो..
क्रोधात भवति संमोह:| संमोहात स्मृतिविभ्रम:|
स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो| बुद्धिनाशात प्रणश्यती|
भगवद्गीतेच्या ह्या श्लोकामध्ये सुद्धा रागामुळे माणूस स्वतः च कसं नुकसान करून घेतो हेच सांगितलं आहे.
परिणामी व्यक्तीला छातीत धडधड, दुखणे ,रक्तदाब, हृदयरोग,प्यारालिसिस, दमा, डोकेदुखी,झोप न येणे, पोटबिघाड, पाठदुखी,त्वचारोग, सतत चा सर्दीखोकला हे शारीरिक तसेच नैराश्य, लहरीपणा, जेवणकडे दुर्लक्ष, व्यसनाधीनता, असे मानसिक परिणाम भोगायला लागतात.
रागावर नियंत्रण कसे करावे?
आपल्याला नक्की कशाचा राग येतोय हे ओळखून, आपला स्वभाव ओळखून आणि स्वीकारून, आपल्याला राग येतोय आणि जास्त प्रमाणात येतोय हे तुम्ही मान्य केलं तरी तुम्ही खूप मिळवलं म्हणता येईल.
आपण रोज सकाळी उठल्यावर स्वतः साठी लिहून ठेवलेली सकारात्मक वाक्य वाचावी.
आज दिवसभर माझा मूड चांगला असणार आहे. मी खूप शांत आणि विचारी प्रवृत्तीची व्यक्ती आहे(अशा प्रकारे, आपल्याला योग्य वाटेल तशी सकारात्मक वाक्य असावी)
समोरच्या व्यक्तीला समजावून घ्या,
आपल्या तापट स्वभावामुळे समोरच्या व्यक्तीच्या मनावर काय परिणाम होऊ शकतो याचा क्षणभर मनात विचार आणा
समोरच्यांचीही परिस्थिती समजून घ्या, माणूस म्हंटल की चुका समोरच्याकडूनही होणार , कधी तरी आपल्याकडून ही होणार हे जाणा
रोज 5 मिनिटांपासून पुढे जमेल तशी वेळ वाढवत मेडिटेशन(ध्यान/धारणा/प्राणायाम हा फक्त अध्यात्माचा विषय नाही बरका) करा.प्राणायाम किंवा दिर्घ शासोच्छ्वास केल्याने मन शांत होते.
ज्या व्यायाम पद्धतीने दमाल, अशापद्धतीचे व्यायामप्रकार करा.
रोज आपल्या आवडीचे संगीत ऐका, ज्याला ज्या टाईप चा गाण्याचा प्रकार आवडत असेल
तो गाण्याचा प्रकार ऐकणे म्हणजे त्या व्यक्तीसाठी ती संगीतोपचार पद्धती असते.
रोज थोडावेळ स्वतः शी बोला(सेल्फ टॉक)
रोज घरच्यांशी मनमोकळे बोला आणि स्वतः ची सहनशीलता मापून पहा
स्वतः ला क्रिएटिव्हिटीमध्ये गुंतवा, चालणे, फिरणे, मोकळ्या वातावरणात जाणे, चार चौघात उठणे बसणे यांची सवय ठेवा
राग आला तर तो गिळून टाकू नये, लांबणी वर टाकावा, उलटे अंक मोजवेत जेव्हा आपण शांत होऊ तेव्हा सोप्या साध्या शब्दात समोरच्याला आपले म्हणणे सांगावे
दर वेळी आपलेच म्हणणे सगळ्यांनी ऐकावे असा अट्टहास सोडावा
त्याच त्याच घटना पुन्हा पुन्हा आठवू नये
भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा विचार करण्यापेक्षा वर्तमानात जगावे, आहे त्या क्षणाचा आनंद घ्यावा
कधी कधी हलके फुलके पिक्चर बघावे
जेव्हा केव्हा राग येईल तेव्हा त्या ठिकाणाहून निघून जाऊन मन शांत करावे नंतर बोलावे आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, आपण कोणी संत मंडळी नाही पण तरीही समोरच्याला आपल्या स्वास्थ्यासाठी माफ करावे. माफ करण्याइतका दुसरा आनंद नाही.
खरंच एवढी मोठी चूक असते का हो की आपण एखाद्याचा एवढा द्वेष करावा, मोठ्या मनाने समोरच्याला माफ करून तुम्ही त्या व्यक्तीसकट जगण्याचा आस्वाद घ्यावा.
ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जमल्या तर मग चिंता कसली, म्हणूनच म्हणावसं वाटतं…
||नको रे मना क्रोध हा खेदकारी
नको रे मना काम नाना विकारी
नको रे मना सर्वदा अंगिकारु
नको रे मना मत्सरु दंभ भारू||



खुप छान आहे
राग शांत झाला
खूप छान