हळूहळू फुलणारं प्रेम
सौ. भारती गाडगिलवार
पदवी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात होते तेव्हाची गोष्ट… बाबा नागपूरचे मोठे प्रस्थ… तसेच आमच्या समाजात त्यांचं मोठं नाव होतं…प्रत्येकालाच त्यांच्या लहानसहान कार्यक्रमात बाबांची उपस्थिती महत्वाची वाटायची…..जवळच्याच एका लग्नात जाण्यासाठी बाबांनी जोर दिला… बाबांच्या समोर आम्हा भावंडांचे मुळीच चालत नव्हतं…. जावंच लागलं… जणू काही ही पुर्व नियोजित गोष्ट होती माझी अन् यांची भेट घालून देण्याची किंवा माझी नियती हे त्यांनाच ठाऊक…
तारूण्यात प्रवेश केलेले प्रत्येक तरुण, तरूणी याच आविर्भावात असतात की आपणच सर्वात सुंदर, स्मार्ट दिसत आहोत…मग मी सुद्धा त्याला अपवाद कशी असणार…
गेलो लग्नात… आपणच सर्वात स्टायलीश आणि देखणे आहोत या गर्वात सर्वत्र फिरतोय काय…मजा करतोय….आणि किती छान दिसतेस हे ऐकण्यातच आम्ही बहिणी मग्न होतो… अशातच एक तरूण नेमका माझ्या खुर्चीला त्याची खुर्ची टेकवून बसला…मी आधीपासूनच बसलेली असल्याने त्याने तेथून उठून जावं असं वाटत होतं पण ना तो उठला ना मी…ही आमची पहिली भेट…
दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाहण्याचा कार्यक्रम… मला वेळेवर कळलं कुणी येणार आहे म्हणून… कार्यक्रम व्यवस्थित पार पडला… मानपान, देणं घेणं सर्व ठरलं…पण जीला लग्न करायचं आहे तिला विचारायचं नाही… मुलाला मुलगी पसंत पडली हे महत्त्वाचे…या विचारांचे पुरस्कर्ते असलेला समाज…याच विचारांवर आधारित लग्न ठरतात…
बाबांना म्हटले देखील दुसरा पाहुयात हा जरा गंभीर स्वरुपाचा दिसतोय… ‘काय?’ या बाबांच्या एकाच शब्दात समजून घेतले की आज आलेला हाच जीवनाचा जोडीदार राहणार हे निश्चित….
आले सासरी नविन आयुष्याचं स्वप्न घेऊन… सुरवातीला अगदी चित्रपटात दाखवण्यात येते ना तसंच… नंतर हळूहळू नवेपणा ओसरला आणि खऱ्या आयुष्याला सुरुवात झाली…. खरं तर हे माझ्या पेक्षा वयाने ८ वर्ष मोठे आहेत, म्हणून वाटायचं की यांनी आपल्याला समजून घ्यावं…पण जास्त अपेक्षा ठेऊ नये माणसाने अपेक्षाभंग होतो याची जाणीव हळूहळू व्हायला लागली… रुसवे फुगवे… वादविवाद व्हायला सुरुवात झाली….याला काही लोक ‘पेल्यातलं वादळं ‘असं देखील म्हणतात….
पुरुष हा स्त्रीयांपेक्षा नेहमीच वेगळा असतो…स्त्रीया ज्याप्रमाणे आपल्या मनातील सर्व बोलून दाखवितात तसं पुरूषांना जमत नाही म्हणजे त्यांचं आपल्यावर प्रेम नाही असा अर्थ मुळीच होत नाही…. दुर्दैवाने हे समजायला जरा उशीरच झाला…
पण यात माझा काहीच दोष नव्हता. खरं तर दोष हा कोणाचाच नसतो…लग्न करताना ‘वर’ हा आर्थिकदृष्टया सक्षम असणे ही सर्व सामान्य अट असते. ही अट पुर्ण करेपर्यंत तो २७ ते २८ च्या घरात पोहोचतो… तर ‘वधु’ साधारण २० ते २२ वर्षाच्या दरम्यान असते…
काॅलेजमध्ये जाणारी, मैत्रीणींमध्ये रमणारी, थोड्या प्रमाणात फिल्मी दुनियेत वावरणारी असते… अचानक संसाराची जबाबदारी पेलण्यासाठी असमर्थ असते….त्यातच सर्वांच्या अपेक्षांवर खरं ठरण्याची कसरत आणि स्वतःच्या स्वप्नांचा झालेला चुराडा या सगळ्यात तिची होणारी ओढाताण या सर्वांवर मात करण्यासाठी पतीकडून सहानुभूती ची अपेक्षा ठेवायची म्हटलं तर तोही दिवसभराच्या कामातून थकलेला….
