Skip to content

प्रेम हा दोन जीवांना बांधून ठेवणारा अदृश्य धागा आहे.

नाते संबंध


मधुश्री देशपांडे गानू


खरं तर आज काहीच लिहायचं नाही असं ठरवलं होतं.रोज काही लिहून , पोस्ट करून किती ते पिडायच ना…? पण जित्याची खोड ना आता अशी जाणार नाही..तर एक छान विषय मिळालाय लिहायला…

नाते संबंध मग ते कोणतेही असो… तीन पातळीवर अस्तित्वात असतात.

पहिली पायरी.. शारिरीक…शारिरीक आकर्षण . पाहता क्षणी एखादी व्यक्ती आवडणे हे अत्यंत नैसर्गिक आहे. पति-पत्नी , प्रियकर-प्रेयसी या नात्यात तर अगदीच प्राथमिक पातळी.. पण मैत्री मध्ये सुद्धा काही वेळा एखादी व्यक्ती सुंदर , रूबाबदार , उत्तम पेहराव करणारी जबरदस्त व्यक्तिमत्व असणारी अशा व्यक्ती कडे आकर्षित होऊन आपण मैत्री करतो..

जोडप्यांमधील शारीरिक पातळीवरील नातं हा तर त्याचा पायाच असतो. हे महत्वाचेच. पण फक्त हा एकच मुद्दा कोणत्याही नात्यात एकमेव आहे का? यानेच नातं परिपूर्ण होतं का? फक्त शारीरिक दृष्ट्या चोवीस तास एकमेकांबरोबर राहून नातं दृढ होत का? प्रेम , सामंजस्य टिकतं का? तर उत्तर आहे ” नाही “.

कालांतराने आकर्षण संपू शकतं .. जर स्वभाव जुळले नाहीत तर शारीरिक आकर्षण आणि सौंदर्याचा काहीही टिकाव लागत नाही. म्हणजेच ही एक पातळी नातं टिकवण्यासाठी अजिबातच पुरेशी नाही..

दुसरी पातळी.. बौद्धिक…. अनेक वेळा असं होतं की आपण काही जणांशी लगेच जोडले जातो. लगेच मैत्री होते. कारण आपल्या आवडी-निवडी , विचार करण्याची पद्धत , निर्णयक्षमता यात साम्य असतं. या पातळीवर नातं उभं राहू शकतं. पण फक्त हेही नातं टिकवण्यासाठी पुरेसं आहे का? स्वभाव वेगळे असू शकतात. मग हे वरवरचे नातं ठरेल. मनात खोलवर रूजणार नाही.. बहरणार नाही.

तिसरी पातळी…. भावनिक…आपले स्वभाव सारखे असतील, परस्पर सामंजस्याची भावना असेल , आपलं माणूस आहे तसं स्वीकारण्याची समज असेल , परस्पर दृढ विश्वास असेल , एखाद्या घटनेकडे बघण्याचा भावनिक दृष्टीकोन एक असेल आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे एकमेकांवर प्रगाढ प्रेम असेल तर आणि तरच कोणतेही नातं टिकून राहू शकते.

” प्रेम हे दोन जीवांना बांधून ठेवणारा अदृश्य धागा आहे. ही निसर्गदत्त देणगी आहे. नुसते प्रेम नाही तर त्या व्यक्ती वर आपली भक्ती आणि श्रद्धा ही हवी. मग आयुष्याला अलौकिक अर्थ प्राप्त होतो. ” असं व. पुं. नी म्हटलंच आहे. प्रेम ही एकमेव भावना माणसाला अंतर्बाह्य बदलून टाकते. जे नातं या भावनिक पातळीवर बांधलं गेलंय तेच टिकून राहते. बहरतं. मग ते माणूस आपल्या जवळ असो की नसो.

शारिरीक जवळीक नसली तरीही प्रेम संपत नाही. कालबाह्य होत नाही. म्हणून हल्ली सांगतात की EQ जास्त महत्त्वाचा IQ पेक्षा.. जर भावनिक पातळीवर दोन माणसं जोडलेली असतील तर शारीरिक आणि बौद्धिक पातळीवर वेगळी असली तरी ही ते नातं टिकून राहते.

आयुष्याभर साथ करतं… बहरतं… आनंद देतं… पूर्णत्व देतं……



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!