घटस्फोट….
गणेश न.चरपे
घटस्फोटाचे पेपर टेबलवर ठेऊन प्रकाश ऑफिसला निघाला. जातांना रमाला तो सांगून गेला की, “मी ऑफिस वरून येईस्तोवर या पेपरवर सह्या करून ठेव.” रमाने मान हलविली आणि कामाला लागली.
दुपारच्या लंचला मेघा त्याच्या सोबत होती. त्याने तिला सांगितले की, “आज घटस्फोटाच्या पेपरवर रमाच्या सह्या होतील. उद्यालाच ते पेपर वकिलांमार्फत कोर्टाला सादर करतो. एकदा का कायदेशीर घटस्फोट झाला कि मग आपण…., ” असं म्हणत त्याने तिला जवळ ओढले. तिने त्याला चिमटा काढला तसा तो बाजूला सरकला. मेघा त्याचा हात हातात घेत म्हणाली.., “माझ्या राज्या तुझ्याविना जगणे मुश्किल झाले रे… हा विरह आता सहन होत नाही.” त्यावर तो हसत मिश्कीलपणे म्हणाला, “अजुन काही दिवस… तसेही विरहाने प्रेम अधिक दृढ होत जातं… मग बरसवू ना प्रेमाच्या सरी एकमेकांवर अंदाधुंद… आपल्या त्या मिलनाची रात्र लवकरच येईल. चल आता निघू या,” म्हणत दोघेही ऑफिसकडे निघाले.
संध्याकाळी तो घरी पोचला तर घराला कुलूप होते. त्याने खिशातून दुसरी चावी काढली आणि दरवाजा उघडला. हातातील बॅग बाजूला ठेवत सोफ्यावर बसला. “कुठे गेली असेल हि या वेळी, आज खूप थकलो मस्त गरमागरम चहा मिळाला असता तर…” असे मनाशी पुटपुटला. तितक्यात त्याचे लक्ष टेबलवरील पेपरकडे गेले. तो पटकन उठला आणि त्याने टेबलवरील पेपर बघितले तर त्या पेपरवर रमाने सह्या केलेल्या होत्या.
ते पेपर पाहत असतांनाच त्याचे लक्ष पेपरच्या खाली ठेवलेल्या कागदावर गेले. हा कसला कागद म्हणत त्याने तो कागद वाचायला घेतला. त्यावर लिहले होते. “तुमच्या म्हणण्यावरून मी घटस्फोटाच्या पेपरवर सह्या केलेल्या आहे, खात्री करून घ्या…. आणि हो, हे कागद तुम्हाला कोर्टातून घटस्फोट मिळवून देईल तेव्हा देईल, परंतु या क्षणापासून मी माझ्या अंतर्मनातून तुम्हाला घटस्फोट देत आहे… आणि तुमचे घर सोडून कायमची जात आहे. कळत नकळत माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर मी क्षमा मागते.”
त्याने तो कागद घडी करून खिशात ठेवला आणि मोबाईल काढून मेघाला कॉल केला. “हॅलो मेघा… आनंदाची बातमी आहे.” “हं बोल ना..” मेघा म्हणाली. “अगं रमाने घटस्फोटाच्या पेपरवर सह्या तर केल्याच परंतु ती आजच तिच्या बाबांकडे कायमची निघून गेली आहे. आता तुझी जागा रिकामी झाली आहे, बोल केव्हा येऊ घ्यायला, आता येऊ का ?” “अरे अरे इतका उतावळे पणा बरा नव्हे.” त्यावर प्रकाश म्हणाला, “ते काही नाही तू तुझी बॅग भरून तयार राहा, मी पोचतो अर्ध्या तासात.” “ओके बाबा ठीक आहे. ये ..”
