Skip to content

मानसिक आनंद आणि आरोग्य ही माझी जबाबदारी!!

मानसिक आनंद आणि आरोग्य ही माझी जबाबदारी!


डॉ. रुपाली नामदेव उढाणे

पुणे


जागतिक मानसिक आरोग्य संस्थेने दरवर्षी १० ऑक्टोबर हा १९९२ सालापासून मानसिक आरोग्य दिवस साजरा करण्यास सुरवात केली.

WHO नुसार मानसिक आरोग्य म्हणजे उत्तम आरोग्याची स्थिती, ज्यामध्ये एखाद्याला स्वतःची ताकद ओळखून, दररोजच्या आयुष्यातला तणाव सांभाळत, सोबत फायदेशीरपणे कामातील उत्पादकता वाढवत येते व समाजाला सार्थ महत्वपूर्ण योगदान, साहाय्य करता येणे. किंवा, मानसिक आरोग्य म्हणजे ज्ञान-आकलनविषयक, भावनिक व सामाजिक उत्तम समतोल असणारी आरोग्याची स्थिती व तुम्ही कसे विचार करता, समजून घेता, वागता यांवर मानसिक आरोग्य परिणाम करते आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर हे निर्णायक भूमिका बजावत असते.

सार्वजनिक आरोग्य विचारात घेताना बऱ्याच वेळा मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष होते. WHO नुसार जवळपास एक अब्ज लोकं मानसिक आजारात जगत आहेत तर जवळजवळ ८ लाख लोकं दरवर्षी आत्महत्येने मरत असून ४० सेकंदाला एक आत्महत्या नोंद होत आहे.

आत्महत्या तरुण वर्गात १५-२९ वय वर्षे मृत्यूचे दुसरे मुख्य कारण समजले जाते. लक्षावधी लोकांमध्ये उदासीनता व ताण -तणाव हे शारीरिक अक्षमतेचे प्रमुख कारण आहे आणि आता तर कोव्हीड-२०१९च्या जागतिक महामारीमुळे अनेक अब्जावधी लोकं मागच्या ९-१० महिन्यांपासून वेगवेगळ्या ताण-तणावाला सामोरी जात आहेत व त्यामुळे अनेक आव्हाने आज समोर उभी राहिली आहेत. अनेकांच्या मानसिक आरोग्यावर ह्याचा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष परिणाम होताना दिसत आहे.

विशेषकरून आज १० ऑक्टोबर २०२० रोजी आपले राहणीमान आधीच्या वर्षांच्या तुलनेने कमालीचे बदललेले आहे. आरोग्य/ वैद्यकीय व इतर जीवनावश्यक सेवा कर्मचारी यांना अवघड परिस्थितीत कार्य करणे, आजार घरी घेऊन जाऊ या भीतीने रोज कामावर जाणे अथवा जीव गमावला तर मागे कुटुंबाचे कसे होईल, अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

विद्यार्थाना घरूनच ऑनलाईन शिकणे अवघड जात आहे, डायरेक्ट शिक्षकांशी संपर्क साधणे कमी झाल्यामुळे निश्चितच ते स्वतःच्या भविष्याबद्दल चिंतीत होत आहेत. ज्या लोकांचे जॉब/नोकरी गेली आहे त्यांच्यापुढे आर्थिक समस्या, कुटुंबाची जबाबदारी असे अनेक प्रश्न पुढे उभे रहाताना दिसत आहेत. आजारांपासून अत्यंत मर्यादित संरक्षण व सोयी असणारे काळजी करताना दिसत आहेत. ज्यांना मानसिक आरोग्य समस्या आहेत त्यांना सामाजिक अलगीकरण (social isolation) पहिल्यापेक्षा जास्तच तीव्रपणे अनुभवावे लागत आहे.

स्वतःचे प्रिय माणूस गमावल्यानंतरचे दुःख कधीकधी अखेरचा निरोप घेताना प्रत्यक्षपणे व्यक्तही करता येत नाही त्यामुळे मनाची होणारी सततची हळहळ म्हणूनच ह्यावर्षी प्रत्येकाचे मानसिक आरोग्य संभाळणे व त्यासाठी आवश्यक ती काळजी व मानसिक-सामाजिक पाठिंबा देणे अत्यंत महत्वाचे व गरजेचे आहे.

“We are all like the bright moon, we still have our darker side.” म्हणजेच खलील जिब्रानच्या सांगण्यानुसार, आपण सगळे तेजस्वी चंद्रासारखे आहोत तरी आपल्याला आपली अंधारी बाजू आहे. प्रत्येक अंधाऱ्या रात्री नंतर, उजेडाचा दिवस असतोच तसेच आयुष्यात कितीही वाईट/अवघड काळ आला तरी स्वतःशी ठाम राहून मेंदूची सद्सद विवेकबुद्धी जागृत ठेवून परिस्थिती हाताळावी. जीवन जगताना आज जर कुठे चुकत असेल तर आवर्जून परिस्थितीनुसार बदलले पाहिजे.

स्वतःवरचा विश्वास कधीच गमवू नये. चुकीचे असो वा बरोबर स्वतःच्या निर्णयाचे योग्य समर्थन करता आला पाहिजे. घेतलेला निर्णय स्वतःसाठी व इतरांसाठी सकारात्मक फायदेशीर व आनंददायी असावा. एकतर्फी चुकीचे निर्णय घेऊन स्वतःवर व कुटुंबावर अनपेक्षितपणे दुःख व निराशा ओढवणारे असू नये.

प्रेरणादायी लेखकांचे लेख, विचारसरणी जरूर वाचावी. ऐतिहासिक गोष्टी वाचाव्यात ज्यांतून संघर्षाला सामोरे जाण्यासाठीचा मानसिक कणखरपणा तयार होतो. आपल्या मानसिक समस्या आपण कोणाशी बोलाव्यात, कोणाजवळ व्यक्त व्हावे हे समजणेही तितकंच महत्वाचं, ज्यांना आपल्या प्रोब्लेमविषयी गंध नाही अशा ठिकाणी व्यक्त न होणंच बरं.

आपलं मन जरूर व्यक्त करावं, व्यक्तच व्हावं वाटल तर सामाजिक समुपदेशन करणाऱ्या संस्था, मानसिक उपचार तंज्ञाजवळ आपल्या समस्यांविषयी व्यक्त व्हावं. चांगले आदर्श नियमांचे सतत पालन करून कृतीत आणणे नेहमीच मानसिक आरोग्यासाठी हितकारक ठरेल.

मानसिक आनंद व आरोग्य माझ्यासाठी, कुटुंबासाठी, देशासाठी व सर्वांसाठी ! हीच आजची खरी गरज – नव्याने सकारात्मक विचाराने जगण्याची !!!



Online Counseling साठी !

क्लिक करा



“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!

1 thought on “मानसिक आनंद आणि आरोग्य ही माझी जबाबदारी!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!