रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त टिप्स.
डॉ.रूपाली उढाणे
पुणे.
रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असेल तर कोणत्याही जंतुसंसर्गाशी प्रतिकार करणे मनुष्यास सहज शक्य होते. आजारातून लवकर बरे होता येते. लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते. जुनाट आजार , डायबेटीस, दमा व हृदयरोग मध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली असते.
जाणून घेऊ ,रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे घटक –
१. आहार – नियमित, संतुलित आहाराला महत्व आहेच पण वेळेवर शांत प्रसन्न चित्ताने जेवणेही तेव्हढेच महत्त्वाचे आहे. नित्य जेवणात वेगवेगळ्या ताज्या रंगीत भाज्या नि फळांचा, ड्राय फ्रुटस, व्हिटॅमिन सी युक्त लिंबू, आवळा, संत्री व पेरूचा समावेश असावा. प्राचीन भारतीय मसाले हळद, लवंग, वेलची, अद्रक, काळे मिरे, कोथिंबीर ,गवती चहा, बडीशेप व तुळशी पत्राचा वापर करावा. प्रत्येक जेवणात १-२वाटी डाळ, मोडाची कडधान्ये, पनीर, दही, ताक अशा प्रथिनांचा समावेश असावा. तेलकट, मैदा बेसनाचे पदार्थ फास्टफूड टाळलेलेच बरे.
२. व्यायाम – नित्य ३०-४० मिनिटे शारीरिक हालचालही गरजेची. चालणे, धावणे, सायकलिंग व दोरीवर उडी मारणे यामुळे रक्ताभिसरण वाढून रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.
३. झोप – रोजची ८ तास शांत झोप शरीराला नि मनाला फ्रेश, ताजेतवाने करते व कामात उत्साह वाढवून रोगप्रतिकारक शक्तीही वाढवते.
४. ताण – वाढता ताणतणाव, पूर्णपणे व्यस्त शेड्युल रोगप्रतिकारक शक्ती कमी करते म्हणून शांत आराम, चिंतन, ध्यानधारणा करावी. आनंदी असणे, हसणे अथवा एखादी कला जोपासनेही तणावमुक्त करते.
५. हायड्रेशन – दिवसभरात ८-१० ग्लास पाणी पिणे. डाळ, सूप, ताकाचा समावेश असला तरी चालेल. गोडपेय शक्यतो टाळावी.
६. स्वच्छता – मूलभूत स्वच्छतेच्या सवयीचा नियमित वापर करावा. नेहमी जेवणापूर्वी हात काळजीपूर्वक स्वच्छ करा. नेहमी सर्दी, खोकताना रुमाल, टिशू वा मास्कचा वापर करा. अस्वच्छ हाताने डोळे, नाक व चेहरा स्पर्श करणे नेहमी टाळावे. दात, केस व नखे स्वच्छ असावी.
७. योग्य मानवी वर्तन – स्वतःसाठी व समाजातील इतर लोकांच्या हिताचे योग्य असे वर्तन नित्य जोपासावे. रोजच प्रतिबंधात्मक आदर्श प्रणालीचा अवलंब करावा.
८. आरोग्यदायक जीवनशैलीचा स्वीकार करणे.
९. वजन नियंत्रित ठेवावे, लठ्ठपणा अथवा सडपातळ असणे टाळावे.
१०. निसर्गाची स्वच्छता राखणे. प्रदूषण रोखणे. झाडे लावणे.
११. धूम्रपान, तंबाखू , सिगारेट सवयी सोडून देणे.

