Skip to content

समलिंगी की विरुद्धलिंगी आकर्षण…हा विकास आपल्यात कसा घडतो ?

लेस्बियन! गे! बाय! ट्रान्स! …आणि स्ट्रेट!


अपूर्व विकास


– “तुला काय वाटतं?
ही गे-लेस्बियन प्रकरणं नैसर्गिक असतात?”
– “ही प्रकरणं या विश्वाच्या बाऊंडरीच्या आत घडतात?”
– “म्हणजे काय? हो, अर्थातच.”
– “याचाच अर्थ ती नैसर्गिक असतात.”

– “मला पूर्वी वाटायचं, की ही वैचारिक गोंधळ झालेली लोकं असतात. पण आत्ता परवाच एक मोठ्ठा धक्का बसला. माझा एक मित्र आहे. दहा वर्षं ओळखतो मी त्याला. माझ्या माहितीतल्या खूप बुद्धिमान, समजदार, संवेदनशील माणसांपैकी एक. तुला सांगतो, मला काहीच कल्पना नव्हती.

परवा कळलं, तो चक्क गे आहे! आणि हे आजचं नाही. वयाच्या तेराव्या वर्षी कळलं त्याला, म्हणाला तो! आजपावेतो तीन सिरियस बॉयफ्रेंड झालेत त्याचे! मला हसत-हसत म्हणाला, सुरुवातीला मीही त्याचा एक क्रश होतो! च्यायला, मी जागेवर थंड पडलो! मुली ओढणी वर घेतात अशावेळी; मी उगाच शर्टाची कॉलर झाकून घेतली!

माझ्या डोक्यात विचारांची चक्र फिरू लागली. वैचारिक गोंधळ त्याचा नव्हे; माझाच झालाय! तो आनंदात आहे! नक्की काय सीन आहे हा? एक पुरुष एका पुरुषाकडे कसा काय ओढला जातो? एक बाई दुसऱ्या बाईला इंटरेस्टिंग का वाटू लागते? पण नंतर मी असाही विचार केला :- मी माझ्या माधवीकडे ओढला गेलो, हे तरी कसं झालं?

मला एखादा माधव का नाही आवडला? तिलाही मीच का आवडलो? एखादी माधवी का नाही? आणि या सगळ्यापलीकडे… ते ट्रांसजेंडर नावाचं प्रकरण… मला जरा समजावून सांगतोस?”

– “मित्रा, हे लोक म्हणजे ‘होमोसेक्शुअल’; आणि आपल्यासारखे स्ट्रेट म्हणजे ‘हेटरोसेक्शुअल’, या शाब्दिक खेळापलीकडे बेसिकली लैंगिकता म्हणजे काय, हेच आपण नीट लक्षात घेत नाही. आधी ती नीट समजून घेऊ.

‘स्त्री’ आणि ‘पुरुष’ हे शब्द विसरून जा. त्याऐवजी ‘स्त्रीत्व’ आणि ‘पुरुषत्व’ ही तत्व लक्षात घे. Femininity आणि Masculinity. याचा तुमच्या शारीरिक लिंगाशी काहीही संबंध नाही.

आणि हो; स्त्रीत्व म्हणजे बायकीपणा नव्हे. पुरुषत्व म्हणजे पुरुषीपणाही नव्हे. स्त्रीत्व, म्हणजे सृजन! रचना! कला! संगीत! आपली vibrant creativity. आणि पुरुषत्व म्हणजे सृजनाभोवतालचं संरक्षक कोंदण! कणखर! बुलंद! आपली stable stability.

शरीरापलीकडे, मानस अस्तित्वात असतात ही तत्व. माधव आणि माधवी या दोघांमध्येही या दोन्ही तत्वांची बीजं असतात, अगदी गर्भावस्थेपासूनच. जन्माला येतो, तेव्हा या दोन्ही बीजांना अंकुर फुटलेले नसतात.

तेव्हा आपल्या मनात स्वतःची लैंगिक ओळख अगदी सूप्त असते. आपण स्वतःला आईचंच एक एक्स्टेंशन समजत असतो. मग वाढ होऊ लागते. तसे अनुभव येऊ लागतात. आपण आयुष्याला प्रतिसाद देतो. त्यावर आयुष्याकडून प्रतिक्रिया येतात.

