Love is not dealer of sex….
सुधा पाटील
खरं तर आजकाल “प्रेम ” ही सुंदर भावना शारीरिक वासना शमविण्यासाठी वापरलं जाणारं माध्यमच बनली आहे.तरुण मुलंमुली असतो किंवा आयुष्याच्या मध्यावर आलेले स्त्री आणि पुरुष असतो अगदी सगळेच प्रेमात असल्याचं नाटक करतात, एकमेकांना सर्रास फसवतात.
इथे मग स्त्री किंवा पुरुष असा मी भेद करतंच नाही.कधी कधी स्त्रीया प्रेमाच्या नावाखाली पुरुषांची फसवणूक करतात तर कधी कधी पुरुष स्त्रीयांची फसवणूक करतात.
शारिरीक भूक, किंवा पैसा, किंवा सौंदर्याचा गर्व अशा वेगवेगळ्या कारणांसाठी ही फसवणूक सुरुच असते.खुपदा यामध्ये भावनिक महिलांची मानसिक कुचंबणा खूप होते.
कारण निसर्गतः महिला या भावनिकता, प्रेम याला बळी पडतात.नंतर मग झालेली फसवणूक किंवा प्रेमाच्या नावाखाली झालेला वापर त्यांना सहन होत नाही.काही काही महिला नैराश्याच्या गर्तेत सापडतात.किंवा काहीजणी तर मरण पत्करतात.
अशा अनेक गोष्टी समाजात रोजच घडत असतात.पण या सगळ्यात बदनाम होत ते प्रेम! कारण एकमेकांचा विश्वास संपादन करण्यासाठी प्रेमाचा मार्ग अवलंबला जातो.त्यातूनच सेक्सुअल संबंध येत जातात.पण नंतर दोघांपैकी कोणा तरी एकाला जाणिव होऊ लागते की,हे सारं प्रेमाचं नाटक आहे.मग त्यातून सुरू होतो संघर्ष!
जर दोघेही व्यावहारिक असतील तर दोघेही एकमेकांना “गेलास उडत…” अशा रीतीने नातं संपुष्टात आणतात.मात्र जर दोघांपैकी एखादा खरं नातं जपणारा असेल आणि दुसरा केवळ सेक्ससाठी तडजोड करणारा असेल तर मात्र त्या एकाची भावनिकता ढासळून जाते.अशा घटना घडतात त्यामुळेच तर प्रेमाला बदनामीचं लेबल लागत….
मला तर वाटतं प्रेमाचा,भावनिकता याचा आधार घेऊन एकमेकांना फसवण्यापेक्षा तुम्ही का एकत्र येत आहात हे स्पष्टपणे एकमेकांशी बोला.जर दोघेही सहमत असतील तर नातं तुटताना दोघांनाही त्रास होणार नाही.आणि प्रेमही बदनाम होणार नाही.
मुळातच सेक्स ही स्त्री आणि पुरूषांची नैसर्गिक गरज आहे.ती पुरविण्याठी आणि त्यातून निर्माण होणारी संतती यांच संगोपन करण्यासाठी लग्न ही संस्था समाजात निर्माण झाली आहे.परंतू काळाच्या ओघात किंवा गैरसमज यामुळे ही संस्था तशी डळमळीतच झाली आहे.किवा या संस्थेच्या चुकीच्या पद्धती यांमुळे लग्नानंतर सहजीवन उत्तम असेलच असं नाही.
म्हणूनच तर सेक्सची पूर्ती वेगवेगळ्या मार्गाने माणूस करीत असतो.पण वाईट याच वाटतं की, यासाठी खोट्या प्रेमाचा वापर केला जातो.एकमेकांच्या भावना सहजपणे पायदळी तुडवल्या जातात.निसर्गत: मुलामुलींमध्ये सेक्सची भावना वयात येतात तेव्हाच निर्माण झालेली असते.
पण आपल्या समाजात ती भावना लग्नानंतरच पूर्ण करायची असा सामाजिक मापदंड आहे.पण हल्ली करिअर,पैसा, नोकरी या गोष्टी मिळेपर्यंत मुलामुलींची वयं वाढत जातात.त्यामुळे आजकाल कित्येक मुलं मुली लग्नाआधीच हा अनुभव घेतात.पण यात पुन्हा बदनाम होते ती मुलगीच!
