Skip to content

‘ऑनलाइन शाळा’ पालकांनी मुलांना नेमकं कसं हाताळायचं ??

समाज माध्यम व पालकांची जवाबदारी.


मनीषा चौधरी, नाशिक
९३५९९६०४२९

आपली मराठी भाषा शाब्दिक अलंकारांनी समृद्ध आहे. “खाली मुंडी अन पातळ धुंडी” हि अशीच एक महान प्रख्यात आहे. म्हणजेच वरवर सोज्वळ वाटणारी व्यक्ती प्रत्यक्षात मात्र गुप्तपणे वाईट कृती करणारी म्हणजेच एक प्रकारचे फसवे व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती. आजकाल जिकडे नजर जाईल तिकडे खाली मुंडी पातळ धुंडी हा प्रकार सर्रास बघायला मिळतो.

कानात हेडफोन, व हातातील मोबाईल वर सराईत पणे फिरणारी बोटे,खाली झुकलेली मान, व नजर . अगदी रस्त्याने चालतानाही, एवढाच काय मॉर्निग, इव्हिनिंग वॉक करणारेही अशा रूपात दिसतात.म्हणीतील गमतीचा भाग सोडला तर फोन मध्ये एवढे काय सतत शोधात असतात कि जगाचेही भान नसावे! यात तरुणाई सर्वात आघाडीवर आहे. तारुण्याच्या पदार्पणात असलेली किशोरवयीन मुले या अवस्थेला क्रेझ मानतात.

ऑनलाईन शिक्षणाला पर्याय सध्या नसल्याने ज्या मुलांना या साधनांपासून दूर ठेवण्यासाठी आपण अनेक वर्ष धडपडलो त्याच फोन पुढे मुलांना बसऊन आपण त्याला अभ्यास कर, शिकं असे म्हणायची वेळ आली आहे. परंतु किशोरवयीन मुले ऑनलाईन अभ्यास करताना सोशल मीडियाचे मायाजाल पूर्णपणे आ वासून त्याच्या समोर उघडलेले आहे. आणि त्यांच्याही नकळत ते त्यात गुंतत जाण्याची भीतीही खूप अधिक वाढली आहे.

मध्यंतरी किशोरवयीन मुलांचा ब्लॉक रूम प्रकरण चांगलेच गाजलं व सर्वांनाच हादरवून टाकले. उचभ्रु,सुशिक्षित कुटुंबातील मुले असून पालकांच्या लक्षात हि गोष्ट आली नाही तेथे खेड्यापाड्यातील अशिक्षित कष्टकरी पालकांना कसे कळणार आपला मुलगा नेमके काय करतोय ते?

ऑनलाईन क्लास करता करता अनेक वेब साईट वर हि मुले कुतुहुलापोटी चक्कर मारतात, अनेकदा पूर्णपणे समजून न घेता कुठेही लॉगिन करतात. जेंव्हा पालकांना फोन येतात किंवा पैशाच्या बाबतीत मोठा फटका बसतो, तेव्हा मग पळापळ सुरु होते. पण तोवर फार उशीर झालेला असतो.

मुळात कुतूहल, जिज्ञासा अतिप्रमाणात जागृत असलेल्या किशोर वयीन व सर्वच वयोगटातील मुले मुलींना “इंटरनेट वापर,काळजी, सुरक्षितता व जवाबदारी” यांचे शिक्षण मिळणे हि काळाची गरज आहे. त्यांच्या जिज्ञासेला योग्य दिशा मिळाली तर इंटरनेट च्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या फसवणुकीला बळी पडणारांची संख्या कमी होण्यास मदत होईल.

व्हाट्स ऍप, फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या अनेक साईट्सवर स्वतःचे अकाउंट खोलण्याची प्रचन्ड घाई झालेली असते या पिढीला. किमान तेरा वर्ष वयोमर्यादा पुंर्ण असणे हि अट देखील पाळली जात नाही. तेरा वर्षाचे झाले म्हणजे सगळे अधिकार मिळाल्यासारखे सोशल होण्यासाठी धडपडत असतात.

आपण आहोत त्यापेक्षा छान आपला फोटो बनविणारे अनेक ऍप उपलब्ध आहेत. त्यावर क्रिएशन करून फोटो अपलोड करणे, लाईव्ह लोकेशन, स्टेट्स या गोष्टी अपलोड करून आपलं अस्तित्व सोशल करण्याची चढाओढ लागलेली दिसतेय. भले इंग्रजी नीट वाचता येत नसेन पण सोशल साईट्स वर लाईक मिळविण्याच्या धडपडीत आपला खूप वेळ वाया घालवितात हि मुले. आणि त्यांच्या हि नकळत या जाळ्यात गुरफटत जातात.

