नाना रंगी माणूसपण….
मधुश्री देशपांडे गानू
मानवी मन किती क्लिष्ट आहे ना.. तसाच मानवी स्वभाव ही.. किती रंग किती छटा.. किती कोन किती कंगोरे.. कितीही घनिष्ठ संबंध असलेली व्यक्ती तुमच्या बरोबर चोवीस तास राहत असलेली व्यक्ती तुम्हाला पूर्ण कळली आहे असं तुम्ही ठामपणे म्हणू शकता का? तर नाही…
प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा , विचार करण्याची पद्धत वेगळी , व्यक्त होण्याची वृत्ती वेगळी.. किती प्रकार.. एखादी व्यक्ती एकासाठी देवमाणूस असू शकते तर एखाद्याचं याच व्यक्ती शी अजिबात पटत नाही.
बरं इथे आपण ज्यांना नाती माणसं गोतावळा महत्वाचा वाटतो अशांबद्दलही बोलतोयं..आणि जी माणसं अत्यंत फालतू क्षुल्लक कारणाने कितीही घट्ट नाते संबंध एका क्षणात तोडून टाकतात..
केवळ गैरसमजातून नाती मोडीत काढतात.. आणि पुढे अनेक वर्ष मीच कशी / कसा बरोबर या आडेलतट्टू स्वभावामुळे स्वतःचा अहंकार कुरवाळत बसतात..अशांबद्दलही बोलतोयं. माझ्या साठी एखाद्या व्यक्ती चा अनुभव चांगला असेल तर आणखी कोणासाठी वाईट ही असू शकेल.
माणूस व्यक्ती , त्या व्यक्तीशी असलेलं नातं , त्यातून येणारी अपेक्षा , अनुभव , परिस्थिती , प्रसंग हे सगळं गृहीत धरून व्यक्त होतो.. काही माणसे पाहता क्षणीच आपल्याला आवडतात..
अगदी पूर्वजन्मीचे नाते असल्यासारखे एकाच भेटीत आपलीशी होऊन जातात…तर काही व्यक्ती पहिल्याच भेटीत नकोशा होतात. सगळ्यांशी आपलं सूत नाही जमत..
काही व्यक्ती असतात ज्या सर्वांनाच हव्याहव्याशा वाटतात.. मानवी भावभावना पूर्णपणे व्यक्त करता यायला हव्यात. हेवेदावे , रूसवेफुगवे वाद होणारच.
पण ज्याला नातं महत्वाचे असतं , ते माणूस महत्वाचे असते ती व्यक्ती समजूत ही घालते आणि समजून ही घेते. हे कोणत्याही नात्यात दोन्ही कडून साधल की नातं पक्कं होतं.
आपलं माणूस आहे तसं स्वीकारलं की सोपं होतं सगळे. कोणीही परिपूर्ण नाही. काळा किंवा पांढरा रंग इथे लागू होत नाही.. विविध नाना रंग आणि रंगीबेरंगी मानवी स्वभाव आहेत म्हणून जगण्यातही मौज आहे..
किती आनंदाने आणि काय घ्यायचं काय सोडून द्यायचं हे प्रत्येकाने ठरवावे…