मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.
अमिता भिलारे लोणकर
आज काल आत्महत्या तसेच मानसिक आजाराचे प्रमाण वाढत आहे आर्थिक विवंचना ,कोरोना, आजारपण कारणे अनेक आहेत, एकविसाव्या शतकातलं सर्वात मोठा आजार म्हणून मानसिक आजार असल्याचे अनेक जाणकार आणि तज्ञांनी सांगितले आहे अशा रुग्णांना मदत करण्यासाठी 104 हा हेल्पलाईन क्रमांक 24 फेब्रुवारी 2015 पासून सुरू करण्यात आला आहे.
शरीर आजारी पडतं तसं मनही आजारी होतं, यालाच मनाचा आजार किंवा मानसिक आजार असं म्हणतात. याची लक्षणे म्हणजे भूक जास्त लागणे, भूक एकदम कमी होणे, छोट्या छोट्या गोष्टीवरून irritated होणे, कोणत्याही कारणाने अचानक रडू येणे, छोट्या छोट्या गोष्टीचा ताण येणे,नेहमी उदास वाटणं, कशातच रस न वाटणे, हृदयावर ताण येणे,डोक जड होणे यातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचार तज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे हे खूप महत्त्वाचं आहे.
त्याच बरोबर आजूबाजूच्या निसर्गात रमा, आपल्या जवळच्या मित्र-मैत्रिणींशी बोला,मन हलके करा, प्राणायाम,योगा,ध्यानधारणा करा, आवडीचं संगीत ऐका, कुंडीतल्या रूपांशी फुलांची मैत्री करा, लहान बाळांची वयस्कर व्यक्तींची मनसोक्त बोला त्यांच्याकडून खूप सकारात्मकता मिळते.
आपल्या समोर व्यक्ती आहेत त्यांच्याशी बोला मन मोकळे करा, खूप राग आला तर आरशासमोर उभे राहून ओरडा पण भावना दाबून ठेवल्यावर मनाला जास्त त्रास होतो, मनात एक तोंडावर एक बोलू नका, पारदर्शी रहा, रोजच्या रोज रात्री मन साफ करा, मनात कुणाविषयी राग, चीड, संताप ठेवू नका ,त्याने आपल्या मनाला त्रास होतो झाले गेले सोडून द्यायला शिका,अहंकार बाळगू नका, भविष्याची चिंता करत बसू नका, तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही घडत असता.
जीवनात सकारात्मक होकारार्थी विचार करा आपल्याकडे काय नाही यापेक्षा काय आहे या गोष्टीचा विचार करा. आपल्या आजूबाजूच्या लोकांना समजून घ्या, टोचून बोलू नका, टाकून बोलू नका माफ करायला शिका, मन मोठे करायला शिका.
मानसिक त्रासामध्ये व्यक्तीला समजून घ्या तिला समजून न घेतल्यामुळे ती व्यक्ती एकटी पडते त्यावेळी तिला आधार द्या.
कोणत्याही परिस्थितीमध्ये मनाला ठामपणे सांगा हे ही दिवस जातील रोजच्या धावपळीत कितीतरी गोष्टी करण्यासारख्या असतात कमीत कमीत स्वतःला 10 मिनिटे तरी वेळ द्या.
उगवत्या सूर्याकडे एकटक पहा, सकाळी पक्ष्यांचा मंजुळ आवाज ऐकू येतो तो आवाज ऐका, फुलांचा सुगंध भरभरून मनात साठवून घ्या. लहान बाळांशी लहान होऊन खेळा,त्यांच्याशी बोबडे बोलणे अशा गोष्टीतूनही खूप पॉझिटिव ऊर्जा मिळते. आपल्यातलं लहान मुल नेहमी जिवंत ठेवा, वयोवृद्धांच्या हात हातात घेऊन त्यांची विचारपूस करा, मुलं शाळेतून आल्यावर त्यांना घट्ट मिठीत घ्या. त्यामुळे त्यांचा सगळा ताण दूर होईल, घरातल्या फिश टॅंक मधील माशांशी एकरूप होऊन बोला, त्यांच्याकडे एकटक पहा, जुनी गाणी ऐका,
संगीतात अशी काही जादू आहे की सगळे त्रास विसरायला होतात. संगीत आपल्या कोमेजलेल्या मनावर हळुच आनंदाची फुंकर घालत असते आपल्या मेंदूला ताजीतवानी ठेवण्याचे काम संगीत करत असते. कुठेतरी वाचनात आले आहे की रेडिओ ऐकणे पुस्तक वाचणे अशा छंदामुळे मन शांत होते हे छंद आवर्जून जोपासा. Music has the Ability to Repair Damaged Brain.
आज-काल व्हाट्सअप फेसबुक मुळे जग जवळ आले माणसे मात्र दूर गेली आहेत. आपल्या माणसांशी संवाद साधा, त्यामुळे मन हलकं होतं. आजकाल माणसांचा माणसांशी संवादच तुटत चालला आहे, त्यामुळे मानसिक त्रास वाढत चालला आहे. मेसेज, व्हाट्सअप मध्ये बोलण्यापेक्षा आपल्या जवळच्या व्यक्तींना आवर्जून फोन करा त्यांच्या आवाजावरून ही आपल्याला अंदाज येतो त्या व्यक्ती आनंदी आहेत का दुखी आहेत.
वरवर आनंदी दिसणारी व्यक्ती ही मनातून खचून गेलेली असू शकते, तुमच्या बोलण्यातून त्यांच्या मनाला उभारी द्या. मन आनंदी असेल तर सहाजिकच शरीरही तक्रारी कमी करत असते. वर्तमानात जगायला शिका, अगदी लहान मुलासारखं स्वच्छंदी आनंदी कोण काय म्हणेल याकडे लक्ष न देता हसू आलं तर हसा, रडू आलं तर रडा, मोकळे व्हा चिंता राग द्वेष काळजी मनात साठवु नका, त्यामुळे मनाला खूपच मानसिक त्रास होतो.
आपल्या आईवडिलांशी आपले प्रॉब्लेम शेअर करा, कोणीच समोर नसेल तर अगदी कुंडीतल्या रोपाकडे बघून त्याच्याशी आपल्या मनातलं सुख-दुःख शेअर करा, किंवा एखाद्या आपल्या आवडत्या निर्जीव वस्तू कडे पाहून आपलं मन मोकळं करा आवडीचा कॉफीचा मग आवडीचे घड्याळ आपण जेव्हा आपलं मन मोकळं करू तेवढा आपला मानसिक त्रास कमी होतो.
श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक आवर्जून ऐका मनाला एक वेगळीच शांतता मिळते
नको रे मना क्रोध हा खेदकारी!
नको रे मना काम नाना विकारी!
नको रे मना लोभ हा अंगिकारू!
करू नको रे मना मत्सरू दंभ भारु!
ज्या गोष्टी केल्या मुळे आपल्या मनाला शांतता लाभेल त्या आवर्जून करा गोष्टी करा कारण मनाची शांतता कुठे बाहेर मिळतच नाही ती आपणच आपल्या अंतर्मनात शोधावे लागते.
आपली गरज किती? आणि आपण कमावतो किती?कमी पैशातही खुश आनंदी राहू शकतो आपण गाडी, पैसा ,प्रसिद्धी, बंगला म्हणजे सुख नव्हे तर आत्मिक आनंद हाच खरा आनंद होय आणि आनंदी मनातच आनंदी शरीर अधिक निरोगी होतो म्हणूनच मनाला आनंदी ठेवा आणि मानसिक आजार दूर ठेवा.
मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण..


