सायकॉलॉजिस्ट : काळाची गरज
सौ. माधुरी पळणिटकर
सातारा.
मानसशास्त्र (psychology) सायकॉलॉजी हे मन व वर्तणूक याचा अभ्यास करणारे विज्ञान आहे. हा शब्द रुडॉल्फ गॉवेल या जर्मन तत्त्वज्ञानाने 16 व्या शतकात तयार केला होता. हा शब्द (psyche) सार्रकी व (logus) लोगस या शब्दावरुन आलेला आहे. या ग्रीक शब्दाचा अर्थ आत्म्याचे शास्त्र असा आहे.
मानसशास्त्राचा अभ्यास हा अधिक सखोल व तत्त्वज्ञानावर आधारित आहे. त्यामुळे सायकॉलॉजी हे एक कलागुणांना आव्हान देणारे, तितकेच अवघड करिअर क्षेत्र आहे. कारण ते सर्वव्यापी आहे. संरक्षण क्षेत्राशी संबंधित प्रत्येक संस्थेत मानसशास्त्र अभ्यासकाचे अत्यंत महत्त्वाचे योगदान आहे. सायकॉलॉजिस्ट लोकांच्या समस्यांवर कौन्सेलिंग व थेरपीच्या मदतीने उपाय सांगतात व ती समस्या गंभीर होण्याच्या आत निवारण्यास मदत करतात.
सम+उप+आदेश (आदेश-अत+ईश) अशा प्राकृत मराठी संधीतून समुपदेशन हा शब्द तयार होतो. याचा अर्थ एखाद्याला उत्तम सल्ला देणे ज्याद्वारे समस्येला पर्याय निवडून सर्वांचाच लाभ होईल.
शरीर व मन यांचा परस्परांशी संबंध आहे.
आपले मन विश्वमनाचा एक अंश आहे. एका भरकटलेल्या व्यक्तीला योग्य दिशा समुपदेशकच करु शकतो. counselling ही आता काळाची गरज बनली आहे. समुपदेशन ही उपचाराची अशी पध्दत आहे की ज्यामध्ये तणावग्रस्त व्यक्तीला समजून घेऊन तसेच आजूबाजूच्या व्यक्तीची परिस्थिती समजून घेऊन, त्या व्यक्तीला स्वत:च्या वैचारिक भावनिक प्रक्रियांमध्ये बदल घडवण्यास प्रवृत्त करुन जीवनातील विविध समस्यांना तोंड देण्याची त्या व्यक्तीची क्षमता वाढवली जाते. त्या व्यक्तीला सक्षम केले जाते.
लहान मुलांच्या समस्या, आर्थिक समस्या, कौटुंबिक समस्या, पती-पत्नीमधील समस्या, वृध्द व्यक्तींच्या समस्या, शारीरिक व मानसिक आजारपणाच्या समस्यांवर मृत्यूची भीती, अपंग मूल अशा सगळ्या प्रश्नांवर एकच उत्तर समुपदेशन.
समुपदेशक हा तुमच्या आयुष्याच्या प्रवासातला तुमचा सहप्रवासी असतो. मत न बनवणे, परानुभूती असणे, गोपनीयता राखणे यासाठी तो प्रशिक्षित असतो. तो तुम्हाला स्वत:ला मदत करायला शिकवतो. खरंतर प्रत्येकालाच थोडी फार समुपदेशनाची गरज असते, कारण प्रत्येकाचेच स्वभाव वेगळे असतात.
फक्त कमजोर मनाच्या लोकांनाच समुपदेशनाची गरज असते, असा गैरसमज आहे. समुपदेशनामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो. अगदी एखाद्या व्यक्तीला जीवनाबाबत सर्वच स्तरावर अपयश आले. ती एकटी पडली की तिला आत्महत्या करावीशी वाटते. जेव्हा सगळ्या वाटा बंद होतात तेव्हाच व्यक्ती आत्महत्येसारखी टोकाची भूमिका घेते.
अशावेळेस तिला समुपदेशकाची गरज असते. त्या व्यक्तीच्या मनात वर्षानुवर्षे साचलेली दु:खे, वादळे सांगण्याकरिता एखाद्या आधाराची गरज असते. वेळीच जर अशा व्यक्तींना समुपदेशक मिळाला तर ती व्यक्ती सकारात्मक होऊन वाचू शकते. समुपदेशन कार्यक्रम हे समाजात राबवले पाहिजेत.
