Skip to content

पालकांचं आपल्या मुलांसोबत नातं कसं असावं…वाचा या लेखात.

पालकांचं मुलांसोबत नातं कसं असावं??


सौ. भारती गाडगीलवार


२१ व्या शतकात सर्व काही आधुनिक होतं चाललंय अगदी नातेसंबंध देखील असं म्हटलं तर??

जसजसा शिक्षणाचा विस्तार झाला तसतसा लोकांच्या मानसिकतेतही बदल झालाच ना…. नाही पटलं??

आपली मुळ भारतीय संस्कृतीला छेद देत पाश्चात्य संस्कृतीचा स्विकार करत आहे असंच चित्र समाजात दिसतंय….साधं हेच बघा ना आज लग्न म्हणजे एक खेळंच झालाय जणू विचार पटले नाही तर घटस्फोट आणि त्यानंतर दुसरं लग्न….तसंच आजच्या विभक्त कुटुंबपद्धती असलेल्या कुटुंबात मुलं आपल्या पालकांना आवरत नाही… त्यांना समुपदेशनाची आवश्यकता पडते आहे….

आता हा समुपदेशन शब्द याआधी ऐकलेला आठवत नाही न….. नेमकं आताच्या काळातच या शब्दाला किती महत्व आलं आहे न….लग्न टिकवण्यासाठी, बालसमस्या सुधारण्यासाठी, इतकंच काय तर नौकरी, व्यवसाय यासाठी देखील समुपदेशन….

आजकाल तर मुलांना कसं शिकवावं, संस्कार, सवयी यासाठी वेगवेगळे विडिओ सुद्धा तयार केले जातात….संस्कार करणाऱ्या वडिल मंडळींची जागा आता ही असली माध्यमं घेत आहेत ही एक शोकांतिकाच आहे….

बऱ्याच घरात मुलं आपल्या आई-वडिलांच्या धाकात असतात….मुलं/ मुली आपल्या अडचणी आई-वडिलांना न सांगता मित्रांना सांगतात….. आपल्या मुलांना काही त्रास होतो का हे त्यांच्यापेक्षा त्यांच्या मित्र/ मैत्रीणींना ठाऊक असतं…..

मग आपल्या म्हणण्याचा ती विरोध करतात या निकषांवर त्यांना समुपदेशक योग्य पद्धतीने सांभाळेल असा समज तयार होतो….

यापूर्वी समुपदेशक हा शब्द किमान बालकांच्या संदर्भात ऐकलेला मला तरी ऐकिवात नाही….

अशी परिस्थिती निर्माण झाली आहे आज की मुलांना समुपदेशनाची गरज वाटत आहे….का?

आज आपण याच विषयावर विस्तृत चर्चा करणार आहोत…..

सर्वप्रथम आपण कारणे जाणून घेऊया……

‌ पालक आणि मुलं यातील दुराव्यास आधुनिक विचारसरणी, विभक्त कुटुंबपद्धती, घरातील वातावरण, आई-वडील यांपैकी एकाचा मृत्यू झाला असल्यास, पालकांच दुर्लक्ष, व्यसनी पालक, अती लाड, मुलांवर हात उचलणं इ. कारणांमुळे मुलं आपल्या पालकांपासुन दुरावतात….

मुलांसोबत प्रेमाचं नातं निर्माण करण्यासाठी काही बाबींवर लक्ष देऊया

मुलांवर अधिकार गाजवू नका. त्यांचे मित्र बना:

प्रत्येक पालकाचा आपल्या मुलावर अधिकार असतो पण तो दाखविण्याची गरज नसते. त्यांच्यासोबत मैत्रीच नातं असलं की मुलं आपोआपच आपल्यावर विश्वास ठेवतात.

