Skip to content

मी कोण….माझं अस्तित्व ते काय …..?

सपना फुलझेले
नागपूर
माझ्या स्वतः कडुन नेमक्या अपेक्षा कोणत्या …? मला साध्य काय करायचय…? त्यासाठी काय साधनं आणि कोणती पात्रता,अपेक्षित आहे…! माझे गुण, माझे दोष,माझा स्वभाव कसा…? त्यातील उणिवा काय ? मी समाजाचं काय देणं लागतो. माझं शाश्वत असं काय आहे …. जे माझ्यानंतर ही टिकून राहील….!
असे प्रश्न कधी आपल्याला पडतात का …असं  म्हणण्यापेक्षा, आपण स्वतः कधी स्वतःबद्दल असा विचार तरी करतो का ….?
कारण हा काय म्हणतो …तो काय म्हणेल …. त्यांच्या माझ्याकडून काय अपेक्षा असतील …. मला काय मिळेल…..! माझ्या जबाबदार्या काय ….? समाजात, लोकांत माझी पत काय…ते माझ्याकडे कोणत्या नजरेने बघतील… याच विचारचक्रात आपण अडकलेले असतो. इतरांच्या चश्म्यातुन स्वतःला बघत असतो. त्यांच्या विचाराप्रमाणे स्वतःला कमी अधिक लेखत असतो पण,
आपण स्वतःला स्वतःच्या नजरेतून बघतोच कुठे ?
आपली  शैक्षणिक, पारिवारिक, सामाजिक स्थिति, इतरांच्या नजरेत आपली असणारी प्रतिमा, यावरुन आपल्या व्यक्तीमत्वाची जडणघडण आपण करत असतो. पण आपल्याला हे लक्षातच येत नाही किंबहुना आपण विचारच करत नाही की, प्रत्येकवेळी आपल्याला पारखणारी व्यक्ती वेगळी, त्यांची नजर वेगळी, त्यांचा उद्देश आणि त्यांचा दृष्टिकोन ही वेगळाच असणार आहे. आणि व्यक्तिपरत्वे तो बदलतच जाणार आहे. 
मग कधीपर्यंत आपण इतरांनी तयार केलेल्या  दुर्बिणीतुन स्वतःला बघून स्वतःचे मुल्यमापन करत राहणार…? एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणुन, एक माणुस म्हणुन स्वतःच्या बुद्धिचा वापर, विचारांचे, परिस्थितीचे आकलन, कधी आणि कसे करणार …..जगाकडे, इतरांकडे बघण्याची ती सुक्ष्म आणि निकोप दृष्टी कुठून आणणार ? 
बऱ्या वाईट अनुभवांची सांगड घालून निर्णयक्षमता कशी विकसित करणार ….? स्वतःला कसं सिद्ध करणार…..! स्वतःतला ‘स्व’ शोधण्यासाठी खरं तर आत्मभानाची गरज असते. आणि जेव्हा आत्मशोधासाठी मन सज्ज होतं तेव्हा काळ, वेळ, व्यक्ती, परिस्थिती याची तमाच उरत नाही….कारण तेव्हा संघर्ष हा जगाशी नाही तर स्वतःशी असतो…! साधक ही आपण आणि साध्य ही आपण स्वतःच असतो. तेव्हा अजेय ही स्वतःच आणि विजय ही स्वतःचाच  असतो ….. !!!

***
आपलं मानसशास्त्र’ या अधिकृत पोर्टलला  भेट द्या आणि सामील व्हा !

आपलेही प्रेरणादायी लेख आम्हाला ९१३७३००९२९ या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवा. आपल्या नावासकट अत्यंत नम्रपणे ते प्रकाशित केले जातील.
“आयुष्य सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!