त्यांचे संस्कार आपल्यावर येतात. त्यातून आपली लैंगिकता घडते. त्यात कधी कुणाचं पुरुषत्व वाढीस लागतं; तर कधी कुणाच्या स्त्रीत्वाला प्रोत्साहन मिळतं. एखादा माधव किंवा एखादी माधवी ‘सॉफ्ट’ असतात. Feminine. मृदू. कोमल. संवेदनशील. एखादा माधव किंवा माधवी ‘ढासू’ असतात. Masculine. जोमदार. दणकून. बिंधास्त. ही झाली लैंगिकता. Sexuality.

आता विषय हा, की ही लैंगिकता सेक्ससाठी साथीदार निवडण्यात कोणती भूमिका बजावते? सांगतो. एक नेहमी लक्षात ठेवायचं. सेक्स हा ‘फक्त शारीरिक’ कधीच नसतो. फक्त पोरं काढणं एवढाच त्याचा मर्यादित उद्देश नसतो.

तो त्यापलीकडे, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक अशा अस्तित्वाच्या वेगवेगळ्या पातळ्यांवरही असतो. सगळी सोंगं उतरवून स्वतःच्या सत्य स्वरूपाचं दुसऱ्याशी मीलन घडवणं, म्हणजे सेक्स. मुद्दा हा, की आपल्या लैंगिकतेनुसार, आपण सेक्समध्ये काय शोधत असतो? उत्तरासाठी हे लक्षात घे –

स्त्रीत्व हे एका फुलाच्या भूमिकेत असतं. त्याची अपेक्षा असते, कुणीतरी यावं… अन् आपल्या पाकळ्या उलगडत जावं… उत्कटतेने आपल्या अंतरंगात शिरावं… खोल, खोल… माझ्या माझ्याचबद्दलच्या जाणिवांना एकेक करून जागं करत… आणि मला माझाच अनुभव द्यावा…

पुरुषत्व हे भ्रमराच्या भूमिकेत असतं. त्याला उत्साह असतो, मुशाफिरीचा! फिरावं. शोधावं. सापडलं की वश करावं. केलं की उत्फुल्ल होऊन भिडावं. आणि अनुभवावं!

इथे एक मुख्य फरक लक्षात घे.

– स्त्रीत्वाला हवंय, “मला माझा अनुभव घ्यायचाय…
…आणि हे काम जी व्यक्ती सर्वोत्कृष्ट प्रकारे करेल, ती मला हवी!”
– पुरुषत्वाला हवंय, “मला दुसऱ्याचा अनुभव घ्यायचाय…
…आणि जिला अनुभवणं माझ्यासाठी सर्वोत्कृष्ट असेल, ती व्यक्ती मला हवी!”

आता विषय हा, की सॉफ्ट माधव, ढासू माधव, सॉफ्ट माधवी आणि ढासू माधवी, या चौघांतून आपण आपल्यासाठी ‘सर्वोत्कृष्ट’ कसं निवडतो? टीन-एज आणि तारूण्यात आपल्या लैंगिक जाणिवा विकसित होत असताना आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती, संस्कृती, लोकांची वृत्ती, आपली प्रवृत्ती, स्वानुभव, आणि या सगळ्यातून घट्ट होत गेलेल्या आपल्या धारणा ही निवड करतात.

तुला पनीर मसाल्याबरोबर कुलचा चालत नाही; बटर नान हवा असतो. का? कदाचित आयुष्यात खाल्लेला पहिलाच बटर नान खूप झकास होता. कदाचित त्याच्या आधी किंवा नंतर तू कुलचे खाल्ले असशील. कदाचित त्यातले काही चांगलेही असतील. पण कुठेतरी तुला जाणवलं असेल, की नानमुळे मिळणारी पोटभर तृप्ती त्यात नाही!

आता पनीर मसाल्याच्या ठिकाणी लैंगिकता ठेव. कुलचा आणि नानच्या जागी आपल्या चर्चेतल्या चार हिरो-हिरॉईनपैकी कुणाला कुठे ठेवायचं, हे तुझ्या आयुष्यभराच्या मनोलैंगिक घडणीवर अवलंबून आहे. मुद्दा हा नाही की समोर बाप्या आहे की बाई आहे. मुद्दा आहे, आपल्याला हवी असलेली एकात्मतेतील तृप्ती…! ती जिथे मिळेल, तो आपला बटर नान!