कारण आपली पुरुष प्रधान संस्कृती! आज समाजात एखादा पुरुष अनेक विवाहबाह्य संबंध ठेवतो.पण त्याला त्याची पत्नी मात्र एकनिष्ठ लागते.तिला एखादा मित्र असेल तर लगेच तीला बदचलन ठरवलं जातं.हा किती मोठा विरोधाभास आहे!
खरं तर आजकाल प्रेम ही भावना कमीच दिसते.प्रेमाच्या नावाखाली चालतो तो केवळ सेक्स!
सेक्स वाईट आहे असं अजिबात नाही.ती मानवी प्राण्यांची नैसर्गिक गरज आहे.इतर गरजांची पूर्तता जशी आवश्यक असते तशीच या गरजेची पूर्तता होणे देखील अत्यावश्यक आहे.पण आपली सामाजिक रचना,अंद्ध़श्रद्धा,अज्ञान, लैंगिक शिक्षणाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे समाजात अशा घटना घडतात.पण या घटना प्रेमाची भावना बदनाम करुन होतात याचं वाईट वाटतं.
प्रेमाचा भूलभुलैया तयार करून सेक्सची भावना पुरवून घेतली जाते.नंतर मग पुन्हा दुसरी व्यक्ती…. पुन्हा तोच भूलभुलैया असं चक्र सुरुच राहत.याला अंत नाहीच….पण या सगळ्या चक्रामध्ये “प्रेम” बदनाम होतंय किंवा त्याच्यावरचा समाजाचा विश्वास उडत आहे याचा कुठेतरी विचार केला जावा.किंवा प्रेम आणि सेक्स या दोन वेगळ्या गोष्टी आहेत याची जाणीव समाजातील मानव प्राण्यांना व्हावी.
“सेक्स म्हणजे प्रेम नव्हे,आणि प्रेम म्हणजे सेक्स नव्हे!” जेव्हा दोन जीव प्रेमाने एकत्र येतात तेव्हा त्याच्यात सेक्स ही गरज संमतीने पूर्ण होऊ शकते.पण प्रेमाच्या निरागस, सुंदर भावनेचा वापर करून सेक्सची गरज भागविणे आणि नंतर एकमेकांना वापर करून सोडून देणे म्हणजे चक्क मानसिक भ्रष्टाचारच म्हणावा लागेल.
पण याचा विचार करतो तरी कोण? जरी समाज आपला, त्यातील समस्या आपल्या असं वरवर म्हंटले तरीही कोणीही समस्या आल्यावर तीचा विचार करण्यापेक्षा पोकळ चर्चेत किंवा दोष देण्यात वेळ घालवला जातो.
पण कुठेतरी स्त्री असो किंवा पुरुष यांनी याचा विचार नक्की करावा.खूपदा खरंखुरं प्रेम करणारे देखील समाजातील अशा वाईट प्रवृत्ती मुळे बदनाम होतात.खरं प्रेम कलंकित होतं ते याचमुळे! म्हणूनच तुमच्या सेक्सची भावना पूर्ण करण्यासाठी प्रेम या सुंदर भावनेचा एक मार्ग म्हणून वापर करु नका.जगण्यासाठी प्रेम ही भावना जास्त महत्त्वाची असते.जेव्हा तुम्ही निरर्थक, लाचार बनता तेव्हा हे प्रेमच तुम्हास जगण्याचं बळ देत असतं.
म्हणूनच….
” Love is not dealer of sex!”
लेख आवडला
खूपच सुंदर लेख.
खूप छान लेख लिहिला आहे.
व्यावहारिक आणि भावनिक व्यक्तींचे विश्लेषण आवडले
अतिशय सुंदर लेख
Very good
आपले लेख खरच खूप छान आहेत आणि ते सर्व जीवनाशी निगडित आहेत. मस्त मला वाचायला आवडतात मी नेहमी वाचतो.