Skip to content

आयुष्यातले हरवलेले क्षण खरंच पुन्हा येतात का ???

आयुष्यातले हरवलेले क्षण खरंच पुन्हा येतात का ???


श्री. राकेश वरपे

(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र


अनेक व्यक्तींचं आयुष्य या प्रश्नाभोवती सतत फिरत असतं. त्यांना स्वतःचा जुना काळ अत्यंत प्रिय वाटत असतो आणि पुन्हा आयुष्याने माघारी फिरण्याची एक संधी द्यावी अशा कल्पनेत ते स्वतःला अक्षरशः गुरफुटून टाकतात.

पण खरंच गेलेला जुना काळ पुन्हा आयुष्यात नव्याने येतो का ? किंवा ते हरवलेले क्षण पुन्हा सापडतील का ?

शास्त्रीय दृष्टिकोनातून ढोबळमानाने म्हटलं तर हा प्रश्नच विवादास्पद आणि अत्यंत संकुचित आहे. याठिकाणी आपल्याला मागे का जावंसं वाटतंय हे शोधणं पुढे सरकण्यासाठी उपयोगी राहील.

एक उदाहरण घेऊया….

एका स्त्रीला किंवा पुरुषाला लग्ना आधीचा काळ खूप सुरेख वाटत असेल. लग्नाच्या या बंधनात अडकल्यासारखं वाटत असेल. तसेच लग्न जर दुसऱ्या व्यक्तीशी झालं असतं तर किमान आज समाधानी जीवन तरी जगायला मिळालं असतं, अशा तंद्रीत ती व्यक्ती कायम राहत असेल…

तर याठिकाणी ती व्यक्ती कशी वास्तवात जगत नाहीये हे समजावून सांगणं खूप सोपं आहे. आता वास्तवात जगत नाहीये म्हणजे ती तिच्याच अवास्तव जगात, कल्पनेत वावरत आहे, इथे हा अर्थ अपेक्षित आहे. म्हणूनच आपल्याला जुना काळ साखरेपेक्षाही खूप गोड वाटतो.

परंतु खरंच तो गोड असतो का ? तर नाही. तो क्षण त्याच्या जागी सामान्यच असतो. परंतु सध्या आपल्याच मनात आपल्याला आनंदी-समाधानी करतील अशा गोष्टी घडत नसल्याने आपला मेंदू गतकाळात घडलेल्या, आपल्याला सुखावून सोडलेल्या भावना जाणिवेच्या पातळीवर आणून सोडतो.

जर आपण त्या जाणिवेत वारंवार अडकत बसू तर आपल्याला वाटणाऱ्या त्या साखरेच्या गोडव्याची डायबिटीस होऊ शकते. म्हणजेच काय तर तेच प्रसंग वारंवार आठवून आपण त्यांना वर्तमानात खेचून आणण्याचा प्रयत्न करतो, जे कि अवास्तव आहे. त्यामुळे त्याचा आपल्या अपेक्षांवर, वागण्यावर, बोलण्यावर आणि विचार करण्याच्या पद्धतीवर परिणाम घडून येतो.

कारण इथे आपण कधीतरी आपल्याला आनंद देणाऱ्या घटनांनाआजही वास्तव समजत असतो. त्या कधीतरी वास्तव होत्या हे १०० खरंही आहे. पण तो भूतकाळ होता. हि समजूत काढणं महत्वाचं. नाहीतर ती स्त्री किंवा पुरुष आपल्या जोडीदाराकडून भूतकाळात घडलेल्या भावना लक्षात घेऊनच समोरच्या कडून तशाच हुबेहूब प्रेमाची आणि काळजीची अपेक्षा करीत असेल तर वर्तमानात मिळणाऱ्या नैसर्गिक सुख आणि शांतीपासून ती व्यक्ती नेहमी वंचित असेल.

आणि अशा व्यक्तींच्या अवतीभवती आपल्याला नेहमी संघर्षच पाहायला मिळेल.

म्हणून हरवलेले क्षण पुन्हा येतील, अशा तंद्रीत जगण्यापेक्षा त्यापेक्षाही मधुर क्षण सध्या वास्तवात असणाऱ्या व्यक्तींसोबत कसं जगता येईल. असा विचार करायला काय हरकत आहे.

कारण तुमचा मेंदू हरवलेले क्षण पुन्हा घडण्याची जर वाट पाहतोय म्हणजे इकडे एक गोष्ट निश्चित आहे कि तुमचा मेंदू तुमच्याकडून काहीतरी डिमांड करतोय जे तुमच्याकडून त्याला मिळत नाहीये.

आणि ते मिळत नसल्यानेच त्याच्यावर जुना भूतकाळ आठवण्याची वेळ आलीये…..

लेख कसा वाटला नक्की सांगा.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

2 thoughts on “आयुष्यातले हरवलेले क्षण खरंच पुन्हा येतात का ???”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!