Skip to content

जे बाईचं काम आहे, ते पुरुषांनी का करावं ???

बाईचं काम पुरूषाने का करावं ?


शुभम मिसाळ
१७/१०/२०२०


सध्या दसरा चालूय. आपल्या संस्कृतीत खूप सण-उत्सव आहेत. जेकी आपण जात,धर्म,रंग, लिंगभेद यासारख्या समाज विघातक गोष्टी बाजूला ठेवून ते अतिशय आनंदाने, प्रेमाने आणि एकमेकांच्या सहकार्याने साजरे करतो. आणि हेच वेगळेपण इथल्या समाजव्यवस्थेला एक महत्त्व प्राप्त करून देतं.

बाकी भारतीय संस्कृतीतील रूढी-परंपरांना किती वैज्ञानिक दृष्टीकोन आणि अंधश्रद्धा रुजलेली आहे हा इथं स्वतंत्र विषय होऊ शकतो.असो… परंतू अगदी प्राचीन काळापासून आपल्या एकूण संस्कृतीमध्ये स्त्रियांची भूमिका खूप महत्त्वाची राहिली आहे. हे अत्यंत महत्त्वाचं.

आम्ही लहानपणी दसऱ्याला गावा शेजारच्या नदीला किंवा बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी जात असे. त्यावेळी आईला कपडे धुण्यास मदत करण्याचा तो उत्साह, आनंद कायम अविस्मरणीयचं. कारण त्या बालवयात कपडे ही फक्त स्त्रियांनीच धुवायची असतात? ते त्यांचेच काम असतं? ते पुरुषांनी का करावं? यासारखे प्रश्न पडण्याचं एवढं निरर्थक शहाणपण कुठलं आलंय. जे आज जास्त प्रमाणात पुरुष वर्गाला दिसून येतं. आणि खऱ्या अर्थाने इथूनच म्हणजे आपल्या स्वतःच्या घरातूनचं स्त्री आणि पुरुष हा भेदभाव सुरु होतो.

आपल्या पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेत पहिल्यापासून स्त्रियांवर खूप अन्याय झाले आहेत. आजही सामाजिक दृष्ट्या विचार करता स्त्रियांना स्वतंत्रपणे जगण्याचा कायद्याने हक्क असला तरी, त्यांच्यावर समाजाची खूप बंधने लादलेली दिसतात. आणि याचमुळे आज देखील आपल्या समाजात स्त्री गुलाम म्हणूनचं जगतेय हे खरं वास्तव आहे.

आणि ते आपण बदलणं आधुनिक पर्वासाठी खूप सकारात्मक असेल. स्त्रियांच्या बाबतीत बालविवाह, शैक्षणिक तसेच सामाजिक दृष्ट्या अज्ञान या गोष्टी खूप परिणामकारक ठरतायत. पुरुषापेक्षा स्त्री ही कमकुवतचं आहे, ही समाजात असलेली नालायक प्रवृत्तीची मानसिकता प्रथमत: बदलली पाहिजे.

विशेषत: आज स्त्रिया स्वतःच्या हिमतीवर प्रत्येक क्षेत्रात अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत स्वतःचं नाव कमवू लागल्या आहेत; हा आधुनिक आणि काळाला अपेक्षित असा बदल इथल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेला खूप आत्मपरीक्षण करायला लावणारा आहे.

मित्रबंधूहो ! निसर्गानेचं स्त्री आणि पुरुष हा माणसांत भेद निर्माण केला असला तरी; आपल्या प्रत्येकामधला खरा जिवंत माणूस मानवतेच्या दृष्टीने या भेदभावाला किती प्रामाणिकपणे, समतेने न्याय देतोय, ही बाब अतिशय समाज परिवर्तनशील ठरेल.चला तर मग… समाजातील सारे भेदभाव विसरून एक चांगला माणूस बनूया.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!