Skip to content

पुष्कळ माणसं सारखीच विनाकारण का चिडत असतात??

पुष्कळ माणसं सारखीच विनाकारण का चिडत असतात??


प्रदीप पांडुरंग पाटील

9822994262


राग का येतो ! कसा येतो ? काय होते आल्यावर ? कोणाकोणाला जाळतो ! क्रोधाची जपणूक का केली जाते ? काही कायदे आहेत का ! कीध येणारी व्यक्ती कोण ? काय स्वभाव असतो ? सात्त्विक राग आणि पुर्वदूषित राग असतो का !

 

असे असंख्य प्रश्न मला पडतात बऱ्याचदा अशी व्यक्ती मी ही असतोच ना !

 

राग येतो कारण आपण सोडुन सगळे कमी दर्जाचे लोक आहेत सगळ्याच बाबतीत असा गैरसमज असणे. आपल्यालाच खूप काही ज्ञान आहे, समज आहे हा अहंकार, खरोखरच लायकी नसलेल्या लोकांनी समाजाला फसवत राहायचे, खोट्या असलेल्या गोष्टीचा प्रचार होत राहणे, अवैज्ञानिक गोष्टींना बढावा देत राहाणे आणि समाजाला बदलायची जबाबदारी आपल्यावरच आहे, योग्य-अयोग्य डावं-उजवं फक्त आपणंच ठरवु शकतो आणि आपण ते केलेच पाहिजे या भ्रमापोटी राग येतो.

 

काहीवेळा काही प्रसंग, काही व्यक्ति हे मनात कुठेतरी खोल ठसा उमटवून गेलेले असतात कारण ते स्वभावतः फसवणूक करणारे असतात आणि आपल्याला त्याचा अनुभव असतो मग ज्या ज्या वेळी असे प्रसंग, अशा व्यक्ति संबाधित माहिती कानावर येणे अशाने पूर्वग्रह दूषित कोध उफाळून येतो,

 

माझ्या बाबतीत तर नेहमीच असे होते एखादा चेहरा एखाद्याची वागणूक ही मला प्रथम दर्शनी क्रोधाची छटा बहाल करते मग काय थोडे फार इंधन पडायचा अवकाश कि भडका होतो.

अनेकवेळा आतल्या आत काहीतरी ज्वालामुखी खदखदत राहातो. हेवा, मत्सर, सततचा अन्याय, अज्ञान ह्या गोष्टी जून आतल्या आत लाटा तयार बोतात ह्या क्रोधाचा लाटा एका लयीत किनाऱ्यावर येऊन धडकत राहतात फार छान वाटते जोपासायला पण मग हळूहळू करता करता एकदम एखादी मोठी लाट तयार होते कधी कधी लाटांवर लाटा येत राहतात आणि समोरच्याची वाताहात करतात आणि स्वतः ही मोडून पडतात. लाट ओसरली की सगळं साफ झालेलं दिसतं पण दुखावण्याच्या आणि काहीतरी मोडून पडल्याच्या खुणा कायम राहातात..

 

आणि मुख्य राहते ती लाट कुठपर्यंत उसळू शकते याची खुण, सगळे फटकुन राहतात किंवा वागतात काही जण तुटतात.

 

कधी कधी राग येणं ही गोष्ट फायद्याची ठरू शकते, लोक गैरफायदा घेत नाहीत,  एक घाव दोन तुकडे करता येतात.

 

क्रोध येणारी काही माणसं बुध्दीवान असतात काही नुसतेच डोक्यात राख घालून घेणारे असतात.

 

बुद्धीवान लोकांना येणारा राग हा सात्त्विक असू शकतो. बऱ्याचदा समाजातील वा व्यक्ति मधील अज्ञानाचा राग असतो; सिस्टिमवरील राग असतो, फसवणूकीचा राग असतो. बुद्धी नसून डोक्यात राख घालून घेणारे एकतर मुढ अज्ञानी किंवा अहंकारी असतात, असमंजस असतात.

त्यांना फक्त मालकी हक्क गाजवायचा असतो, अधिकार दाखवायचा असतो.

 

आपले ईप्सित साध्य होत नसेल की माणूस रागवायला लागतो. कधी कधी एकदम रागावतो तर कधी सगळं साचत जातं, आतल्या आत खदखदत राहाते आणि मग काहीतरी निमित्त होऊन उद्रेक होतो आणि मग समोरच्याला जाळून टाकतो कधी नातेसंबंध तुटतात माणसेही कायमची तुटतात, त्यांच्या मनात एक अढी बसते ते इतरांनाही सांगत सुटतात नाहक बदनामी होत असते, लोक दूर दूर रहायला लागतात.

