सकारात्मकता आणि नकारात्मकता…
सौ.प्रिया अडके-वसगडेकर.
एकाच या जन्मी जणू फिरुनी नवी जन्मेन मी ….
आयुष्यात देवाचे नामस्मरण, मोठ्यांचे आशीर्वाद ह्यासोबतच सर्वात महत्त्वाचा आहे तो आपला दृष्टिकोन . आणि या दृष्टिकोनाचे फक्त दोनच प्रकार असू शकतात सकारात्मक दृष्टिकोन आणि नकारात्मक दृष्टिकोन. तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक वळणाचा, प्रत्येक परीक्षेचा निकाल काय आहे ते फक्त आपला दृष्टिकोनच ठरवत असतं, तुम्ही जर चांगला आणि सकारात्मक विचार करत असाल तर तुमच्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक परीक्षेत यश फक्त तुमचं असेल.
ज्या गोष्टीचा आपण सतत विचार करत राहतो तीच गोष्ट आजूबाजूला घडत असते…“अगर किसी चीज़ को पुरे दिल से चाहो तो सारी कायनात उसे तुम से मिलाने में लग जाती है” असं म्हणताच ना तसंच असतं.. आपल्या डोक्यात कोणते विचार चालू आहेत? कोणत्या विचारांना आपण खतपाणी घालतो आहे? तेच आपल्या भोवताली घडत राहतं..
तुम्ही जर सतत सकारात्मक विचार करत असाल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टी चूका दिसणार नाहीत ,कोणत्याच व्यक्तीत दुर्गुण दिसणार नाहीत .एखाद्या व्यक्तीबद्दल तिरस्कार मनात ठेवला तर त्या व्यक्तीला त्रास होतो का ??नाही तर सारखा त्या व्यक्तीबद्दल करत असलेल्या तिरस्काराने तुम्ही तुमचा क्षण आनंदाने घालवू शकत नाही तेच जर घरातील एक व्यक्ती सकारात्मक विचारांची असेल तर पूर्ण घरातील वातावरण आल्हाददायक असतं आपल्यातील ऊर्जा ही आपण सोबत घेऊन वावरत असतो आणि ही ऊर्जा कळत-नकळतपणे आजूबाजूच्या वातावरणात मिसळत असते ….
एखाद्या मंदिरात गेल्यावर जस आपण वाईट विचारांच दप्तर बाहेर ठेवतो , तसंच तिथे असलेलं शांत वातावरण,तिथली सकारात्मकता, समोर मूर्तीत असणारे चैतन्य आपण बघितलं की एकदम उत्साही वाटतो स्वतःला … मग जर घरात देखील तसेच हसतमुख ,उत्साही वातावरण ठेवलं तर समोरच्या व्यक्तीला देखील तितकंच अल्हाददायक वाटेल .
“आपण बोलतो तसंच घडतं आपण विचार करतो तसंच होतं” आपल्या आसपास सुरू असलेल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टींचा नाश करून प्रत्येक गोष्टीत छान उत्साह आणि समाधान मिळण्याची गुरुकिल्ली फक्त आपल्याकडेच असते …. आपल्या आयुष्यात सुरू असलेल्या चांगल्या वाईट गोष्टींना काही अंशी आपला दृष्टिकोन जबाबदार असतो… प्रसन्न सात्विक चेहऱ्याच्या व्यक्तीकडे पाहिल तरी किती प्रसन्न वाटतं.
दैवी ऊर्जा मिळाल्यासारखं वाटतं त्या तेजाभोवती देखील एक वलय जाणवतं …. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर सुरु असलेल्या वाईट वेळेला काही घटनांमुळे व्यक्तींना माफ करायला शिकलो तर त्या चक्रव्यूहात आपण अडकून बसलो जाणार नाही .. ते चक्रव्यूह भेदून जेव्हा आपण पुढे येतो, तेव्हा ती वेळ चांगल्या अर्थाने बदललेली असते . कारण त्याच गोष्टीत अडकून न राहता त्या गोष्टीला माफ करून किंवा स्वतःची चूक असेल तर आपली चूक सुधारून पुढे चांगले काय करता येईल या विचारांमुळे तुमच्यातील आत्मिक बळ, वातावरणातील चांगली ऊर्जा सकारात्मक विचार ह्या गोष्टींनी तुम्ही तुमच्यातील ताकद शंभर पटीने वाढवून आलेलं संकट चुटकीसरशी नाहीस करू शकता.
कोणत्याही गोष्टीत टेक अँड गिव्ह हे सूत्र असतं …. मग ते प्रेम असो वाईट भावना असो अथवा तिरस्कार असो. तुम्ही जे देता तेच तुमच्या पदरात येत असतं .. आपण समोरच्या व्यक्ती साठी काहीच न करता त्या व्यक्तीकडून आपल्यासाठी चांगलेपणाची अपेक्षा करणं चुकीचं आहे … म्हणून प्रेम द्या प्रेम मिळेल, तिरस्कार दिला तर तिरस्कारच मिळेल .
कोणताही आजार बरा होण्यासाठी जितकं महत्त्वाचं औषध आणि उपचार आहेत तितकीच महत्त्वाच तुमची इच्छाशक्ती असते जी गोष्ट औषधाने बरी नाही होऊ शकत ती गोष्ट आपल्या इच्छाशक्तीने साध्य होते . मोठ्या आजारातून ,मोठ्या मोठ्या संकटातून बाहेर पडलेल्या व्यक्तींचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या व्यक्तीची असलेली सकारात्मक आणि प्रबळ इच्छाशक्ती आणि इथे आपण पन्नास टक्के यश मिळवलेलं असतं मग यासोबतच आपले प्रयत्न ,चिकाटी, आजूबाजूला आपल्याला साथ देणाऱ्या व्यक्तींची साथ, व्यक्तीचे परिश्रम ह्यामुळे आपली अवघड वाट सोपी होऊन जाते …..
समोरच्या व्यक्तीला विनामूल्य देण्यासारखी अमुल्य अशी देणगी म्हणजे आपले सकारात्मक विचार .. आपल्या ५मिनिट सकारात्मक बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीचे दुःख त्रास कमी होण्यास खूप मदत मिळते, त्यासोबतच त्याला आपलेपणाचा एक हक्काचा हात मिळतो….
तर आज पासून आपण नकारात्मकता काढून टाकून सकारात्मक दृष्टीकोनाचा वसा हाती घेऊन आपल्या आजूबाजूचं वातावरण प्रसन्न शांत समाधानी ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहूया … आणि शांततापूर्ण समाधानी आयुष्य जगू या ..


