Skip to content

मानसिक समस्यांवर खरंच गोळ्या खायला हव्यात का ??

मानसिक समस्यांवर खरंच गोळ्या खायला हव्यात का ??


श्री. राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


मानसिक समस्यांवर खरंच गोळ्या खायला हव्यात का ?? या प्रश्नाचे उत्तर होय किंवा नाही मध्ये देण्यापॆक्षा मानसिक समस्या आणि मानसिक आजार या दोघांमधला फरक जाणून घेणं खूप आवश्यक आहे.

चला समजून घेऊया…

मानसिक समस्या म्हणजे काय ?

दैनंदिन जीवन जगताना आपल्या मनाविरुद्ध अशा असंख्य घटना या सतत घडत असतात. एखादी रिस्पेक्टिव्ह व्यक्ती चार-चौघात आपला अपमान करून जाते, घरात सतत नकारार्थी आणि भीतीदायक वातावरण असणे, एखादा वाईट-दुर्दैवी प्रसंग घडणे. हे प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग आहे. या सर्वांना आपण मानसशास्त्राच्या भाषेत समस्या कधीच म्हणू शकत नाही. हि सगळी केवळ एक प्रसंग आहेत.

मग समस्या कोणत्या ?

वरील कोणत्याही एका प्रसंगाचा सतत अतिविचार मनात सुरु आहे किंवा घडलेले अनेक प्रसंग दबून-दबून छुप्या पद्धतीने त्रास देत आहेत. झोप आणि भूक उध्वस्त झाली आहे. त्यामुळे कोणत्याही कामात लक्ष लागत नाहीये. आवडीची कामे करायची इच्छा होत नाहीये. घराबाहेर पडू वाटत नाहीये.

जर या प्रकारची लक्षणे तुमच्यात आढळून येण्याची सुरुवात झाली असेल तर तुम्ही सायकॉलॉजिकल प्रॉब्लेम मध्ये आहात असा याचा अर्थ होईल. मग या ठिकाणी तुम्हाला लगेचच गोळ्या खाण्याची काहीही आवश्यकता नाही. प्रशिक्षित मानसशास्त्रीय समुपदेशक (Psychologist / Counselor) किंवा मानसोपचार तज्ज्ञांची (Psychotherapist) मदत घेऊन त्यांनी दिलेल्या एक्सरसाईज योग्य पाळून तुम्ही सामान्य स्टेजवर येऊ शकता. कारण या ठिकाणी आपल्याला काहीतरी समस्या आहे, हे आपल्याला जाणवत असतं. केवळ काही गोष्टी करायला जमत नसतात किंवा माहीतही नसतात.

मानसिक आजार म्हणजे काय ?

ज्या व्यक्ती आऊट ऑफ कंट्रोल असतात. जसे कि, योग्य वेळी योग्य भावना व्यक्त न करता येणं, अत्यंत टोकाकडची आक्रमकता, भास होणं, संशयी स्वभाव बनणं, अनामिक आणि कमालीची भीती जाणवणं, अत्यंत टोकाकडचा उत्साह आणि अत्यंत टोकाकडची निराशा, सतत चिंता इत्यादी. वरील सर्व लक्षणे ज्या व्यक्तीमध्ये किमान ६ महिन्यापेक्षा अधिक आहेत. त्या व्यक्तींना सायकॉलॉजिकल डिसऑर्डर होण्याची सुरुवात झालेली आहे, असे समजावे.

अशा सर्व व्यक्तींच्या मेंदूतील रसायनांमध्ये झालेला असमतोल संतुलित करण्याचं काम औषधे करीत असतात. केवळ मनोविकारतज्ज्ञांनी (Psychiatrist) दिलेली औषधे वेळेवर घेणं आवश्यक. औषधे घेऊन ज्यावेळी मेंदूतील रसायनांमध्ये समतोलपणा यायला लागतो. त्यावेळी व्यक्तीला मी बरी झालीये असं वाटायला लागतं.

परंतु शास्त्रीय दृष्ट्या औषधे घेतल्यामुळे किंवा त्यात सातत्यता टिकून ठेवल्यामुळे व्यक्तीला तसे वाटत असते. औषधे बंद झाली कि पुन्हा व्यक्तीला तसे अनुभव येण्याची शक्यता जास्त असते. जर त्या व्यक्तीने मनाच्या एक्सरसाईज यांकडे दुर्लक्ष केले तर.

कारण औषधे केवळ तात्पुरते बरे कसे होईल किंवा व्यक्तीची समस्या तिच्या जाणिवेच्या पातळीत कशी आणता येतील, एवढंच काम करीत असतात. त्यानंतर तुम्हाला एखादा समुपदेशक किंवा मानसोपचार तज्ज्ञ गाठावच लागतो.

तेच रुटीन, तीच स्थिती, तेच चेहरे किंवा मनाला आनंद मिळेल अशा एक्सरसाईज जर तुम्ही टाळत असाल तर हि औषधे तुम्हांला आयुष्यभर खावाव्या लागतात.

म्हणून या लेखामार्फत आपल्या सर्वांना एक गोष्ट निश्चित कळली असेल कि मानसिक समस्यांवर सुरुवातीलाच गोळ्या खाण्याची काहीही गरज नाही, तेथे मानसशास्त्र तज्ज्ञांकडे आधी गेलेलं केव्हाही उत्तम. तसेच मानसिक समस्यांकडे दुर्लक्ष करून जेव्हा ती समस्या रौद्र रूप धारण करते. त्याठिकाणी मानसोपचार तज्ज्ञांकडे जावे.

आणि जेव्हा व्यक्तीचं मन आणि शरीर हे दोघेही सामान्यपणे कार्य करत नाहीत, मनाच्या मूलभूत गोष्टींवर जेव्हा परिणाम होतात आणि हा परिणाम जेव्हा दीर्घकाळ जाणवतो, म्हणजेच अत्यंत टोकाकडची अवस्था त्यावेळी व्यक्तीला मनोविकारतज्ज्ञांची गरज आहे.

हे एकदा समजलं कि दिशाहीन उपचार होणार नाहीत.

लेख कसा वाटला नक्की सांगा.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

3 thoughts on “मानसिक समस्यांवर खरंच गोळ्या खायला हव्यात का ??”

  1. खूप सुंदर माहिती आहे. मानसिक आजार बरे करण्यासाठी मनाचे एक्सेरसाइज बद्दल माहिती सांगाल का. कसे असतात,काय करायचे असते किवा त्याबद्दल माहिती कुठे भेटेल..

  2. खूपच सुटसुटीत योग्य शब्दात मानसिक मानसिक आरोग्याबद्दल दिलेली छान माहिती. गोळ्या घेण्याची योग्य वेळ कोणती हे छान समजावून सांगितले आहे एका मर्यादेपर्यंत समुपदेशन योग्य ठरते गोळ्या घेण्याची वेळ आली आहे हे समजल्यानंतर गोळ्या घेत असताना सुद्धा गोळ्यांच्या जोडीने समुपदेशन असे करत राहिले तर फरक लवकर जाणवतो हेही तितकेच खरे आहे.
    विनया जोशी

  3. खूप छान व अगदी सुटसुटीत, मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून जसा असायला हवा अगदी तसा, मी टोकाकडचा उत्साह तर नाही ना दाखवला ?

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!