सुख कुठे आहे ? सुख कशात आहे ?
सौ. शमिका विवेक पाटील
सुख कुठे आहे ? ते कशात आहे ? त्याबद्दल आपल्या डोक्यात भ्रम आहे. नेहमी समोरचा सुखी आहे, हेच मानून आपण चालत असतो. एक छोटीशी गोष्ट तुम्हाला सांगू इच्छिते, आवडल्यास नक्की कमेंट मध्ये सांगा. बरोबर आहे की नाही .
एक राजा होता. आता राजा म्हटला की तो सुखीच असणार ना… एक दिवस त्याचा कानावर आले की जंगलात एका आदिवासीकडे सोन्याचे एक हरिण आहे. ही गोष्ट ऐकताच राजा ते हरिण मिळवण्यासाठी बैचेन झाला. राजाला वाटले की तो आदिवासी किती सुखी असेल ! त्याच्याकडील सोन्याचे हरिण मिळवण्यासाठी तो धडपड करू लागला. तहान भूक विसरून त्याने जंगलाकडे धाव घेतली, कपडे फाटले, शरीर धुळीने माखले तरीही झोपडीचा तपास सुरूच होता. बघतो तर झोपडीत कोणी नव्हते, तो आदिवासी राजाकडे गेला होता कारण त्याला चार दिवस काही खायला मिळाले नव्हते.
राजापाशी सुख होते पण सोन्याचे हरिण नव्हते, म्हणून तो आदिवासीकडे सुख मिळवण्यासाठी त्याच्या झोपडीत गेला. आणि इथे स्वतःपाशी हरिण आहे पण खायला काही नाही, राजापाशी सुख आहे, या समजुतीने आदिवासी सुख मिळवण्यासाठी राजाकडे गेला.
राजा आणि आदिवासी दोघेही भ्रमात भटकत होते. सोन्याचे हरिण मिळाले की मी सुखी होईन आणि राजा खुप सुखी आहे ही आदिवासीची धारणा होती. वस्तुतः दोघांना भ्रम आहे म्हणून दोघे सुखासाठी धावत होते.
अगदी असेच आपल्या जीवनात घडते. नोकरी करणाऱ्याला वाटते की उद्योगपती किती सुखी असेल ! आपल्याला तर रात्रंदिवस मजुरी करावी लागते. तर दुसरीकडे उद्योगपती, नोकरी करणाऱ्याकडे पाहून विचार करतो की संध्याकाळी सहा वाजता नोकरी करून सुटतो नी घरी जाऊन जेवून शांतपणे झोपतो. तो किती सुखी असेल ! दोघांनाही एकमेकांबद्दल भ्रम आहे आणि तो भ्रमच समोरच्याकडचे सुख मिळवण्यासाठी धावपळ करतो. परंतु सुख कुठे दडले आहे ? हेच आपल्याला ठाऊक नाही, एवढेच वाईट वाटते…
मनातून हा भ्रम काढून टाका की समोरचा आपल्यापेक्षा जास्त सुखी आहे. तरच तुम्हाला जीवन जगण्याचे खरे सुख अनुभवता येईल. आनंदी राहा, हसत रहा आणि नेहमी सुखात रहा हीच ईश्वर चरणी प्रार्थना.


