कठीण समय येता..
प्रा. आरती पसारकर.
आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात कधी न कधी असे प्रसंग येतात कि त्याने आपण विचलित होतो. मानवी जीवनात चढ़ -ऊतार अनुभवायला मिळतात, अश्या वेळेस बर्याच समस्या ही ऊदभवतात व त्यांना सामोरे जाता जाता आपण व्यथित होतो, किंवा त्रस्त होवून काही वेळेस कुठल्या ही मार्गाचा अवलंब करण्यास ऊद्द्युक्त होतो. अश्या वेळेस घायकुतीला येवून आपण अविचाराने देखील वागतो.
तर ह्या कठिण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी आपण काही तंत्रांची ओळख करून घेवूया, ज्या मुळे आपल्याला अश्या प्रसंगांना सामोरे जाण्यात मदत होईल. ही तंत्र अश्या परिस्थितींशी लढ़ण्या साठी योग्य कौशल्य विकसित करण्यात मदत करतील. जेणे करुन आपण स्वतः ची मदत करू शकू व आपले जीवन जास्त प्रभावी पणे, जगू शकू.
हे सर्व तंत्र काही तत्वांवर आधारित आहेत. ती तत्व खालील प्रमाणेः….
१) अल्प कालीन व दीर्घ कालीन ऊद्दिष्टां मधील समन्वय.
२) प्रत्येका कडूनच चूक होवू शकते, कोणीच सर्वज्ञ नसतो.
३) एखाद्याच वर्तन चांगल-वाईट, ऊपयोगी-अनुपयोगी, प्रामाणिक-अप्रामाणिक असू शकतं, म्हणजे ती संपूर्णव्यक्ती नव्हे.
४) स्वतः च्या भावनां साठी ती व्यक्ती स्वतः च जवाबदार असते.
५) कुठली ही परिस्थिती १००% किंवा त्याही पेक्षा भयंकर नसते.
आता ह्या तत्वांचा एक एक करून विचार करूया.
१) आपण तात्पुरत्या ऊद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करतो, व त्यातून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. उदाः टी.व्ही. बघणे, रूचकर खाणे, सिनेमा किंवा पार्टीला जाणे, ई. ह्या सर्वातून आनंद नक्कीच मिळतो पण किती काळ? कदाचित थोड्या वेळ, मग नंतर काय?
हे करत असतांना आपण इतर महत्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष किंवा टाळाटाळ केली असेल तर आपण जास्त काळ दुःखी होवू शकतो. तेंव्हा दीर्घकालीन ऊद्दिष्टां कडे लक्ष द्या.
दीर्घकालीन योजनांवर लक्ष केंद्रित करा.
मग, ह्याचा अर्थ असा का, कि आपण फक्त दीर्घ कालीन ऊद्दिष्टांवर च लक्ष घालायच?असे केल्याने आपले पुढ़ील आयुष्य सुखी, समाधानी, व कुठल्या च समस्या नसलेले होवू शकेल का?
विवेकनिष्ठ मानसोपचार ज्यातून हे तंत्र ऊदभवतात एक मध्यम मार्ग सुचवतात. तो असा कि,” मला आज ही आनंदी रहायचे आहे, व ऊद्या सुध्दा.”
हे घडवून आणण्या साठी प्रत्येकाला समायोजन व सामंजस्य ठेवणे गरजेच आहे. म्हणून तातकालीन व दीर्घकालीन ऊद्दिष्टां मधे समन्वय आणण्या साठी काही महत्वाच्या पायर्या ठरवाव्या लागतात. एखाद मोठं कार्य असेल तर त्याला लहान भागां मधे फोड करून साध्य करायच ठरवल तर सोप होत व जसं आपण ते साध्य करू तसं स्वतः ला बक्षीस ही देवू शकतो. उदाः तुम्हाला एखाद्या ठिकाणी पोहोचायला १००’ चढून जायच आहे, तर तुम्ही १०’ प्रथम, नंतर अजून १०’ असं करत गेलात तर, तुमचा आत्मविश्वास व ऊपलब्ध केल्याची जाणीव पुढील वाटचाली साठी प्रेरक ठरू शकेल.
२) आपल्या प्रत्येका कडूनच चूका ह्या होतच असतात. त्या मुळे बरेचदा विपरीत परिस्थिती, कठिण प्रसंग किंवा ताण तणावा ची परिस्थिती ऊदभवते. अश्या वेळेस सर्व प्रथम नेमकी परिस्थिती किंवा समस्या काय आहे ह्याची व्याख्या करणे. आता ह्या प्रकरणात आपली भूमिका काय आहे? अर्थात त्या समस्येची जवाबदारी घेवून ती स्वीकारणे. म्हणजे ही समस्या आपल्या विचाराने, भावनेने व कृती ने ऊदभवली आहे. हे जर एकदा पटलं तर ते सोडवणं सोप होईल.