उदा. मुलांकडून एखादी चूक झाल्यास तो त्याच्या मित्रांना सांगतो वडिलांना नाही…कारण तो जाणतो मित्र त्याला रागावणार नाही. पण वडील रागावतील…. अशावेळी मुलगा अतिशय घाबरतो…. अशावेळी वडिलांनी विचार केल्यास जर माझ्याजागी मित्राचा मुलगा असता तर… वडिलांनी मुलांसोबत प्रेमळ संवाद साधला तर पालक आणि मुलं यात मैत्रीचं नातं निर्माण होऊ शकते.

मुलांकडून जास्त अपेक्षा करणं टाळावं :

आपल्या मुलाने इतरांपेक्षा जास्त गुण मिळवावे अशी अपेक्षा ठेवल्यास मुलांवर अभ्यासाचा ताण येतो. त्यातून मुलांवर मानसिक दबाव येतो आपण त्यांच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाहीत या तणावामुळे त्यांच लक्ष केंद्रित होत नाही. म्हणून पालकांनी मुलांकडून अपेक्षा टाळाव्यात.

मुलांचा अपमान करणं सोडा :

प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा आत्मसन्मान असतोच मग तो लहान असो वा मोठा….आपला अपमान होतो तेव्हा आपण निराश होतो. आपण जर कठोर शब्द सहन करु शकत नाही तर मुलांनाही इतरांसमोर किंवा घरातच अपमानास्पद किंवा कठोर शब्दांत बोलू नये. जसं की तुला कळतंच नाही, तुला जमणार नाही, याने मला खूप त्रास दिला आहे इ. अशा नकारात्मक बोलण्याने त्यांच्या मनावर परिणाम होतो. पालक स्वतः मुलांचे प्रेरणा बनायला हवे पण अशा नकारात्मक बोलण्याने मुलांच्या मनावर परिणाम होतो…. असं करणं टाळावं….

इतरांसमोर मुलांचे दोष सांगू नका :

इतरांसमोर आपल्या मुलांची निंदा करुन त्यांना वाईट सिद्ध करु नये. सगळे चांगले नी आपणच तेवढे वाईट अशा विचाराने मुलांना मानसिक ताण येतो. आपल्या मुलांच्या समस्या इतरांना न सांगता स्वतः सोडवाव्यात.

मुलांना प्रत्येक कार्य प्रेमानं करायला सांगा. जी गोष्ट
प्रेमानं होऊ शकते ती रागावुन होणार नाही हे लक्षात घ्या.

मुलांना सांगताना तुम्ही काय करताय हे आधी बघा

जर तुम्ही दिवसभर टी.व्ही. आणि मोबाईल बघत असाल तर मुलांना सांगण्यात काही अर्थ नाही. कारण मुलं आपलीच अनुकरण करतात त्यांना रागवून काहीच होणार नाही. आधी आपल्या सवयीत सुधारणा करा नंतर मुलांना सांगा.

मुलांना पैशा पेक्षा प्रेम महत्वाचे आहे हे शिकवा.

मुलांसाठी वेळ द्या. आपल्या कामातला थोडा
वेळ मुलांसोबत घालवा नाहीतर मुले तुमच्या पासून
दूर जातील.

मुलांच्या सर्व समस्या शांतपणे ऐकून घ्या.

मुलांसमोर स्वतःची चूक मान्य करा यामुळे मुलं त्यांची
चूक तुमच्या समोर स्विकारतील.

मुलांना चुका लक्षात आणून द्या :

जर मुलं चुकीचे वागत असतील तर त्यांना त्याची जाणीव करुन द्यावी. जर तुम्ही त्यांच्या वागण्याकडे दुर्लक्ष केले तर मुलांना ती चूक करण्यासाठी एक प्रेरणा मिळेल, आणि संमती देखील… आणि ते आपल्या चुकांची पुनरावृत्ती करत जातात….

म्हणून त्यांना योग्य वेळी चूकांवर योग्य मार्गदर्शन करुन योग्य मार्गावर आणा. प्रत्येक वेळी असं करु नकोस तसं करु नकोस असं म्हणण्यापेक्षा असं करुया आपण असं प्रेमानं समजविणेच योग्य राहते.

