Skip to content

मानसिक आरोग्यासाठी चार पैसे खर्च करूया…

‘सुदृढ मनासाठी चार पैसे खर्चूया!


डॉ. सुलोचना हर्षे


ध्येयाकडे वाट चालत रहाणे, चौरस आहार , नैतिक मुल्यांवर आधारित आखीव दिनक्रम आणि भावनिक दृष्ट्या आत्मनिर्भर असणे म्हणजे मनाने सुदृढ असणे. आपण समाधानी व इतरांना आश्वस्त ठेवणारा असे प्रत्येकाने असलेच पाहिजे.

पूर्वी दात दुखला तरच डेंटिस्ट कडे जायचे असा दंडक होता. आता डेंटल चेक-अप रूढ झाला आहे.

मानसिक चेक -अप मात्र आजही टाळलाच जातो. ‘स्वभाव’ म्हणून व्यक्तिमत्वातले दोष दुर्लक्षिले जातात. ‘कडक स्वभाव’ या नावा खाली विक्षिप्तपणा झाकून ठेवला जातो. त्यात ही लाडावलेल्या मुलीचा लहरीपणा सूक्ष्मदर्शकातून तपासला तरी जातो ; पण पुरुषांमधला हिंस्त्रपणा शौर्या सारखा मिरवला जातो. पत्नीचा हकनाक बळी जातो. हळवेपणा ,बुजरेपणा,भांडकुदळपणा ,अनावर संताप, फेकाफेकी, मारामारी, स्वत:ला इजा करून घेणे,अपयशाने खचणे, ‘ब्रेकप’मुळे कोलमडणे, सहकारी त्रासदेतात म्हणून नोकरी सोडणे, विभक्त रहाणे … ही सगळी अशक्त / दुबळ्या मनाची लक्षणे आहेत.(काही सन्माननीय अपवाद असतात).

मन निकोप नसेल तर शालेय जीवनापासूनच लक्षणे आढळून येतात. प्रथम सामाजिक अडचणी दिसतात. एकटे पडतात.मग अभ्यास जमेनासा होतो. त्यासाठी विशेष ट्युशन लावली जाते.पण काउंसेलरने सुचविले तरी मानसोपचार केंद्रात कुणी जात नाही/मुलांना नेत नाही.

“तपासणी करून घेऊ” ऐवजी “तुम्ही समजून घ्या” असा पवित्रा असतो. मारहाण करणारे पालक व शिक्षक आपल्या वर्तनाकडे समस्या म्हणून पहातच नाहीत. पण मुलांना त्याचा फार त्रास होतो. मार खाणा-यांचा ‘स्व’ नीटपणे विकसित होऊ शकत नाही. पुढे त्यांना नात्यांमधे ठाम भूमिका घेता येत नाही. प्रत्येक नात्यात हे ‘ओझ्याचे गाढव’ बनतात.त्यांचे शोषण होते.

आज आपल्याकडे उत्तम डॉक्टर, औषधे ,स्वमदत गट आणि कुटुंबाचा आधार उपलब्ध आहे. पण समाजाकडून स्वीकार मात्र नाही. त्यामुळे तीन भिंतींच्या निवा-या सारखी स्थिती आहे.

1% व्यक्ती मनाने आजारी आढळतात. त्यांच्यापैकी फक्त 4-5%च उपचार घेतात. म्हणजे आपल्या भारतात 13 कोटींआजारींपैकी फक्त 4-5 कोटींपर्यंतच मदत पोचते. त्याचे कारण ‘औषधे नको’ हा गैर समज. पालकांकडून औषधे बंद करण्याचे ध्येय ठेवले जाते. ब्लड-प्रेशर आणि शुगर साठी 3-4 गोळ्या कायम घ्यायच्या हे चालते.

पण मनासाठी किती ? कुठवर असे निकष निष्कारण लावले जातात. औषधे घेण्यास समाजानेही प्रोत्साहन दिले पाहिजे. ‘झोप येते/ गुंगीत रहातो अशा सबबी सांगत औषधे थांबवली जातात. अशावेळी औषधे घेत असलेल्या व्यक्तीच मार्गदर्शन करू शकतात. ‘ही तात्पुरती स्थिती आहे, काही दिवसांनी जाईल’ हे कळल्यावर उपचार चालू रहातात.

औषधांचा अनुभव व उपचार चालू ठेवण्यासाठी आधार ,केवळ त्यातून जाणारेच देऊ शकतात. पण प्रत्यक्षात अनुभव नसलेल्या लोकांचा सल्ला मानला जातो. तज्ञांचा नाही. दुर्दैवाने आजही समाजाला मानसिक समस्येने ग्रस्त व्यक्ती व गतिमंद यातील फरक माहीत नाही.