तिचा होकार मिळताच प्रकाशने फोन कट केला, बाहेर आला बाईक काढली आणि मेघाच्या घराकडे निघाला. मेघा त्याची वाटच पाहत होती. आतमध्ये जाताच त्याने तिला मिठीत घेतले…
“नेहा आज मी खूप आनंदी आहे, ज्या दिवसाची आपण इतक्या आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस इतक्या लवकर आपल्या आयुष्यात येईल असे वाटले नव्हते. रमा इतक्या सहजतेने घटस्फोट देईल असेही वाटले नव्हते पण असो. चल लवकर.” नेहाने रूम लॉक केली आणि दोघेही निघाले…. आपल्या नवीन आयष्याची स्वप्ने रंगवायला.
(सहा महिन्यानंतर )
रमा कंपनीतून नुकतंच घरी आली होती. फ्रेश होऊन चहा घेत टीव्ही पाहत बसली होती. इतक्यात दारावरची बेल वाजली. रमाने दार उघडले तर दारात प्रकाश उभा होता. त्याच्याकडे बघून असे वाटत होते कि तो १ महिन्यांपासून आजारी असावा. खूप वीक वाटत होता तो. चेहराही काळवंडला होता. गालफडं बसली होती आणि डोळ्यांभोवती काळी वर्तुळे तयार झाली होती.
तिने त्याला आत बोलावले. तो आत येऊन सोफ्यावर बसला. रमा त्याच्यासाठी पाणी घेऊन आली. चहा वेगेरे आटोपला. आणि रमा त्याला म्हणाली, “तुम्हाला बाबांसोबत काम असेल तर बाबा सध्या घरी नाहीत.” त्यावर प्रकाश म्हणाला, “रमा मला तुझ्याशीच काम आहे.”
असं म्हणत प्रकाशने तिचे पाय पकडले आणि म्हणाला, “रमा मला माफ कर, प्लिज… मला माफ कर रमा, मी चुकलो, मी तुझा दोषी आहे.” त्यावर रमा म्हणाली, “हे काय नाटक लावलंय तुम्ही आधी तुम्ही इथून उठा आणि सोफ्यावर जाऊन बसा आणि तुम्हाला काय जे बोलायचे ते लांबूनच माझ्याशी बोला…”
प्रकाश रमाच्या पायाशी हात जोडून झुकला होता. त्याच्या डोळ्यांत आसवं दाटली होती पश्चातापाची. प्रकाश उठून सोफ्यावर बसला, डोळ्यातली आसवं रुमालाने टिपली आणि बोलू लागला, “रमा तू घर सोडून गेली आणि माझ्या आयुष्याची घरघर सुरु झाली. तू गेली त्याच दिवशी मी मेघाला घेऊन घरी आलो.
घटस्फोट झाला नसल्याने आम्ही लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहू लागलो. सुरुवातीचे काही दिवस मजेत गेलीत. छान बाहेर फिरायला जाणे, मौजमजा करणे, बाहेरच जेवण करणे. अगदी मजेत गेले सुरुवातीचे ते दिवस. परंतु रोज रोज बाहेर जेवण्याचा मग मला कंटाळा आला. घरच्या जेवणाची चव काही वेगळीच असते. त्यामुळे मी मेघाला म्हटले कि,
“आता तू घरीच स्वयंपाक करीत जा. आता मला कंटाळा आलाय आणि सतत बाहेरच्या जेवणाने आपली प्रकृती पण बिघडू शकते.” त्यावर ती म्हणाली कि, “मला जेवण बनविणे जमत नाही. आपण स्वयंपाक आणि घरकामाकरिता करिता एक बाई ठेऊ या.” ठीक आहे, मी होकार दिला. आणि आमचे रोजचे रुटीन सुरु झाले. मेघा दररोज उशिरा उठायची. परंतु मला सकाळलाच चहा हवा असतो, तुला हि माहिती आहे. मग मी स्वतःच चहा बनवायला लागलो माझाही आणि तिचाही. ऑफिस वेळेपर्यंत तिचेच होत नव्हते मग ती घर काय सावरणार. कामावरील बाई करीत होती.
