“सुंदर मी होणार”…
मधुश्री देशपांडे गानू
काय आहे ना. आपण नेहमीच माणसांना त्यांच्या दिसण्यावरून जज्ज करतो. आतून बाहेरून ती व्यक्ती आरोग्यपूर्ण आहे की नाही हा विचारच करत नाही. बारीक आणि गोरा रंग म्हणजे सुंदर आणि स्वस्थ अशी आपली गोड गैरसमजूत आहे.
सुबक सुंदर आणि अनेक आजाराने ग्रस्त व्यक्ती पण सुंदरच आपल्या साठी. वजन आटोक्यात ठेवलं पाहिजे हे बरोबरच आहे. पण सरसकट एकच मापदंड सगळ्यांना लावू नये. वंशपरंपरेने ही बांधा कमी जास्त असू शकतो.
पण आपण सरसकट कोणाबद्दल ही मत व्यक्त करतो. विशेषतः स्त्रीयांबद्दल तर जास्तच. आपल्याकडे सौंदर्याच्या व्याख्या फारच तकलादू आणि कचकड्यांच्या आहेत.. सौंदर्य हे ईश्वराचं आई वडिलांचं देणं आहे. आपलं कर्तृत्व काहीच नाही यात..
आणि सगळ्यात महत्वाचे मनाचे आरोग्य तर खिजगणतीतही नसते.. त्यातून स्त्रीच्या मनाचे आरोग्य तर फारच क्षुल्लक बाब..
पण मनाच्या आरोग्याचा शरीराच्या आरोग्याशी घनिष्ठ संबंध असतो. जर मन नितळ , शांत , सुंदर , आनंदी आरोग्यपूर्ण असेल तर शरीरावर सकारात्मक परिणाम दिसून येणारच.
चेहरा तजेलदार आनंदी दिसणारच… .. कारण हा आनंद आतून आलेला असतो. बाह्य गोष्टींवर किंवा कोणा एका व्यक्तीवर अवलंबून नसतो.. इथे जाड आणि बारीक असा सरसकट न्याय लागू पडत नाही.
बऱ्याचदा बालपणापासून असलेली आजूबाजूची परिस्थिती कठीण प्रसंगातून आलेला अनुभव ताणतणाव याचाही शरीर-मनावर दूरगामी परिणाम होतो. पण माणसाचं मन सुंदर हवं.. विनम्र ,सेवाभावी, गोड स्वभावाची माणसं ही हवीहवीशी वाटतात.
तर फक्त बारीक आणि गोर म्हणजे सुंदर असं होत नाही. पण पन्नाशीतही सोडवा दिसण्याचा हास्यास्पद अट्टाहास स्त्रीया करताना दिसतात.. आणि त्यालाच पुरुष सुंदर म्हणतात.. कारण आपल्याला असं च शिकविलेलं असतं..
अतिशय सुंदर आणि अतिशय कृपण स्त्रिया पाहिलेल्या आहेत. खरंतर आयुष्य कर्तृत्वाने, सकारात्मक दृष्टी , अनेक संकटांवर मात करूनही आयुष्य जगण्याची उमेद आणि ऊर्जा , सुदृढ आरोग्यपूर्ण शरीर आणि सकस आनंदी मन आणि सर्वात महत्वाचं वय आनंदाने मान्य करून भरभरून जगण्याची उर्मी आणि प्रगल्भता असणारी कोणतीही व्यक्ती ही संपूर्णपणे “सुंदरच” असते…
त्यामुळे कोणावरही सहज ताशेरे ओढताना किंवा सरसकट नावं ठेवताना सूज्ञ माणसाने विचार करावा.. आणि आपण कसे अंतर्बाह्य सुंदर होऊ यासाठी नक्कीच प्रयत्न करावेत….



सौंदर्याची खरी व्याख्या या लेखात केली आहे. व्यक्तिमत्व विकसनातील हा गाभा आहे.