सरकारी धोरण ठरवतांना समस्याग्रस्तांच्या अनुभवांना व सूचनांना महत्व दिले पाहिजे ही बाब आत्ता कुठे लक्षात येऊ लागली आहे. तसेच समस्याग्रस्तांचा सक्रीय सहभाग उपचाराच्या सर्व पातळ्यांवर व प्रत्येक टप्प्यावर अपरिहार्यच असतो ह्या सत्याची जाणीव झाली आहे. आजवर समाज व तज्ञच सगळे निर्णय घेत आलेले आहेत.त्यामुळे म्हणावी तितकी प्रगती झाली नाही.

प्रत्यक्ष मानसिक आजार नसला तरी , त्याच्या अलिकडची अवस्था सर्रास आढळते. माणसांना भावनिक,वैचारिक वा वर्तन समस्या असतात.त्यात प्रत्यक्ष त्या समस्याग्रस्त व्यक्तीने (च) करण्यासारखे बरेच काही असते.

औषधांची गरज नसली तरी वर्तन समस्यांसाठी वर्तनोपचार असतात. विवेकी विचार वा भावनांचे व्यवस्थापन शिकता येते. बेताल वागणे घालवून जबाबदार वर्तन अंगिकारता येते.टाळाटाळ करण्या ऐवजी पुढाकार घ्यायला शिकवता येते.

“माझ्या भावना ही माझी जबाबदारी” हे लहानपणापासून शिकवायला हवे. आपण “त्याने तिला रडविले”/ “तू मला उचकवतेस “”आता माझी सटकली” असे शब्द प्रयोग आजच्या विज्ञान युगातही वापरतो. परदेशात ओरडून बोलणे मुळीच खपवून घेतले जात नाही.

आपल्याकडे गैर वर्तनाचे समर्थन केले जाते. हात उचलणे, तावा तावाने भांडणे यात फारसे काही बिघडले असे कोणाला वाटत नाही. .त्यामुळे माणसे गाफील रहातात.. वेळेवर उपचार घेत नाहीत व व्यक्तीमत्वाचा -हास होऊ दिला जातो. मग समस्या बळावते.

समाजात जुळवून घेता येत नाही. नोकरी/घर/जोडीदार बदलण्याचे प्रयोग चालतात. रोजीरोटी ची समस्या उद्भवते.संसार मोडतात. प्रत्येक भावनिक उद्रेका बरोबर व्यक्तीमत्वाची पडझड होत रहाते. ते दुरूस्त करून पुन्हा उभे रहाणे वेळखाऊपणाचे व अत्यंत जिकीरीचे असते. असते. भावना,वर्तन व विचार नीट रुळावर ठेवण्यासाठी वेळोवेळी व्यावसायिकांची मदत घेतली पाहिजे.

नाव देता येईल असा आजार नसला तरी मनाचा अशक्तपणा माणसाच्या उत्पादक कार्यक्षमतेत उणीव निर्माण करतो. मानव संसाधन वाया जाते. ‘स्वमदत गट’ म्हणजे मनाची व्यायामशाळा. मनाची शक्ती वाढवता येते. आज काल ऑनलाईन गट उपलब्ध आहेत. त्याचा लाभ घ्यावा.

‘प्रजीत’स्वमदत गट अत्यल्प शुल्कात मनोबोधाचे काम करतो. आपल्या मानसिक समस्येच्या स्वरूपाबद्दल जाणीव जागृती व मार्गदर्शन या त्रयींच्या मदतीने आपापल्या भावना,विचार व वर्तनावर नियंत्रण मिळवून माणसे शांतपणे जगू लागतात. नोकरी/व्यवसाय व नाती समर्थपणे पेलू लागतात.

मनाला त्रास असलेल्यांची हेटाळणी करणे थांबवले पाहिजे. त्यांना चांगली बुद्धी असते ही माहिती दिली पाहिजे.मानसिक समस्येने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना समाजाची सहानुभूती मिळत नाही.’ हटवादीपणा म्हणजे लवचिकतेचा अभाव’ हे माहीत नसल्याने,’मुद्दाम करतो/करते’ असे गैर समज आढळतात.

मानसिक समस्याग्रस्तांची प्रतिमा मलिन करण्यात पुढाकार घेऊन मिडिया फार बेजबावदारपणे वागते असे खेदाने म्हणावे लागते. सामाजिक कौशल्ये नव्याने शिकता येतात व कोलडल्यानंतरही पुन्हा उभे रहाता येते हे लक्षात ठेवावे.त्या साठी सहकार्य करावे.

चला तर मग ,यावर्षा पासून मनाच्या सुदृढतेसाठी चार पैसे खर्च करू.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!