मुलांना परीणाम सांगा :

मुलांना समजावून सांगितल्यावर ही ऐकत नसतील तर त्या चुकीचे होणारे परिणाम समजावून सांगावे जसं की वेळ वाया घालवण्याने किती नुकसान होते परीक्षेत अपयश येऊ शकते, वर्ष वाया जाऊ शकते, मोबाईल फोनचे दुष्परिणाम त्यांना दाखवा इ. यातुन त्यांना त्यांची चूक लक्षात येईल.

मुलांना योग्य शिस्त लावणे :

शिस्त हा ध्येय आणि यश यामधील एक पूल आहे. शिस्त लावण्यासाठी कठोर शब्दांची गरज नाही प्रेमळ शब्दांद्वारे देखील शिस्त लावता येते. कोणतीही शिस्त लावण्यासाठी प्रथम स्वतः ती अंगिकारावी तरच मुलंही प्रतिसाद देतील उदा. लवकर उठायची शिस्त लावण्यासाठी स्वतः लवकर उठावे कारण मुलं आपल्याच अनुकरणातून शिकतात…

मुलांना उदाहरणे द्या पण तुलना करु नका :

प्रत्येक व्यक्ती हा भिन्न वैशिष्ट्यांनी युक्त असतो जसं कोणी अभ्यासात हुशार,कोणी गायन, कोणी नृत्य याप्रमाणे म्हणून एकमेकांसोबत तुलना योग्य नाही. पक्षी आकाशात उडतो तर मासा पाण्यात पोहतो…माशाला उड म्हणता येणार नाही तर पक्षाला पोहणं अशक्य….. याप्रमाणे आपल्या मुलांतील गुण हेरुन त्यानुसारच प्रोत्साहन दिले पाहिजे.

अशाप्रकारे वर उल्लेखित सर्व गोष्टी घरातील वडीलधारी मंडळी सांगतील तर कोणी ऐकतं का?

उत्तर आहे नाही….. आजच्या काळात बऱ्याच ठिकाणी सुन, मुलगा सुद्धा वडिल मंडळींच्या सुचना मान्य करत नाही असं दिसतंय…. त्यांच्या काळात घर म्हटलं तर एक छोटेखानी गाव असायचं…. अनेक पिढ्या गुण्यागोविंदाने नांदत…. संस्काराची तर रेलचेल असायची…..प्रत्येकाला किमान ४ ते ५ मुलं असत. सर्वच संस्कारांनी युक्त….. आणि आज एक देखील सांभाळणं कठीण असते…..

नौकरी, व्यवसाय यांमध्ये वेळच मिळत नाही मुलांसाठी…. मुलांना गुंतवून ठेवण्यासाठी टी.व्ही., मोबाईल, व्हिडियो गेम्स बघण्यात मग्न असतात मुलं….अभ्यासात लक्ष केंद्रित होत नाही…..या सर्वांवर उपाययोजना म्हणून शक्य तितका वेळ मुलांना दिल्यास आपसातील जवळीक वाढत जाईल.

सतत खेळीमेळीचं वातावरण ठेवणं, फावल्या वेळात मुलांसोबत ड्राॅईंग, पेंटिंग्ज, बनवणं, बॅडमिंटन, क्रिकेट खेळणं आणि शक्य असल्यास विक एंडला किंवा सुट्ट्यांमध्ये फिरायला जाणे इ. जरी केलं तरीही पालक बालक नात्यात ओढ निर्माण होते. आणि मग अशा कोणत्याही समुपदेशकांची गरज पडेल असं मला तरी नाही वाटत……!!


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

??

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

2 thoughts on “पालकांचं आपल्या मुलांसोबत नातं कसं असावं…वाचा या लेखात.”

  1. Adv पल्लवी कदमबांडे

    खूप छान आहे तुमचा लेख. तुम्ही नेहमीच छान आणि महत्व पूर्ण माहिती देतात. खास करुन मुलांना समजून घेण्यासाठी मदत होते. धन्यवाद

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!