मानसिक आरोग्याबाबत अजूनही आपण निकृष्ट आहोत.
सचिन ना. खोले
(क्लीनिकल साइकोलॉजिस्ट)
आपलं आरोग्य चांगलं राहावं असं प्रत्येकाला वाटतं. उत्तम आरोग्य राखणं हे बऱ्याच अंशी आपल्याच हाती आहे. शारीरिक व मानसिक निरोगीपणा म्हणजे उत्तम आरोग्य. हे दोन्ही प्रकारातील आरोग्य एकमेकांवर अवलंबून आहे.
मानसिक स्वास्थ्य लाभावे यासाठी आपण झटत असतो. मानसिक आरोग्याच्या भावनिक पैलूचा जास्त विचार झालेला आढळून येतो. एखादी कृती, घटना किंवा नातेसंबंधामुळे आपल्याला बरे वाटले की आपल्याला वाटते- आपले मानसिक आरोग्य सुदृढ आहे.
हे जरी खरे असले, तरीही मानसिक आरोग्य ही स्थिर बाब नाही. वेगवेगळ्या कारणांनी (व्यक्ती व परिस्थितीजन्य) त्यात नियमित बदल होत राहतात. त्याचे स्वरूप व दर्जा यांत फेरफार होत राहतात.
मानसिक आरोग्य म्हणजे नेमके काय? त्यात कोणकोणत्या बाबींचा, प्रक्रियांचा समावेश असतो? मानसिक सुदृढता व स्वास्थ्य का महत्त्वाचे असते? या प्रश्नांची उत्तरे जीवनविषयक योग्य पर्यायांची निवड करण्यासाठी प्रेरक ठरतील.
आपल्या आरोग्याच्या बाबतीत काही ठराविक नियमांचे पालन कधीही फायद्याचेच ठरते. पण ह्यामधील काही सवयींचा जर अतिरेक झाला तर तो मात्र आपल्याला नुकसानकारक ठरू शकतो.
सध्याच्या चालू परिस्थितीत कोरोनाबद्दल ऐकणं, वाचणं यामुळे अनेकांना मानसिक त्रासाला सामोरं जावं लागतंय.
विशेषत: अस्वस्थता आणि ओसीडी (ऑब्सेसिव्ह कंप्लसिव्ह डिसऑर्डर) आजार असणाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास होतो आहे. त्यामुळेच या ‘कोरोनाग्रस्त’ काळात तुमचं मानसिक आरोग्य कसं राखाल? याकडे लक्ष द्यावे.
मानसिक आरोग्यासाठी :-
• तुम्हाला अस्वस्थ वाटू लागेल किंवा तणाव वाटेल अशा बातम्या वाचणं, पाहणं टाळा.
• अनावश्यक व अतिरिक्त मोबाईलचा वापर टाळा.
• दररोज व्यायाम व योगा करा.
• दररोज प्राणायाम, मेडिटेशन करत जा. यामुळे आरोग्य उत्तम राहण्यासाठी मदत होईल.
• आठवड्यातून /महिन्यातून बाहेर फिरायला जायचे नियोजन करत जा. कुटुंबासोबत बाहेर फिरायला जा.
• तुमचा आवडता छंद जोपासा.
• आवडीचं संगीत ऐका.