 

राग येणारा बऱ्याचदा रागाचे समर्थन करतो पण हातातून बाण निघून गेलेला असतो आणि समोरचा जखमी झालेला असतो मग मात्र रागीट व्यक्ति पश्चाताप पावते मग ती खंत कायम रहाते,  शल्य कायम टोचत राहते.  आपण का चिडलो. बरं शब्द माघारी घेणे सोपे नसते म्हणजेच राग दोघांनाही जाळतो.

 

राग न येण्यासाठी स्थितप्रज्ञता कमावणे ही फार अवघड गोष्ट आहे.  अनेक अपमानाचे कढ पचवावे लागतात,  स्वतःला स्वतःकडे कमीपणा घ्यायची गरज असते. अर्थात हे सगळे परिस्थितीवर अवलंबून ठेवावे.  प्रश्न विचार करून आणि आपले कोणतेही नुकसान न होता सुटण्यासारखा असेल तर न रागावणे चांगले,  राग येण्याने आपल्याला त्रास संभवतो किंबहुना होतोच.

 

अस्वस्थता, धडधड, मानसिक असंतुलन, मोठ्याने ओरडून बोलल्याने स्वरयंत्रावर येणारा ताण,  सगळे अंग डोके गरम होऊन येणे, शरीरावयवांची थरथर, अधिकच राग, क्रोध वाढत गेल्यास अपशब्द वापरले जाणे, हात उगारला जाणे, म्हणून मग काम, क्रोध, मोह, मद, मत्सर अशीच रांग असावी.

 

माणसाला राग येण्यास त्याचे लहानपणापासून संगोपन कसे झाले आहे ह्या गोष्टींचाही वाटा असतो. ज्यांना लहानपणापासून हवे ते आणि आवश्यक आहे त्या आधी मिळत गेले,  घरातूनच त्यांच्या अहंकाराची जपणूक केली गेली, स्पर्धा ईर्ष्या यांचे बीज रोवले गेले आणि मुख्य म्हणजे सुरक्षेचे कवच ज्यांना मिळाले आहे त्याला राग लवकर यायची शक्यता जास्त असते.

 

‘ रिकामे पोते कधी ताठ उभे राहात नाही’. पोते नेहमी पैसा, ज्ञान, सत्ता, ताकत, गैरसमज, अज्ञान, अहंकाराने भरले तरंच ताठ उभे राहाते.

राग योग्य ठिकाणी,  योग्य वेळी, योग्य व्यक्तिवर, योग्य कारणासाठी,  योग्य तेवढाच व्यक्त करता आला पाहिजे ह्याला विचारांची परिपक्वता म्हणतात.  ही परिपक्वता सहजासहजी येत नाही,  त्यासाठी पाय जमिनीवरच असावे लागतात, मन आणि बुद्धीचा समतोल साधावा लागतो.

 

क्रोध आपल्याला उत्क्रांती मधून मिळालेली देणगी आहे.,  सहज अंतःप्रेरणा आहे पण सद्य काळात जीवसृष्टीत टिकून राहण्यासाठी आपल्याला आपला हा गुण उधळून लावता येत नाही.

 

एक प्राणी म्हणून मानव जगत होता तेव्हा इतर जंगली श्वापदांपासून वाचण्यासाठी आणि जगण्याचा स्पर्धेत तग धरण्यासाठी आवश्यक घटक अंतःप्रेरणा होती, ती अंतःप्रेरणा कारण नसताना उसळत असते कारण तग धरण्याची जी गरज होती, जीवनाची जी असुरक्षितता होती ,  ती मागे पडून जगण्यातील हेवेदावे, मत्सर,  अर्थिक उणीव, मान अपमानाचे कढ, अज्ञान ह्या गोष्टी अजूनही वाढत आहे, वास्तविक माणूस जेवढा प्रगतशील होत जाईल तेवढा क्रोध, राग, लोभ हे कमी होत जायला पाहिजे होते,  सुखसुविधा आणि त्यासाठी असलेली साधनसंपत्ती विपुल आहे, होत आहे.  ज्ञानाच्या कक्षा रुंदावत आहेआहे.  पण मग का?  का माणूस अधिक क्रोध, हिंसा बाळगू लागलाय ? म्हणजे जे ज्ञान शिकवले जाते त्यात गडबड आहे ? का शिकवण्याचा पद्धतीत काही चुकतंय ? का शिकणारे चुकीचे आहेत?

याचा अर्थ –

 

फक्त ज्ञान देणारे शिक्षण उपयोगाचे नाही . आदर, सहकार्य, सह अनुभूती शिकवणारं ज्ञान देणे आवश्यक आहे.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!