जेव्हाच आयुष्य तेव्हाच जगून घ्या.


कुसुम आंबेडकर गद्दलवार


आपण कितीतरी आनंदाचे क्षण गमावून बसतो आणि वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करतो. पण ती वेळ परत पुन्हा येत नाही.उद्या करू नंतर करू या अशा वृत्तीने आपण अनेक आनंदाला मुकतो, कारण ‘उद्या’ कोणी पाहाला.

माझी एक मैत्रीण आहे. अगदी बालपणापासूनची.खूप गरीब घरातील पण अत्यंत हुशार, अतिशय साधी. ज्ञान भरपूर आहे पण त्या ज्ञानाला साजेशी ना तिची वेशभूषा ना तिची केसरचना. मी तिला नेहमी म्हणायची, “अग तू चांगली का बर नाही राहत”.

Advertisement

तर तिचं मार्मिक उत्तर असायचं, अग वर्षातून दोन ड्रेस मिळतात ती पण बाबाच्या आवडीने बाकी काही घेण्याची कुवतच नाही तर काय नटनार, मुरडनार”. खरच होत तिचं मीही निशब्द व्हायची.

शालेय जीवन संपून कॉलेज जीवनातही आम्ही दोघी सोबतच. मला वाटले या कॉलेज लाईफ च्या झगमगाटी दुनियेत ही बदलेल पण, बाईसाहेब होत्या तशाच, काहीही बदल झाला नाही.

परिस्थिती तर होतीच बेताची पण एका तरुण मुलीने राहायला पाहिजे त्या पद्धतीने ही राहत का नाही हा मला पडलेला प्रश्न. सर्व मित्र मैत्रिणी तिची खिल्ली उडवायचे पण अभ्यासात हुशार त्यामुळे टीचर स्टॉप मध्ये लाडकी.

Advertisement

खेळात असो किंवा वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा असो नेहमी अव्वलच असायची पण ना कधी अंगावर चांगला ड्रेस, ना चांगली चप्पल, ना कधी चांगल्या बांगडया. पण कधीही स्वतःच्या परिस्थितीचे रडगाणे तिने गायले नाही.

मला तिच्या निर्मोही पणाचे अप्रूप वाटायचे. पण नेहमी म्हणायची, “मी खूप शिकणार आणि मला नोकरी लागल्यावर बघ मी कशी नटनार” आणि खरच ती शिक्षिका झाली तिचं स्वप्न साकार झालं. पण आमच्या मैत्रीत दुरावा आला माझं लग्न झालं.

पण जेव्हा मी माहेरी जायची तेव्हा तिला आवर्जून भेटायची पण ती तसूभरही बदलली नाही.मला तिचा कधी कधी राग यायचा आणि मी तिला म्हणायची, “काय हे आता स्वतः कमावती आहेस, थोडं स्वतःसाठी जग चार चांगल्या साड्या, एखाद सोन्याचं दागिना अंगावर, कधी पार्लर मध्ये जात जा”तर ती म्हणायची नाही ग घरी खूप अडचणी आहेत, घर बांधायचं आहे आणि माझ्या बाबाला असलं काही आवडतच नाही.

Advertisement

माझं लग्न झाल्यावर ना मग बघ मी कशी डॅशिंग राहत जाईल” आणि काही दिवसांनी तिचे लग्न झाले आणि बाईसाहेब बदलल्या. आता कुठे शिक्षिके सारखे तिचे राहणीमान आले.राजा राणीचा संसार सुरु झाला. मस्त मजेत दिवस जाऊ लागले आणि त्यात आनंद म्हणजे तिला दिवसही गेले. त्याच्या संसार वेलीवर सुंदर फूल फुलले, तिला पुत्ररत्न झाले. तिच्या आनंदाला पारावर नव्हता.

नोकरीच्या ठिकाणी ती तिचा नवरा आणि मुलगा असायचा. घरचं सर्व करुन मुलाचं सर्व करुन स्वतःकडे वेळ द्यायला तिला वेळच नाही मिळायचा त्यामुळे पुन्हा जैसे थे परिस्थिती. पुन्हा स्वतःकडे दुर्लक्ष. त्यात दुसराही मुलगा झाला.

नोकरी प्रामाणिकपणे करून, मुलाचं, नवऱ्याच, घरचं प्रामाणिकपणे करुन ती स्वतःला विसरत चालली होती.आता खूप दिसांनी आमची भेट झाली तिचा अवतार पाहून मलाच वाईट वाटलं “अग स्वतःसाठी कधी खड्यात गेल्यावर जगतेस का? तर खळखळून हसत म्हणाली, “नाही ना!

Advertisement

मुलं थोडी मोठी तर होऊ दे, एकदाची अंगाच्या दूर झाली, स्वतःची कामे स्वतः करायला लागली की मग बघ मी कशी टकाटक आणि टवटवीत होईन. मला तर कधी कधी हा प्रश्न पडायचा की किती दूरचा विचार करते ही, कधी स्वतःसाठी जगतांना दिसलीच नाही.

सतत हसणे आणि हसवने हा तिचा आवडता उदयोग त्यामुळे तिचा सहवास हवा हवासा वाटायचा.त्यामुळे मी माहेरी आली की तिला आवर्जून भेटायची.

मुलं थोडी मोठी झाली, शाळेत जाऊ लागली आणि बाईसाहेब पुन्हा बदलल्या आता स्वतःसाठी वेळ मिळू लागला. पुन्हा चेहऱ्यावर नवीन जोश आणि प्रसन्नता आली.

Advertisement

आता आमची भेट झाली की बर वाटायचं चला आता आपली मैत्रीण स्वतःसाठी जगायला लागली.आता कुठे ती रिलॅक्स झाली. स्वतःच घर झालं, आर्थिक बाजू सुधारली पण तिचा हा आनंद क्षणिक होता. निव्वळ भास, केवळ मृगजळ. तिच्या वर काळाने असा आघात केला की तिचा जीवनसाथीच तिच्या पासून हिरावून घेतला.

दोन लहान मुलं घेऊन माझी पस्तीसीतील मैत्रीण फक्त शून्य डोळ्यात घेऊन जगत आहे. आणि मला नेहमी म्हणते, “मला ना मुलं नसती तर त्यांच्या बरोबर स्वतःला पण संपवून टाकलं असतं” मला तर तिचे सांत्वन कसे करावे हेच कळेनासे झाले. आता तर मी कधी तिच्या चेहऱ्यावर ना हसू बघतलं ना कधी मेकअप. आता मी तिला सांगू तरी कशी. आणि सांगितलं तरी ती म्हणणार,
आता कोणासाठी नटून थटून राहू.

खरच पण आपण आजच्या आनंदाला उद्यावर ढकलतो पण खरच तो उद्याचा दिवस आपलाच असेल म्हणून काय गॅरंटी.

Advertisement


Online Counseling साठी !

क्लिक करा“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.