डोकेदुखीच्या मागची काही मानसशास्त्रीय कारणे समजून घेऊया !!
श्री. राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ञ, करीअर काउंन्सिलर )
संचालक, आपलं मानसशास्त्र
सारखंच डोकं जड पडणं किंवा दुखणं हा त्रास प्रत्येक १० व्यक्तीपैकी ३-४ व्यक्तींना असतोच. त्यावर उपाय म्हणून अशा व्यक्ती सतत डोकेदुखी बंद होण्याच्या गोळ्या जवळ बाळगून असतात किंवा झंडू बाम रोज रात्री झोपताना लावतात.
अशा सर्व व्यक्तींना गोळ्यांची आणि त्या झंडू बामची एकप्रकारे सवयच झालेली असते. किंबहुना त्या गोष्टी आयुष्याच्या अंगीकृत भाग बनलेले असतात. त्याशिवाय त्यांना काही चैनच पडत नाही.
पुष्कळ व्यक्ती तर या डोकेदुःखीच्या सततच्या त्रासामुळे दवाखान्याच्या सारख्या फेऱ्या मारतात आणि आपली नॅचरल ह्यूमन बॉडी पूर्ण आर्टिफिशियल करून ठेवतात. मग भविष्यात सतत घेतलेल्या या गोळ्यांमुळे किडनी वर अतिताण येऊन त्या संबंधित गंभीर आजारांना त्या बळी पडू शकतात.
परंतु नेमकं डोकं का दुखतंय ?? इतके उपचार घेऊनही त्यावर कंट्रोल का राहत नाहीये. याबद्दल आपण कधीच मानसशास्त्रीय विचार करताना दिसत नाही. तो विचार न केल्यामुळे उपचाराच्या दिशाहीन प्रक्रियेत आपली पार धांदल उडते.
आज आपण काही मानसशास्त्रीय कारणे समजून घेऊया…
१) अतिविचार
त्याच-त्याच प्रसंगाबद्दल तोच-तोच सारखा विचार केल्यामुळे डोकं आधी जड पडतं. त्या दरम्यान मेंदूला रिलॅक्स होण्याची सुट्टी मिळाली नाही तर त्याचं रूपांतर डोकेदुखीत होण्याची दाट शक्यता असते. इथे सुद्धा डोकेदुखी वाढत असते, परंतु विचार न थांबल्यामुळे टोकाकडची गंभीर डोकेदुखी सुद्धा उद्भवू शकते.
२) सतत चिंता करत बसणं
एखाद्या सामान्य घटनेबद्दल, प्रसंगाबद्दल आणि व्यक्तीबद्दल जर अति काळजी, चिंता तुम्ही करत असाल आणि त्या क्षणी जरी डोकं जड पडत नसेल किंवा दुखत नसेल, परंतु नजीकच्या काळात ते एकप्रकारचं डोकेदुखीला निमंत्रणच असेल.
३) चिडचिडे स्वभाव
मनातल्या भावनांचा आक्रोश हाताळता न आल्याने सुद्धा डोकेदुखी होते. भावनांच्या या अवस्थेत व्यक्ती मानसिक आणि शारीरिक सुद्धा नियंत्रणाच्या पलीकडे गेलेली असते आणि व्यक्ती जेव्हा आऊट ऑफ कंट्रोल या स्टेजमध्ये जाते तर त्याचा पहिला परिणाम शरीरावरच जास्त जाणवायला लागतो. कारण ती लक्षणे असतात, कारणं तुमच्या चीड-चिडा स्वभावात दडलेली असतात.
४) मानसिक आघात
आयुष्यात अत्यंत दुर्दैवी प्रसंग घडला असेल, तसेच त्या प्रसंगांशी संबंधित असलेल्या वास्तविक आणि काल्पनिक जाणीवा न हाताळता आल्याने त्याचा शरीराव नकारार्थी परिणाम होत असतो. याला आपण म्हणूया भावनांचा उद्रेक होणे. तो उद्रेक होत असताना मनावर आणि शरीरावर ताण येणं हे सामान्य आहे. परंतु प्रसंगाला घडून मोठा अवधी गेलाय तरीही व्यक्ती तो भावना अनुभवते आहे, तर याठिकाणी मात्र शरीर ताणले जाते.
५) व्यक्त न होणे
डोकेदुखी असणाऱ्यांपैकी पुष्कळ व्यक्ती या प्रकारात मोडतात. ज्यावेळी आपल्याला आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी कोणतीही अनुकूल परिस्थिती मिळत नाही. किंबहुना प्रचंड निराशा मनात साचल्याने आपणच कोणापुढेही व्यक्त होत नाही. तसेच सोशल इंटरॅक्शन पासून आपण जर खूपच दूर असू तर दमण झालेल्या भावना डोकेदुखीच्या स्वरूपात बाहेर पडतात.
म्हणून डोकेदुखीवर कोणताही औषधोपचार करण्याआधी त्याचं योग्य निदान होणं अत्यंत आवश्यक आहे. वरील हि ५ कारणं जर तुमच्या अवतीभवती सर्वाधिक प्रमाणात वावरत असतील तर नक्की गोळ्या खाऊन किंवा झंडू बाम लावून माझी डोकेदुखी संपणार आहे का ? हा मुख्य प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा.
आणि मानसिक स्वास्थ्य आणि आरोग्य संबंधित निरनिराळी कौशल्य शिकून शरीराची जशी काळजी घेता, तशी मनाची सुद्धा काळजी घेणं हि येणाऱ्या काळासाठी अत्यंत जिकरीची बाब आहे.
इथून पुढे शुगर, डायबिटीस, थायरॉईड, किडनी प्रॉब्लेम, डोकेदुखी, पचनाचे विकार, हार्ट अटॅक, कँसर या सर्व गंभीर शारीरिक व्याधींमागे कारणे शोधताना मानसिकता हा फॅक्टर सुद्धा केंद्रित होणार आहे.
म्हणून मनाची काळजी घ्या. मन फर्स्ट क्लास तर शरीर सुद्धा फर्स्ट क्लास.
लेख कसा वाटला नक्की सांगा.