बरेचदा बरेच लोकं समस्येची जवाबदारीच नाकारतात, कारण त्यांच्या मते त्यांची काहीच चूक नाहीये, ते परिपूर्ण आहेत.
ह्यातून बाहेर येण्या साठी प्रत्येकाने “स्व”, प्रती अभिवृत्ती अशी निश्चित करावी……” मला काही वेळेस यश मिळेल, व काही वेळेस अपयश, परंतु मी स्वतः व्यक्ती म्हणून यश किंवा अपयश नव्हे”.
तेंव्हा आपल्या चुका स्वतः शी कबूल करायला शिकायच.
३) एखाद्या व्यक्ती च वर्तन, एखाद्या परिस्थितीत चांगल- वाईट, प्रामाणिक- अप्रामाणिक, ऊपयोगी- निरुपयोगी, असू शकेल, परंतु ती संपूर्ण व्यक्तीच म्हणून चांगली किंवा वाईट ठरत नाही. तेंव्हा एखाद्या च्या एका विषिष्ट वेळेला विषिष्ट वर्तना वरुन संपूर्ण व्यक्ती च मूल्यांकन करून त्याला निषिध्द किंवा खजील करु नये.
कोणीच परिपूर्ण नसतं कारण शेवटी आपण सर्वच मानव आहोत. आपण आपल्या चूकांची किंवा समस्यांची कबूली व जवाबदारी घेवू शकतो पण त्या साठी स्वतः ला अपराधी किंवा कमी लेखू नये.
प्रत्येक च जण बरीच ऊद्दिष्ट ठरवत असतो, सर्वच पूर्ण होतात असे नाही. काही ऊद्दिष्ट गाठण्यात आपण यशस्वी होतो तर काही च्या बाबतीत अपयशी, पण म्हणून व्यक्ती च यशस्वी किंवा अयशस्वी ठरत नाही.
” मी म्हणजे माझे वर्तन नाही, पण मी माझे वर्तन नियंत्रित करु शकतो व ठरवू शकतो.”
” मी भावना नव्हे, मी भावनांचा अनुभव घेतो.”
” माझ्या भावना, विचार व वर्तन वाईट असू शकतात पण मी च संपूर्ण पणे वाईट नाहीये.”
४) ” तू मला चिथवलस”, ” तूझ्यामुळे मला राग आला”, ” तो मला असं बोलला म्हणून माझा ताबा सुटला”.
लोकांना असं वाटत असतं कि बाह्य घटने मुळे व इतर लोकां मुळे आपण विभिन्न भावनांचा अनुभव घेत असतो. भावना अनुभवणे व त्या व्यक्त करणे हे एक सामान्य व प्राकृतिक मानवी वर्तन आहे. भावनांच वर्गीकरण रास्त व अयोग्य असं करता येवू शकतं. रास्त किंवा योग्य भावना दूसर्याला दुःखवत नाही व इतरांच नुकसान ही करत नाही.
अश्या भावना ऊलट भविष्यात चांगल वर्तन करण्या साठी प्रेरित करतात. उदाः ऊदास, नाराज, पश्चाताप, वाईट वाटणे ह्या रास्त भावना असू शकतात, जेंव्हा कि राग, वैफल्य, स्वतःला दोष देणे, स्वतःचा धिक्कार करणे, न्यूनगंड, ह्या अयोग्य अश्या भावना आहेत.
आपल्या भावनांसाठी आपण स्वतःच जवाबदार असतो. तेंव्हा आपण अनुभवत असलेल्या भावनांसाठी इतरांना व बाह्य घटनेला कारणीभूत ठरवू नये. कुठलीच भावना अप्राकृतिक किंवा खोटी नसते, परंतू काही भावना जास्त योग्य व रचनात्मक असतात, व त्यांचा आपल्याला दीर्घकाला साठी ऊपयोग होत असतो.
५) कुठलीच परिस्थिती पूर्णतः १००% किंवा त्याही पेक्षा जास्त भयंकर नसते. रोज कुठल्या तरी समस्या, तणाव, संघर्ष वा अन्याया ला आपण तोंड देतच असतो. ह्याचा अर्थ असा नव्हे कि ह्या सर्व घटना भयंकर आहेत. आयुष्यात चढ़ ऊतार येतच असतात. खरं तर ह्या घटनांपेक्षा ही वाईट काही असू शकतं.
