प्रत्येक वळणावर आपल्याला नात्यांची गरज असणारच आहे.
मेरज बागवान
मनुष्य प्राणी हा समाजशील प्राणी आहे हे आपण सर्व जाणतोच.याचाच अर्थ, तो एकटा नाही राहू शकत.त्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती गरज असते ती ‘आपल्या माणसांची’.म्हणून च मग जन्माला आली ती ही ‘नाती’.
माणसाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक नाती निर्माण होतात.काही जन्मतः , रक्ताची असतात तर काही आपण स्वतः निर्माण केलेली असतात.पण कोणतेही नाते असो, ही सगळी नाती आपले आयुष्य परिपूर्ण बनवितात आणि आयुष्याला एक सुंदरसा आकार देतात.आपण आपले अस्तित्व निर्माण करू शकतो ते केवळ ह्या नात्यांमुळेच.म्हणूनच माणूस म्हणून जगताना ही नाती जपणे हे खूप महत्वाचे आहे.
तस बघायला गेलं तर , ‘नाती जपणे’ हा खूप कोमल, नाजूक आणि संवेदनशील विषय आहे.आजच्या धकाधकीच्या आयुष्यात नाती जपणे,नात्यांमध्ये ‘सुसंवाद’ टिकवून ठेवणे जणू आव्हानात्मकच झाले आहे. ‘सुसंवाद’ तर नंतरची गोष्ट झाली, पण प्रथम ‘संवाद’ साधायलाच आपल्याकडे वेळ नाही.
नाती मग कोणतीही असतो, आई-वडील, नवरा-बायको, भाऊ-बहीण, इतर नातेवाईक, मित्र-मैत्रिणी हे सगळे जण आपले आयुष्य समृद्ध करीत असतात.खरे तर त्यांच्यामुळेच आपण यशाची शिखरे पादक्रांत करीत असतो.पण आज ह्या स्पर्धेच्या युगात,अक्षरशः ह्या नात्यांकडे आपण दुर्लक्ष करीत आहोत.पण हे कुठे तरी थांबले पाहिजे.
प्रत्येक गोष्टीला आयुष्यात प्राधान्यक्रम असावेत, पण नात्यांबद्दल तडजोड होता कामा नये.नोकरी, व्यवसाय ,पैसा, प्रसिद्धी, नावलौकिक , यश गमावले तरीही ते पुन्हा मिळविता येते.पण एकदा का नात्यांना तडा गेला, आपण नाती गमावली की ती पुन्हा पूर्वपदावर आणणे महाकठीण होऊन बसते.
बाकी सर्व सुख-सोयी असतील पण आपली जवळची माणसेच आपल्या बरोबर नसतील तर ह्या सगळ्याचा काहीच उपयोग नसतो.म्हणूनच वाटते, अमाप पैसा कमवा, नाव कमवा , यश खेचून आणा पण ह्या सगळ्याच ‘सेलिब्रेशन’ करायला ‘आपली माणसं’ कायम आपल्या सोबत असायला हवीत, त्यांना नेहमी धरून राहिले पाहिजे.
काही वेळेस एकत्र कुटुंबियांसोबत असताना देखील , जो तो आपल्या आपल्या मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसलेला असतो.पूर्वी सारख्या गप्पा, गाण्याच्या भेंड्या,गोष्टी सांगणे ह्या काही गोष्टी काही ठिकाणी लोप पावताना दिसत आहेत.पण जिवंत असूनही असे निर्जीव , किंवा एखाद्या यंत्रासारखे आयुष्य जागून आपण काय मिळवणार आहोत?
आपण ‘माणूस’ आहोत.आपल्या भावना ह्या स्पर्धेच्या युगात बंद कुपीत ठेवण्यापेक्षा , आपल्या माणसांकडे त्या व्यक्त करायला शिकले पाहिजे. ह्या भावनांचा निचरा वेळोवेळी झालाच पाहिजे.नाहीतर ह्या यांत्रिक जीवनाला काही अर्थच उरणार नाही.
आणि ही विधात्याने दिलेली अनमोल नाती जीवापाड जपली पाहिजेत.आणि हसत-खेळत आपल्या माणसांबरोबर खऱ्या अर्थाने जगायला शिकले पाहिजे.
‘माणूस’ म्हणून जगताना एवढं तर आपण नक्कीच करू शकतो , नाही का?


