Skip to content

मुलांसमोर त्या दोघांची भांडणे होणं, हि सर्वात दुर्दैवी बाब !!

सुरुवातीला त्या दोघांमध्ये केवळ एकच प्रॉब्लेम होता….


श्री. राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


गणेश आणि आरती लग्नाच्या ३ वर्षाआधीपासून एकमेकांना ओळखत असे. आज त्यांच्या लग्नाला जवळजवळ १५ वर्षे पूर्ण होतील. नीरज आणि शांती अशी दोन मुले त्यांना आहेत. आणि हि दोन्हीही मुले आई-बाबांची सतत भांडणेच पाहत असतात.

प्रत्येक नवरा-बायको यांमध्ये भांडणे होत असतात. परंतु त्या भांडणाला जेव्हा सततचा लेबल लागतो तेव्हा ते नातं उरत नसून तर केवळ एक एडजस्टमेन्टहोते.

गणेश आणि आरतीचा सुरुवातीचा काळ जर बघितला तर दोघेही कमावते, उच्च शिक्षित आणि स्वतःला एका वेगळ्या उंचीवर पाहणारे. संसारासाठी करिअर अड्जस्ट करण्यापेक्षा संसारच अड्जस्ट केलेला केव्हाही उत्तम अशा पराकोटीच्या पाश्चिमात्य विचारांना गोंजारणारी हि दोघे.

अशा मानसिकतेत जर समजुतीचा ग्रीन सिग्नल नसेल तर संघर्ष निर्माण होणारच !

आज घरी तू लवकर ये, माझी मिटिंग आहे, आज सुद्धा जेवण बाहेरूनच मागुया, घर राखीन करणारी बाई बदलूया, आज मला वेळ नाही तुम्ही फिरून या, मला ऑफिसमध्ये किती प्रेशर असतं हे तुला काय माहित, हल्ली तुझा फोन खूप वेटिंगवर लागतोय, तू रिटर्न फोन का नाही केलास, तुझ्या आईच्या घरी मी येणार नाही, तूच जा, माझ्या बँक बॅलेन्सची चौकशी तुला कशाला, मुलांच्या शिक्षणाचा खर्च तू कर, आज काहीही करून पेरेंट्स मीटिंगला तूच जा….

वगैरे वगैरे…

दोघेही कमावते असल्यास हे संघर्ष पेटण्याची शक्यता हि वाढते. तरीसुद्धा इथे महत्वाचा विषय नोकरी करणारे किंवा नोकरी न करणारे नसून तर एकमेकांना समजून घेण्याची पातळी अत्यंत कमी असल्यामुळे असे संघर्ष पहायला मिळतात.

माझंच खरं, मी जे सांगितलंय अगदी तसंच होण्याची अपेक्षा, दोघांपैकी एकाने नकार दिल्यास जोडीदाराकडून ‘नाही’ न ऐकण्याची मानसिकता, सतत समोरच्याला बदलण्याची इच्छा, गृहीत धरणे.

यांमुळे दोघांच्याही नात्यात पहिली ठिणगी लागते आणि हळू हळू त्याचा वणवा होत जातो. आणि त्या वणव्यामुळे इतर जवळच्या लोकांनाही त्याचा त्रास सहन करावा लागतो.

छोट्या-छोट्या चुका तर घडतातच, परंतु मोठ्या चुका सुद्धा करून दोघेही मोकळे होतात. सतत एकमेकांना खोटं बोलणं, एक्सट्रा मॅरेज अफेअर ठेवणं, आवाज चढवून बोलणं, घरी सुख नाही असं इतरांपुढे गाऱ्हाणं गाणं, एकमेकांविषयी असलेली काळजी संपणं, सेक्स चॅट करणं.

अशा गोष्टी करण्यापासून दोघांनाही जराही दूरगामी परिणामांबद्दल वाईट वाटत नाही. तू करत आहेस, म्हणून मी सुद्धा करणार. असे मत दोघांनीही एकमेकांबद्दल बनवलेले असते. ज्याचा सर्वात मोठा फटका मुलांच्या शैक्षणिक आणि करिअर आयुष्यावर पडतो.

ज्यावेळी मुलांचं ठराविक वय ओलांडलं जातं तेव्हा सुद्धा तुझ्यामुळे मुलं बिघडली असे ब्लेम गेम खेळले जातात. पुष्कळ वेळा तर मुलांनाच दोषी ठरवलं जातं.

कारण आई-बाबांच्या वागण्याचा मुलांवर परिणाम होऊ शकतो, याबद्दल आई-बाबाच पार आंधळी झालेली असतात.

म्हणून गणेश आणि आरतीने सुरुवातीला केलेली एक चूक आज सर्रास सगळेच वैवाहिक जोडपे करताना दिसत आहेत.

ती चूक म्हणजे….

दोघांमधल्या वेगळेपणाचा आदर न करणं, आणि ज्या गोष्टी समान आहेत ते ओळखून त्याचा आनंद न घेणं.

आज तुमचा नवरा किंवा तुमची बायको तुम्हाला भोळी वाटत असेल पण नजीकच्या काळातच वचपा नक्की घेतला जाईल.

त्याचा रंग कसा असेल किंवा त्याचा आकार कसा असेल हे तुम्ही आत्तापर्यंत दिलेल्या वागणुकीवर अवलंबून असेल.

म्हणून एकमेकांना स्पेस मिळेल असं वातावरण ठेऊया. एकत्र राहत असलो तरी आपण सर्वच एकमेकांपासून वेगळे आहोत.

सायन्सच्या नियमानुसार !

लेख कसा वाटला नक्की सांगा.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!