आपण जर असा विचार केला कि हे काही तरी फार भयंकर आहे, तर आपण ऊगाचच, खचून जातो व मग त्या परिस्थिती चा सामना आपण करु शकत नाही. असो. आपण हे समजून घेतल पाहिजे कि जीवनातील कठिण परिस्थितींचा सामना करण्या साठी आपण सक्षम आहोत, व कूठल्या ही प्रकारे स्वतःच्या क्षमतेला कमी लेखू नका.
वरील सर्व तत्व आपण ” विवेकनिष्ठ मानसोपचार” ऊत्पत्ती च्या आधारे जमवून आणू शकतो. ही पध्दत एलबर्ट एलीस ह्या मानस शास्त्रज्ञाने विकसित केली आहे.
ह्यात A B C D E असं प्रारुप आहे. A म्हणजे बाह्य घटना, परिस्थिती किंवा व्यक्ती. ही घटना किंवा व्यक्ती आपलं ऊद्दिष्ट गाठण्यात अडथळा निर्माण करते. तर ह्या बाह्य घटनेला आपण “अडचण” म्हणू शकतो.
B म्हणजे स्वसंवाद. स्वतः नी स्वतः शी साधलेला संवाद. हा संवाद आपल्या अभिवृत्ती, श्रध्दा व दृष्टिकोन ह्यावर अवलंबून असतो.
ह्यातून C चा जन्म होतो. C म्हणजे आपण अनुभवत असलेली भावना आणी मग त्या प्रमाणे करतो ती कृती. B च्या ठिकाणी आपण स्वतःला काय सांंगतो त्यावर भावना ठरत असते.
आता D म्हणजे B च्या ठिकाणी असलेल्या श्रध्देला dispute करायचं. हे २ पध्दतीने साधता येऊ शकतं. एक, श्रध्देला आवाहन करायच, व दूसरं , विवेकनिष्ठ, तार्किक व रास्त विचार रूजवून, प्रतिस्थापित करणे. ‘B’ च्या ठिकाणी विचारांना आवाहन करण्यास खालील प्रश्नांची मदत घेऊ शकतो.
१) तर्कशुध्द आहे का? २) काही पुरावा आहे का? ३) कोणास ही कुठल्याही प्रकारे ऊपयोगी आहे का? ४) हा एकमेव व शेवटचापर्याय आहे का?
‘D’ च्या ठिकाणी वाद घातल्या नंतर जे अनुभवतो,ते कदाचित आपण एक नवीन विचार, अनुभव व नवीन जीवन तत्व विकसित केलं असू शकेल.
तर आपण जे सर्वसाधारण पणे असा विचार करतो कि, आपल्या त्रासा च कारण ‘A’ बाह्य घटना आहे, तर ते बरोबर नाही, खरंतर आपण ‘B’ च्या ठिकाणी जेस्वतःशी संवाद साधतो, त्यातून ‘C’ ची निर्मिती होते,व त्यानुसार ‘D’ ला आवाहन करून ‘C’ ला ‘E’ मधे रूपांतरीत करता येत.
‘B’ सर्वात महत्वाच आहे. ‘B’ म्हणजे आपले विचार,मतं, अभिवृत्ती, मूल्य, अपेक्षा व श्रध्दा. हे सुध्दा २ प्रकारचे असतात…१) विवेकनिष्ठ व २) अविवेकनिष्ठ.
विवेकनिष्ठ विचार योग्य भावनांची ऊत्पत्ती करतात व त्या मुळे आपण तसं वर्तन करतो जे आपल्या साठी भल्याच ठरतं. अविवेकनिष्ठ विचार चुकीच्या भावनांना चालना देतात व त्यामुळे, आपल्या कडून स्वतःला अडचणीत आणणार वर्तन घडतं.
वरील तत्व जर अंगीकारले तर जीवनात आलेल्या कठिण प्रसंगांना तोंड देत पुढ़े वाटचाल करण्यास यशस्वी होत, जगणं जास्त प्रभावी होवू शकेल. असो.



सुंदर पध्दतीने विश्लेषण केले आपण ब म्हणजे विवेकनिष्ठ विचारांवर घट्टपणे उभं राहिलो तर समस्या कमी होऊ शकते। अर्थात हे सोपे नाही पण समस्येत जास्त गुंतून अडचणी वाढवून घेण्यापेक्षा हे केव्हाही उत्तम आहे थॅंक्यू।