उदा. व्यवसाय समुपदेशन कार्यशाळा, व्यक्तिमत्त्व विकास पालकत्व, कुमारावस्थेतील मुलांच्या समस्या, पोस्टपार्टम डिप्रेशनमध्ये जाणवणारा एकटेपणा, रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रियांमध्ये येणारे नैराश्य व अस्वस्थता कारण हेच प्रमुख महत्त्वाचे घटक आहेत.
समुपदेशनाची गरजच काय असा बुरसटलेला समाज विचार करत असतो. वैवाहिक समुपदेशनामध्ये प्रामुख्याने दोन गोष्टींचा समावेश होतो. विवाहपूर्व समुपदेशन आणि विवाहानंतर समुपदेशन. आजकाल समुपदेशन सर्व स्तरावर अत्यावश्यक झाले आहे.
चांगल्या समुपदेशनामुळे जोडीदाराबरोबरचे नातेसंबंध सुधारतात. दररोजची भांडणे कमी होतात. लैंगिक समस्या दूर होतात. पुष्कळ जणांना भीती (फोबिया) असतो. त्यावरही मात करता येते. समुपदेशनात लोकांना बोलते केले जाते. त्यांच्या मनात प्रदीर्घ काळात साचलेल्या कडू आठवणी, अपमान, मनावर झालेले आघात, अप्रिय घटना सर्व लोक व्यक्त करतात आणि मग आजाराचे निदान होते.
त्यांच्यावर त्यामुळे झालेले परिणाम समुपदेशकाला लगेच ओळखता येतात. सायकिअॅट्रिस्ट व समुपदेशक यांच्यात फरक आहे. सायकिअॅट्रिस्टचे मूळ शिक्षण वैद्यकीय क्षेत्रातले असते.
सायकिअॅट्रिस्ट या विषयात मुख्यत्वे मेंदूचे कार्य कसे चालते? मेंदूत विचार, भावना, वर्तन याचे होणारे परिणाम व औषध यांचा विचार अधिक खोलवर होतो. औषध मेंदूपर्यंत पोहोचवून आजार बरा करणं खूप आवश्यक असते. मेंदूतली रसायने यांचे नियंत्रण राखून पेशंटला ट्रीटमेंट दिली जाते.
मेंदू आणि त्याचे जीवशास्त्र हा भाग सायकिअॅट्रिस्टचा आणि या विषयासंबंधातले सामाजिक परिणाम हा भाग सायकॉलॉजीमध्ये येतो. तुम्ही किती जगलात यापेक्षा कसे जगलात हे जास्त महत्त्वाचे असते.
समुपदेशनाचा अवलंब करायला लागणे म्हणजे स्वत:च्या बुध्दिमत्तेची, आत्मविश्वासाची, स्वत्वाची कौटुंबिक एकजुटीची हार आहे असेही बर्याच लोकांना वाटते. शरीरावर खरचटले तर जखम तीव्र होऊ नये म्हणून त्वरित मलमपट्टी करतात पण भावनिक दुखापत झाल्यास भावनिक प्रथमोपचार आणि वैचारिक मलमपट्टी करणे हे गरजेचे मानले जात नाही.
विसंगतीचा अभ्यास करुन समुपदेशक समुपदेशनाची प्रक्रिया जबाबदारीने पार पाडतात. समुपदेशकांचा विश्वासपूर्ण नाते जोडण्यावर भर असतो. समुपदेशन घ्यायची वेळ आपल्या घरातल्या कुणावर आली तर पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते.
आपल्या मुलाला किंवा मुलीला समुपदेशनाची आवश्यकता आहे. हा आपला अपराध आहे असंही भावनाशील पालकांना वाटते. एखादं होकायंत्र दिशा दाखवतं तसेच समुपदेशक सर्व गरजू लोकांना मदत करतात. आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल, संगणक, इंटरनेट इत्यादी दृकश्राव्य साधनांद्वारे नको ते विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टिक्षेपात येतात. त्यामुळे ते बाह्य प्रलोभनांना बळी पडतात. कधी कधी गैर मार्गाकडे आकृष्ट होतात. सततच्या परीक्षा, खासगी वर्ग, खेळण्यावर मर्यादा, मित्र-मैत्रिणीत होणारी तुलना, पालकांचे दुर्लक्ष इत्यादी कारणांमुळेही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व वैयक्तिक जीवनात समस्या निर्माण होतात. त्यांना समुपदेशनाची नितांत आवश्यकता असते.
