एखाद्या स्त्री ला चारित्र्यहीन का ठरवलं जातं ??
सौ.सुधा पाटील
(8459730502)
वर्षानुवर्षे एक स्त्री पुरुष प्रधान संस्कृतीत दबली गेली आहे.आजही, ती सुधारत असली तरीही कित्येक गोष्टी तिला मागे खेचतात.तीचं मुक्त हासणं,बागडणं, ध्येयासाठी धडपडणं सारं सारं जणू एक गुन्हा आहे.आणि त्यातही ‘चारित्र्य’ हा शब्द जणू फक्त तिच्यासाठीच तयार झाला.मर्यादांच्या अंगणात फुलताना तिला सतत भीतीखाली जगावं लागतं.
जरा काही ती चुकली कि, लगेच समाज तिला चारित्र्याच्या तराजूत तोलू लागतो.पण चारित्र्य म्हणजे नेमकं काय?ते समाजातील प्रत्येक घटकाला लागू असतं का?याचा कोणीतरी विचार करतं का?एखादीला अगदी सहजच चारित्र्यहीन अशी उपाधी देऊन आपण मोकळे होतो.
पण चारित्र्य या शब्दात काय येतं.काय असावं याचा खरंच विचार होतो का? समाजात केवळ स्त्रियांनाच या शब्दाचा सामना का करावा लागतो?एखादी बाई एखाद्या पुरुषाला आपला मित्र मानत असेल किंवा तिचे विवाह बाह्य संबंध असतील तर लगेच तिला चारित्र्यहीन बनवून टाकलं जातं.पण तो पुरुष जो तिच्याशी संबंध ठेवतो त्याला कोणीच चारित्र्यहीन पुरुष असं म्हणत नाही.
खरं तर संस्कार नसणं, लोकांना फसवणं,लोकाना कमी लेखणं,एखाद्याला लुबाडणं,लाच खाणं,अश्लिल वर्तणूक करणं असे वर्तन असणाऱ्या साऱ्यांना चारित्र्यहीन या वर्गात मोडावं.पण तसं होताना दिसत नाही.
खरं तर कुकर्म करणारे सारेच चारित्र्यहीन असतात.पण समाजात हा शब्द सर्रास केवळ स्त्रीसाठी वापरला जातो.जरा कुठे एखादी स्त्री अन्यायाचा सामना करू लागली, मनासारखं जगू लागली, मुक्त विचार मांडू लागली,पुरुषांशी मोकळेपणाने बोलू लागली की, लगेच तिला “चारित्र्यहीन” असं लेबल लावलं जातं.
पण का? प्रेमात पडलेली मुलगी असेल किंवा आधार, प्रेम शोधणारी एखादी महिला असेल तर त्यांना लगेच दोषी ठरवून शिक्का मोर्तब केलं जातं.पण समाज विसरतो की,ज्याच्या प्रेमात ती पडते तो एक पुरुष असतो.आणि स्त्री आणि पुरुष यांच्यातील सहजीवनास मान्यता निसर्गाने दिली आहे.
पण जेव्हा हे सहजीवन समाजमान्य चाकोरीत नसते तेव्हा अशी लेबलं लावली जातात.पण हे लेबलं दोघांनाही असतं.पण बळी जातो ते महिलांचा.पण का?
खुपदा असं दिसतं की, प्रेमात पडणाऱ्या मुलींना आपण वाईट चालीची असं खुशाल म्हणतो.पण एखादा मुलगा अनेक मुलींना फसवतो किंवा तो प्रेमात पडतो तेव्हा तो वाईट चालीचा नसतो का?
एकीकडे प्रेम म्हणजे ईश्र्वराचे रुप म्हणायचं आणि दुसरीकडे ते जोपासू पाहणाऱ्यांवर शिंतोडे उडवायचे.हा कुठला न्याय? प्रेमात पडायला मुलगी लागते पण नियम मात्र फक्त तिलाच लागू.वर्षानुवर्षे एक स्त्री या चारित्र्य नावाच्या चक्कीत पिसली जाते तरीही या समाजाला काहीच वाटू नये?
स्त्री कधीच एकटी चारित्र्यहीन नसते.तिला तसं बनवणारा पुरुष,हा समाज तोही त्यात सामील असतोच की.पण तरीही एक चारित्र्यहीन पुरुष, चारित्र्यहीन समाज असं कोणी म्हणताना दिसतं नाही.पण एक स्त्री मात्र साऱ्यांना दिसते.जणू सर्व जगचं तीच्या वर्तनावर देखरेख करीत असतं.अरे पण ,ती देखील माणूस आहे.या समाजाचा तितकाच महत्त्वाचा घटक आहे.हे आपण का विसरतो? खरं तर स्त्री आणि पुरुष यांच्यामुळेच ही पृथ्वी आहे.
पण तरीही, सारं उमजूनही आजही एक स्त्री माणूस म्हणून जगताना दिसत नाही……….
खरं तर “चारित्र्य” या संस्कारात केवळ स्त्री आणि पुरुष यांचे समाज अमान्य नातंच येत नाही.माणुसकीशी संबंधित सारी नीतीमूल्ये यात येतात.पण तरीही केवळ एकाच गोष्टीवरून एखाद्या स्त्रीला चारित्र्यहीन का ठरवलं जातं?
एखादी वेश्या पोटासाठी किंवा तिच्यावर ओढावलेल्या परिस्थितीमुळे ती ते काम करत असेल.पण तिच्यातही माणुसकी असते.ती ते काम करते म्हणून ती चारित्र्यहीन असू शकतं नाही.उलट ती पुरुषी कामवासना शमवून समाजाचं संरक्षण करीत असते.
म्हणूनच एकाच दृष्टीकोनातून एखाद्या स्त्रीला चारित्र्यहीन ठरवू नये.एका स्त्रीला चारित्र्यहीन ठरवताना तो समाजही तितकाच दोषी असतो.मुळात मला चारित्र्यहीन ही संकल्पनाच पटत नाही.कारण या समाजातील सर्वच माणसं ही थोड्याफार प्रमाणात दुर्गुण असणारी असतातच.सर्वगुणसंपन्न असा कोणीच नसतो…….