अशातच समज, गैरसमज, वादविवाद या सर्वांची सुरुवात होते…. अर्थात अपवाद असतातच…मी सुद्धा या सर्व प्रकारच्या गोष्टीतून स्वतःला सावरलं पण त्यालाही वेळ लागलाच… सगळ्या गोष्टी सुरवातीलाच आपल्या मनासारख्या कश्या होतील… होणं…
एकाच वेळी आई वडीलांची काळजी घेणारा आणि त्याचवेळी त्यांच्याविरुद्ध जाऊन माझ्या शिकण्याच्या इच्छेचं समर्थन करताना दोन विरुद्ध मनांचा बॅलन्स सांभाळणं त्यांनाही कठीणच जात होतं…
जोपर्यंत परिस्थिती बिघडत नाही तोपर्यंत वस्तुंची आणि व्यक्तीची किंमत कळत नाही हे जरी सत्य असले तरी गैरसमजातून होणारा वाद हा भलत्याच दिशेने वाटचाल करतो… परिणामी स्थिती गंभीर रुप धारण करते…असेच काहीसे अनुभव माझ्या आयुष्यात देखील आहेत…पण वेळीच सावरणं महत्त्वाचं असतं…
सुरवातीला ह्यांचा राग करणारी मी केव्हा त्यांच्या प्रेमात पडली हे मलाही कळलंच नाही….सतत गंभीर चेहरा घेउन फिरणारे, जरा कुठे कमी जास्त झाले की रागावणारे, कधीही माझ्यावरच्या प्रेमाची कबुली न देणारे माझ्यावर इतका जीव लावतात याची जाणीव व्हायला आयुष्याची काही वर्षे उलटून गेली….
मुलांचे आजारपणं म्हणा किंवा सासु सासरे यांची देखरेख, काळजी घेण्यात कुठल्याही प्रकारची कमी करत नव्हती… घरात जरी कमी वेळ देत असले आणि कोणतीही प्रतिक्रिया देत नसलेले सगळीकडे चौफेर लक्ष ठेवायचे….
अचानक एक दिवस जेव्हा आपलं प्रिय माणूस निघून जातो तेव्हा लक्षात येतं की आयुष्य किती क्षणभंगुर आहे आणि उगाच आपण राग लोभ यांसारख्या गोष्टींना व्यर्थ कुरवाळत बसलोय…जो वेळ आहे तो आपल्या लोकांसोबत घालवायला पाहिजे. त्यांच्या प्रती असलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली तर आपसातील प्रेम अधिकाधिक वाढत जाते…
खरं तर माणसाचं प्रेम हे असच असतं अव्यक्त स्वरूपात…पण प्रत्त्येक नात्याला चकाकी येण्यासाठी ते व्यक्त होणं गरजेचं असतं…
प्रेम ही एक अनुभूती आहे भावनांची, विचारांची… जिचं अस्तित्व एकमेकांच्या भावनांच्या देवाण-घेवाणावर टिकून आहे… अशा प्रकारे प्रेम निर्माण होते… प्रेमाला वयाचे बंधन नसते…
जसजसं वय वाढत जातं तसतसं प्रेमाची परिभाषा अधिक विस्तृत होत जाते…आकर्षणाची जागा काळजी, आपलेपणा केव्हा घेते हे आपल्याला ही कळत नाही… आणि हेच खरं प्रेम होय. आज वयाची चाळीशी पार केलेला माझा जय माझी काळजी घेतोय हे त्यांचे माझ्याप्रती असलेलं दृश्य स्वरूपातील प्रेमच होय. मी देखील त्यांच्या वर तेव्हढेच प्रेम करते हेही तितकेच खरं…


