Skip to content

मानसिक आजार म्हणजे वेड लागणे, हा फार मोठा गैरसमज.

मानसिक आजार म्हणजे वेड लागणे, हा फार मोठा गैरसमज.


दर्शन दैवत


काय असतं मानसिक आरोग्य? मी तर म्हणेन आपल्या पूर्ण शरीराचा आत्मा म्हणजे मन आणि मनाचे आरोग्य म्हणजे मानसिक आरोग्य. जसं पोट दुखत डोकं दुखत तसं मनही दुखत, शारीरिक दुखणे हे दिसते, पटकन लक्षात येते. पण मानसिक दुखणे किंवा मानसिक आजार हे पटकन दिसून येत नाहीत किंवा लक्षातही येत नाहीत.

मानसिक आजार म्हणजे वेड लागणे असा फार मोठा गैरसमज आपल्या समाजात आहे आणि अश्या व्यक्तीला वेड्यांच्या इस्पितळात दाखल करणे हा एकच पर्याय आहे असे काही लोकांना वाटते. पण यातले बरेच आजार हे समुपदेशन (counselling) म्हणजेच माणसाला समजून घेऊन आणि त्याची समजूत काढून आपण बरे करू शकतो. आपण म्हणतो की कोणाचही मन दुखवू नये, देव हा जसा कणाकणात आहे तसा माणसात ही आहे जसं आपण कोणाला पाय लागला तर पाया पडतो, तर का ? कारण आपण मानतो की माणसात देव असतो. तसेच आपण कोणाचेही मन दुखवण्याआधी असाच विचार केला तर बरे होईल.

आपण कोणतीही गोष्ट रागात किती सहजपणे कोणालाही बोलून जातो पण आपण कधी याचा विचार करतो का? की त्याचा त्या व्यक्तीच्या मनावर काय परिणाम होतो.

प्रत्येकाच्या शरीराची रचना जशी वेगळी असते तशी प्रत्येकाच्या मनाची रचनाही वेगळी असते. काही लोक मनाने मऊ, शांत, हळवे, अशक्त, पटकन मनाला लावून घेणारे आणि स्वतःला त्रास करून घेणारे असतात. तर काही लोक हे मनाने खंबीर, रागीट, सशक्त असे असतात.

मानसिक आरोग्य हा जीवनाचा पाया आहे. एक वेळेस माणसाकडे काहीही नसले तरी चालेल पण त्याचे मानसिक आरोग्य चांगले असेल तर तो सर्व काही मिळवू शकतो. माणसाच्या मानसिक आरोग्याचा प्रभाव त्याच्या संपूर्ण जीवनावर पडत असतो.

मानसिक आरोग्य जर स्वस्थ नसेल तर त्याचा परिणाम आपल्या शारीरिक आरोग्यावर ही होतो. एक वेळेस शारीरिक आजार परवडला पण मानसिक आजार नकोत.

मानसिक आरोग्य चांगले आहे की नाही हे कसे ओळखायचे? जो माणूस हा शांत असतो इतरांसोबत जुळवून घेतो, कोणीही काहीही बोलले तर मनाला दुखावून घेत नाही, आणि कोणतेही संकट आले तर न डगमगता जो त्याला खंबीरपणे सामोरे जातो त्याचे मानसिक आरोग्य हे चांगले असते.

आपण आपले मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काय करू शकतो? जास्त विचार न करणे, काळजी न करणे, आपल्याला जी व्यक्ती समजून घेते तिच्याशी संवाद साधणे. योग्य वेळी सकस आहार घेणे, आपले आवडते छंद जोपासणे, स्वतःची आणि परिसराची स्वछता ठेवणे.

आज लोक मानसिक आरोग्याच्या बाबतीत जागरूक नसल्याचे दिसून येते, जसे आपण शारीरिक आरोग्य ठीक नसलेल्या माणसाला मदत करतो उदा.- अपंग लोकांना आपण मदत करतो. तसेच मनाने अपंग असलेल्यालाही मदत करायला हवी.

या आजच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनी आपण संकल्प करूया की, आपण एकमेकांचे मानसिक आरोग्य जपण्याचा प्रयत्न करूया आणि कोणाचे मानसिक आरोग्य ठीक नसेल तर त्याच्याशी संवाद साधून त्याची मदत करूया.



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

1 thought on “मानसिक आजार म्हणजे वेड लागणे, हा फार मोठा गैरसमज.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!