कोणत्याही नात्यात जेव्हा एकजण मनमानी करतो.
निशिगंधा जोशी
काल एक पोस्ट वाचली. तीन दशके सहन करण्याची कमाल मर्यादा एका आपल्यातल्याच एका सखीने गाठली आहे असे वाचण्यात आले. कोण, काय, कसे याचा ऊहापोह न करता मूळ मुद्दा “सहनशीलता बऱ्याचदा कशी घातक ठरते” यावर चार शब्द लिहिते.
गेल्या काही शतकांपासून आपली संस्कृती पुरुषप्रधान आहे. स्त्रीचे स्थान पुरुषाला पूरक तसेच संसारामध्ये बहुतेक कुटुंबात दुय्यम मानले जाते, स्वतंत्र नाही. मग ती बहीण असो, लेक असो की सहचारिणी. आई या नात्याला मुलाकडून मान मिळतो त्यातल्या त्यात. सगळ्याला अपवाद आहेत, पण मी हे जनरल विधान केले आहे.
एकदा दुय्यम म्हणाल्यावर मग ओघानेच न पटणाऱ्या गोष्टींशी जमवून घेणे आले. अगदी आजच्या काळातही आर्थिक दृष्ट्या स्वतंत्र असलेल्या स्त्रियांना सुद्धा स्वतःचे म्हणणे चालवता येतेच असे नाही. निर्णय स्वातंत्र्य नसते. वर्षानुवर्षे त्या हे सहन करत, मन मारून जगत असतात.
मुलगी नोकरी करणारी असली तरी गृहकृत्यदक्ष, सगळ्यांशी जमवून घेणारी असावी अशी मुलांची अपेक्षा असते. सहनशील मुलगी आदर्श पत्नी, स्त्री मानली जाते अजूनही.
कित्येक शतकांपासून स्त्री या प्रतिमेच्या चौकटीत अडकली आहे. सहन करणे इतके आदर्श का मानले जाते? या विचारांच्या पगड्यामुळे कित्येक प्रश्न निर्माण होतात. कसे ते सविस्तर बघू.
१) दोघांच्या नात्यात जेव्हा एकजण मनमानी करतो आणि दुसरा, विशेषतः बहुतांशी स्त्री सहन करत रहाते तिथे नात्यात प्रेम न राहाता ते नुसते नाते धाकाने निभावत रहाणे होऊन बसते.
२) सहन करणारी व्यक्ती योग्य, तार्किक, व्यवहारी विचार करणारी असेल तरी तिचे म्हणणे दडपले गेल्याने तिच्याशी संबंधित बाकीच्या नात्यांना ती बौद्धिक दृष्ट्या सक्षम असूनही न्याय देऊ शकत नाही. उदा. एखादी आई कितीही सुज्ञ असेल तरी घरात वडिलांची हुकुमशाही चालत असेल तर मुलांच्या बाबतीत ती योग्य, अयोग्य काहीही बोलू शकत नाही, निर्णय घेऊ शकत नाही. पर्यायाने मुलांचे भावनिक संगोपन एकांगी होऊ शकते आणि तेही मग तोच वारसा पुढे चालवू शकतात.
३) जोडीदार चुकीच्या गोष्टी सहन करत विरोध न दर्शविता जगत असेल तर दुसऱ्या व्यक्तीला ती वागते ते बरोबर आहे असेच वाटत राहते. एकदा या सवयी अंगवळणी पडल्या की खूप काळाने विरोध करणे भयंकर खटका उडणारे, स्फोटक ठरू शकते. इथे प्रश्न असा उपस्थित होतो की मग सुरुवातीपासून भांड्याला भांडं लागणं चांगलं का? तर नाही. नवीन लग्न झाल्यावर थोडा एकमेकांना वेळ द्यायलाच लागतो समजून घ्यायला. वेगवेगळ्या कौटुंबिक वातावरणामुळे व्यक्तिमत्वे वेगवेगळी घडलेली असतात. लगेच 100% पटेल अशी अपेक्षा नसतेच पण थोडा काळ गेल्यावर काही गोष्टी नित्य खटकत असतील तर त्यावर विचार करायला हरकत नाही.
इथे पुन्हा बरोबर, चुकीचे हा मुद्दा व्यक्तीसापेक्ष असतो असा एक विचार येईल पण विचारी व्यक्तीने स्वतःच्या मनाशी प्रामाणिक राहून, जोडीदाराच्या जागी स्वतःला ठेवून साक्षीभावाने आधी विचार करायला हवा.
परिस्थिती बदलण्यासाठी दोघांनीही पुढाकार घ्यायला हवा. चर्चेने, मार्गदर्शनाने मार्ग निघू शकतो. एकमेकांमध्ये विचाराने समन्वय होत नसेल तर विश्वासा च्या व्यक्तींशी बोलून मदत घ्यावी. थोडक्यात एकत्र राहणे काय किंवा वेगळे होणे काय, समजुतीने व्हायला हवे. भांडणाने मनावर कायमचे ओरखडे उठतात.
४) सहन करणाऱ्या व्यक्ती मनात कुढत रहातात. बोलून दाखवत नसल्याने राग मनात साचून राहतो. वेळच्यावेळी त्याचा निचरा न झाल्याने त्याचे मनावर आणि शरीरावर नकारात्मक परिणाम होतात. कधीकधी असेही होते की गप्प राहून राहून साचलेल्या रागाचे, सहन केलेल्या गोष्टींचे ज्वालामुखी मध्ये रुपांतर होऊन भयंकर स्फोट होतो ज्यामुळे कधीही न सांधता येण्यासारखा नात्याला तडा जातो.
५) बऱ्याचदा एखाद्याच्या सहनशीलतेला स्वार्थासाठी खूप गौरवले जाते. ती व्यक्ती त्या प्रतिमेच्या जाळ्यात गुरफटत जाते आणि पूर्णपणे कैद झाल्यावर तिच्या आपलेच झालेले नुकसान लक्षात येते किंवा कधीकधी स्वत्वाची जाणीव सुद्धा होत नाही.
६) सतत गप्प बसण्याने, सहन केल्याने व्यक्ती आत्मविश्वास गमावून बसते. बऱ्याच ठिकाणी आत्मविश्वास नसल्याने सहनशीलतेची चादर नकळत पांघरली जाते. दोन्ही व्यक्तिमत्त्वासाठी घातकच.
इतके सगळे लिहिण्याचे कारण सहनशीलता एका मर्यादेपर्यंत चांगलीच असते. उठसुठ भांडणे ठीक नाही पण प्रमाणाबाहेर सहनशीलता दाखवून आपणच आपले आणि त्याचबरोबर प्रेमाच्या माणसांचे नुकसान करीत असतो हे कायम लक्षात ठेवले पाहिजे आणि वेळीच ठाम भूमिका घेऊन, व्यक्त होऊन स्वामदत केली पाहिजे.
माझ्या अल्प बुद्धीला जे सुचले ते लिहिले. नात्यात, ओळखीत, आजूबाजूला अशी अनेक आयुष्ये घुसमटत जगताना आणि तशीच विझून जाताना पहिली आहेत. एखादी व्यक्ती जरी हे वाचून जागृत झाली तरी खूप समाधानाचे ठरेल तिच्यासाठी आणि तिच्या प्रेमाच्या माणसांसाठी.
अशा साऱ्या सख्यांना माझ्याकडून खूप शुभेच्छा.