प्रसिध्द मानवशास्त्रज्ञ सर एडवर्ड बर्नेट टायलर यांच्या मते स्वत:चे व्यक्तिमत्त्व व स्वत:मधील गुणांचा उपयोग प्रगतीशील अडथळे दूर करण्यासाठी कसा करता येईल याचा शोध घेण्यासाठी व्यक्तीस मदत करणे हे समुपदेशकाचे काम होय.
मार्गदर्शन व सहकार्य करण्याची आवड, आत्मविश्वास, सहनशीलता इत्यादी गुणांमुळे समुपदेशकाचे व्यक्तिमत्त्व प्रत्ययास येते. त्यामुळे अगदी मोठमोठ्या कंपन्यांमध्येही कामगार आणि मालक यांच्यातही समुपदेशनाची आवश्यकता वाढली आहे.
मुख्य म्हणजे समुपदेशन करणारी व्यक्ती ही धीर, आधार, मनातील भावनांचे नियंत्रण, एखाद्या प्रश्नाकडे त्रयस्थपणे बघण्याची दृष्टी यासारखे बरेच छोटे छोटे मुद्दे त्या व्यक्तीला समजावून सांगते. त्यामुळे व्यक्तीची गोंधळलेली मन:स्थिती शांत होते.
जीवनाकडे बघण्याचा आशावादी दृष्टिकोन लोकांच्या मनात निर्माण होतो. सध्या पूर्वीसारखा जिव्हाळा, प्रेम खूप कमी झाला आहे. नातेसंबंध नको, जबाबदारी नको, फक्त स्वत:पुरता विचार करण्याची वृत्ती वाढली आहे.
इतकी स्पर्धा आहे की, संवाद आवश्यक असतो तोच नसतो. सध्याची परिस्थितीही त्याला कारणीभूत आहे. टेन्शन, दबाव, चिंता कधी शारीरिक व्याधी यामुळे मन स्वास्थ्य हरवले आहे. बोलायला कुणी नाही, ऐकायला कुणी नाही याचा मनावर जास्त परिणाम होतो. कधी वाढत्या अपेक्षा, कधी पूर्ण न झालेल्या साध्या अपेक्षा, चंदनासारखं झिजूनही वाट्याला आलेली उपेक्षा, विश्वासघात, जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, अपघात अशी असंख्य कारणे असतात.
हळूहळू त्याचा परिणाम शरीरावर होऊ लागतो. शारीरिक व्याधी जडतात. नैराश्याच्या गर्तेत, खोलवर व्यक्ती जखमी होऊन पडते. अशावेळेस त्यांना हात देऊन परत मनाची उभारी समुपदेशक करतो. आयुष्याचं साधं सरळ गणित असतं, जगा आणि जगू द्या; परंतु खूप लोकांना ते कळत नाही. कळतं तरी वळत नाही. प्रश्न आहेत पण उत्तरही आहेत.
खरंतर स्वभावात थोडा बदलही समोरच्याला आनंद देऊ शकतो. कुत्सित बोलणं, सदोदित दुसर्याला कमी लेखणं, अपमान करुन दुसर्यांना दुखावणं, सतत निंदा, दुसर्याचे पाय खाली खेचणं हे दोष कमी करता येतात. आसुरी आनंद मिळवण्यातच जे स्वत:ला धन्य समजतात त्यांनाच खरी समुपदेशनाची जास्त गरज आहे.
समाजाला न घाबरता समुपदेशकाची मदत घ्या. समाज फक्त बघ्याची भूमिका करतो. मन मोकळं करा, भावनिक गुंतागुंत सोडवण्यासाठी ते तुम्हाला मदत करतात आणि करिअरसाठीही सायकॉलॉजी अत्यंत उपयोगी आहे.
चाईल्ड सायकॉलॉजी, सोशल, एज्युकेशनल, क्लिनिकल, पॉझिटिव्ह सायकॉलॉजी. तुम्ही तुमचे व्यक्तिमत्त्व ते शिकत चौफेर फुलवू शकता आणि दुसर्यांच्या चेहर्यावरचा गेलेला आनंद एक सायकॉलॉजिस्ट होऊन परत आणू शकता.
आज ही काळाची गरज आहे. कौन्सेलिंग सर्वच स्तरात मूलभूत गरज बनणार आहे. सायकॉलॉजिस्ट मार्गदर्शन करुन एकच सिध्द करतो. समस्या असतील तरी, प्रश्न कितीही जटील असला तरी त्याला आपल्याकडे उत्तर आहे. सायकॉलॉजिस्ट काळाची गरज आहे !