सोशल मीडिया हे असे माध्यम आहे, ज्याचा डोळसपणे वापर करणे हे फार गरजेचे आहे. खुले व्यासपीठ म्हणून जरी ते सर्वांसमोर उपलब्ध असले तरी या स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ न देणे हि देखील काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी काही गोष्टी पालकांनी जवाबदारीने करणे आवश्यक आहे. –

१} जमेल तितके पालकांनीच सतत फोटो सोशल करणे थांबवले तर त्यांच्या मुलांमधेही ती सवय रुजेल.

२} सोशल मीडियावरील हजारो फॉलोअर्स पेक्षा दोन जिवाभावाचे मित्र व नातेवाईक असले व त्यांना आपण आवडलो तरी लाखमोलाचं आहे हे मुलांना पटवून दिले पाहिजे.

३} सतत ऑनलाईन असणे याचे आरोग्यावर होणारे घातक परिणाम, डोळे, मान, पाठ, कान, मेंदू या सगळ्यावर पडणारा अतिरिक्त ताण त्यांचे दुष्परिणाम यांची मुलांना सतत जाणीव करून दिली पाहिजे.

४} कुठलेही ऍप डाऊनलोड करताना किंवा कुठल्याही सोशल साईटवर अकाउंट खोलताना अतिशय दक्ष असले पाहिजे.सर्व नियम व अटी केवळ वर सरकवून I agree न करता नीट वाचून समजून घेऊन मगच त्यात लॉगिन केले पाहिजे.

५} कोणतेही ऍप इन्स्टॉल करताना आपल्या फोनमधील कोणकोणत्या गोष्टीवर ते देखरेख करणार याची नीट माहिती घेऊन मगच ते स्वीकारायला हवे.

६} अभ्यासाच्या नावाखाली जर काही तास आपला मुलगा/मुलगी इंटरनेट च्या संपर्कात असेल तर नंतर त्यांच्या नकळत त्यांची सर्च हिष्ट्री कधीतरी पडताळून बघितली पाहिजे. संशय म्हणून नाही तर आपल्याच लेकरांच्या सुरक्षिततेसाठी. जर काही आक्षेपार्ह वाटलेच तर लगेच सौम्य भाषेत त्या गोष्टींचे दुष्परिणामहि सांगता आले पाहिजे.

७} ऑनलाईन खरेदी सोबतच ऑनलाईन फसवणूक व ऑनलाईन गुन्हेगारीचे प्रमाणही खूप वाढलेले आहे. तेंव्हा तुमची मुलं वापरात असलेला फोन नंबर तुमच्या बँक खात्याशी जोडलेला नसावा.

८} किशोरवयीन मुले/मुली काहीशी लाजरी बुजरी असतात किंवा एकदम बिनधास्त असतात. घरात जर सुसंवाद असेल तर हि पिढी आपल्या शंका घरातच मोकळेपणाने विचारून आपले कुतूहल शमवू शकतात. म्हणून आपल्या मुलां मुलींशी मित्रत्वाचे नाते जपावे.
९} ऑनलाईन शोधाशोध पेक्षा डिक्शनरी, संदर्भ पुस्तके वाचनाची सवय मुलांना लावण्याचा प्रयत्न करावा.

१०} सतत सोशल राहण्याच्या अट्टहासापायी भावनांवरील संतुलन बिघडते. चिडचिडेपणा वाढणे, सतत भीती वाटणे, अस्वस्थ वाटणे, नैराश्य येणे अशा संमिश्र भावनांची सरमिसळ होऊन पुढे आत्महत्ये सारखे प्रकार होऊ शकतात. म्हणून आपल्या पाल्यांच्या भविष्यासाठी पालकांनी सजग असणे गरजेचे आहे.

११} सोशल केलेल्या आपल्या फोटोंचा गैरवापर होऊ शकतो याची जाणीव मुलांना करून द्यावी.

१२} मुलांचे सोशल ग्रुप, त्यांचे सोशल अकाउंट यावर आपणही त्यांचे मित्र बनून त्यावर कधीतरी ऑनलाईन फेरफटका मारलाच पाहिजे.
कालानुरूप होणारे बदल स्वीकारून काळाबरोबर पुढे जावेच लागते. परंतु हे करत असताना आपल्या उमलत्या वयातील मुलांच्या भविष्याला सर्वात जास्त प्राधान्य देणे पालकांना जमलेच पाहिजे.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.



Online Career Counseling साठी !

??

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!