Skip to content

आयुष्य परिपूर्ण नसूनसुद्धा आपण आनंदी राहू शकतो !!

“नैराश्य” एक निरीक्षण


मधुश्री देशपांडे गानू


सध्या एकूणच माझं असं मत झालंय किंवा माझ्या निदर्शनास आले अनुभव आलेत म्हणा ना! माणसं बोलायला लागली की ती कशी दुखी आहेत , त्यांना कशा अडचणी आहेत , त्यांच्या आयुष्यात कसा राम राहिलेला नाही.. हेच बोलताना जास्त दिसतात. अर्थात हे फक्त माझं निरीक्षण आहे. कोणाचा अनुभव वेगळा असू शकतो..

सध्याचा काळही त्याला कारणीभूत आहेच. सतत एक नैराश्य बऱ्याच जणांच्या बोलण्यात जाणवतं. कोणीतरी आपलं फक्त ऐकून घ्यावं अशीही धारणा त्यामागे असते हेही मान्य. पण प्रत्येक वेळी बोलताना हाच विषय असेल तर ऐकणाराही कंटाळतोच ना.

बरं बऱ्याचदा या समस्या असतात की ऐकण्यापलीकडे आपण काही करू शकत नाही. मग आपण त्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो , जिव्हाळा , काळजी असते म्हणून सारखं हेच ऐकायचं? का? आपण या सगळ्याला कारणीभूत असतो का??

दुसरं म्हणजे स्वतः दुःखी असतातच पण तुम्ही आनंदी समाधानी सुखी आहात हे त्यांना पाहावत नाही. “अरे! ही एवढी आनंदी कशी राहू शकते ? आणि का?? असे आणि अनेक प्रश्न यांना सतत पडत असतात. असूया ही काहीवेळा असतेच.

कोणाचं आयुष्य परिपूर्ण नाही. काही ना काही समस्या असतातच पण दरवेळी त्याचं भांडवल करून बोललं म्हणजे काय होतं?किती सहानुभूती मिळणार? तुमचे प्रश्न हे तुम्हालाच सोडवायचे असतात. कितीतरी वेळा ऐकून असं वाटतं की अरे! किती क्षुल्लक गोष्ट आहे ही.

बरं आपण उपाय सांगितला तर ऐकत तर नाहीतच पण ” ही कोण मोठी आली आम्हाला शिकवणारी ??” असाही सूर असतो. म्हणजे दुःखाला कुरवाळत बसायचं..

आहे त्या परिस्थितीत आनंदी राहणे आणि जमेल तेवढा आनंद वाटणे हे फक्त आणि फक्त आपल्याच हातात असतं. फक्त वेगळा विचार करायला लागतो. सगळे आपल्यामध्येच सामावलेलं आहे. आनंदी राहायला काहीही कारण लागत नाही. नसावं.

आपला आनंद हा कोणत्याही व्यक्तीवर , परिस्थितीवर अवलंबून असता कामा नये. मग छोट्यातला छोटा आनंदही आपण पूर्णपणे व्यक्त करतो. मनमोकळं बोलावं , हसावं. जीवन पूर्णपणे जगण्याची ही प्रक्रिया आनंदाने अनुभवावी.

आत्ताच माझ्या मुलाने यशोधनने एक वाक्य सांगितलं जे मला फार आवडलं. ” Enjoy The Process Of Expressing Yourself .” तोही असाच माझ्यासारखा आनंदी प्राणी आहे. आमचंही आयुष्य परिपूर्ण नाही तरी आम्ही आनंदी राहतो.

सतत तणावाखाली राहून , नैराश्यात राहून प्राप्त परिस्थिती बदलत नाही. तर आहे त्या परिस्थितीत शांत , समाधानी , आनंदी राहूनच बदल घडू शकतात. पण काहींना कितीही सांगितलं तरी “पालथ्या घड्यावर पाणी”..

तर मी आहे अशीच राहणार. आनंदी.. मस्त.. कोणासाठीही माझा मूळ नैसर्गिक स्वभाव मी बदलणार नाही. कोणाला असूया वाटली तरीही माझा आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. उलट तुम्ही आनंदी असावं असं मला मनापासून वाटतं. बाकी तुमची मर्जी “चॉइस इज युवर्स” बास…इतकंच….



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!