कधी एका माधवला कॉलेजमध्ये ragging होताना दुसरा एक माधव येऊन वाचवतो; जवळिकीच्या एका नाजूक क्षणी दोघांना एकत्व गवसतं. कधी एखाद्या माधवीला कल्पनाही नसते, तिच्यात ‘वेगळी’ बीजं आहेत अशी. माधवशी तिचा घटस्फोट होतो. नैराश्याच्या गर्तेतून तिला एक माधवीच सावरते… आणि तिला माधवमध्ये कधीच न दिसलेलं ममत्व ही दुसरी माधवी दुही-दुही हातांनी उधळते तिच्यावर!

हे समजून घेतलंस, की मग चार हेटरोसेक्शुअल जोड्या आणि चार होमोसेक्शुअल जोड्या तयार होऊ शकतात, हे लक्षात येईल तुझ्या.

– सॉफ्ट माधवी; ढासू माधव. किंवा,
– सॉफ्ट माधवी; आणि ढासू माधवीच.
फुलाच्या कोमल पाकळ्यांना भ्रमराच्या राकटपणाची आस आहे; भ्रमराच्याच्या कणखरतेला फुलाची मृदूता कवेत हवी आहे!

– ढासू माधवी; सॉफ्ट माधव. किंवा,
– ढासू माधवी; आणि सॉफ्ट माधवीच.
मुसाफिराच्या बिंधास्तपणाला लेखकाचा विचारी स्वभाव खुणावतोय;
चित्रकाराच्या संवेदनशीलतेला दुसऱ्याचा इरसाल अटिट्यूड वेडावतोय!

– सॉफ्ट माधवी; सॉफ्ट माधव. किंवा,
– सॉफ्ट माधवी; दुसरीही सॉफ्ट माधवीच.
इथे दोन फुलांना एकमेकांच्या पाकळ्यांत तल्लीन व्हायचंय.

– ढासू माधवी; ढासू माधव. किंवा,
– ढासू माधव; दुसराही ढासू माधवच.
इथे दोन भ्रमरांना एकमेकांच्या बेधुंद आवेगात चिंब न्हाऊन निघायचंय.

आणि हो-

नान आणि कुलचा दोन्ही आवडणारेही खवय्ये असतातच की! त्यामुळे आपापल्या त्या-त्या वेळच्या तृप्तीच्या गरजेनुसार, माधव आणि माधवी असा सगळाच ‘मेनू’ हवा म्हणणारेही असतात! आपण त्यांना बायसेक्शुअल म्हणतो!

तसंच, कधी माधव किंवा माधवीला स्वतःच्या लैंगिक ओळखीशी आपल्या शरीराचा ताळमेळ नाही, असं वाटून जातं. कुठेतरी अपूर्णत्व जाणवतं. मग तो मेळ साधण्यासाठी त्यांना लिंग बदलाची गरज वाटते. आपण त्यांना ट्रांसजेंडर म्हणतो.

– “वॉव! च्यायला, इतकं सरळ-सोपं आहे तर! सो बेसिकली, तृप्ती आणि पूर्णत्वाची आस, हा खेळ आहे सगळा!”

– “सगळं सरळ-सोपंच असतं रे! फक्त, माधव अन् माधवीने स्वतःकडे कोणत्या नजरेने पाहावं आणि आपल्याला हवंय ते कोणात शोधावं ते आम्हीच ठरवू, हा हट्ट धरून बसलेला समाज दोघांनाही स्वतःशी संवाद साधूच देत नाही.

त्यामुळे माधवची आस असलेले अनेक माधव माधवीशी लग्न करून पस्तावतात. अन् माधवीची आस असलेल्या अनेक माधवी, माधवशी गाठ बांधून जन्मभर अव्यक्तच राहतात. आणि ज्या माधवला माधवी व्हायचंय नि ज्या माधवीला माधव व्हायचंय, ते विरोधापोटी स्वतःला नाकारत जगतात बिचारे. समजून घेतलं तर सगळं समजेल. आणि त्यातली नैसर्गिकता पाहिली तर स्वीकारताही येईल!”

{कृपया लेख शेअर केल्यास लेखकाच्या तपशीलासहित करावा, ही नम्र विनंती. शेअरिंगबद्दल आभार ! आवडल्यास जरूर कळवा !}



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

3 thoughts on “समलिंगी की विरुद्धलिंगी आकर्षण…हा विकास आपल्यात कसा घडतो ?”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!