पण…. आधीसारखे घरात करमत नव्हते. तू जसं घराला नीटनेटकं ठेवलं होतं. तो नीटनेटकेपणा मला दिसत नव्हता. घराला घरपण उरलं नव्हतं. मी मेघाशी या विषयावर बोललो तर ती म्हणाली, “हे बघ मी एक वर्किंग वूमन आहे. मी हि ऑफिस मध्ये तुझ्या इतकंच काम करते. तुझ्याइतकीच मी पण कमावते. आणि हे स्वयंपाक, घरकाम हे मला जमत नाही आणि असल्या कामांमध्ये मला इंटरेस्ट पण नाही. सो…. तुला अड्जस्ट करावं लागेल. नाहीतर मग तू स्वतः करीत जा…”
काय बोलणार मी. स्तब्धच राहलो. घराची घडी पूर्णपणे विस्कटली होती. आमच्यातली भांडणं दिवसेंदिवस वाढू लागली आणि एक दिवस ती सुद्धा मला सोडून गेली. आज एक महिना झालाय. एकटाच कुढत जीवन जगत आहो. प्रत्येक क्षणाला तुझी आठवण येते.
आज मला कळाले कि आई मरतेवेळी फक्त तुझंच नाव का घेत होती ? “गुणांची ग सून माझी…” असं ती नेहमी म्हणायची.” पण मीच दुर्दैवी, देवाने तुझ्यासारखा हिरा माझ्या पदरी बांधला पण मी तुला ओळखू शकलो नाही. रमा मी तुझा अपराधी आहे. खूप धाडस करून आज मी इथे आलोय… रमा मी चुकलोय प्लिज मला माफ कर. मी तुला घ्यायला आलोय. नाही म्हणू नकोस.” असं म्हणत तो हुंदके देऊन रडू लागला.
शांत सुरात रमा त्याला म्हणाली, “तुम्ही आधी माझ्या एका प्रश्नाचे उत्तर द्या. तुम्ही ५ महिने त्या पर स्त्रीसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिलात. समजा तुमच्याप्रमाणे मी जर का एखाद्या पर पुरुषासोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहिले असते… तर तुम्ही माझा स्वीकार केला असता का ?” हे ऐकून प्रकाश तिच्याकडे बघतच राहिला.
ती बोलू लागली, “आपले अरेंज मैरिज झाले, तुमच्या आईवडिलांनी मला तुमच्यासाठी पसंत केले, परंतु तुम्हाला मी पसंत नव्हते, वडिलांपुढे बोलण्याची तुमची हिम्मत होत नव्हती म्हणून तुम्ही माझ्याशी लग्न केले, सुनेचा दर्जा तर मला मिळाला परंतु पत्नीचा दर्जा, ते सुख मला तुमच्याकडून कधीच मिळाले नाही. तुमच्या म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करणारी सून म्हणूनच मी त्या घरात वावरत होते.
आई वडील गेलेत आणि तुमची गरज संपली. तुमच्या आई वडिलांची निस्सीम सेवा केल्याचे फळ म्हणून तुम्ही घटस्फोटाचे पेपर माझ्यापुढे ठेवलेत. तुम्ही माझेसोबत नवऱ्याप्रमाणे कधीही व्यवहार केला नाही. मग तुमच्यासोबत राहून तरी काय उपयोग म्हणूनच मी घटस्फोटाच्या पेपर वर सह्या केल्या.
जिच्यासाठी तुम्ही मला सोडले आज तिने लाथाडल्यावर तुम्ही माझेजवळ आलात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा. मी विवश काल ही नव्हते आणि आजही नाही. फक्त प्रेमासाठी नमले होते, ते प्रेम मला तुमच्याकडून कधी मिळाले नाही. आणि आज ज्या प्रेमाची तुम्ही माझ्याकडून अपेक्षा ठेऊन आलात ते प्रेम या आयुष्यात परत कधीच तुम्हाला मिळणार नाही….”
सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन…
यापलीकडे रमाने काय करायला हवं होतं. एक वाचक म्हणून तुम्हांला काय वाटतं, खाली कमेंट करून जरूर कळवा.


रमाने योग्य निर्णय घेतला.
रमाने केले ते अगदी बरोबर केले. अगदी योग्य.
नक्कीच रमाने घेतलेला निर्णय योग्यच आहे. जर तीने प्रकाशला माफ करून त्याच्यासोबत राहण्याचा विचार केला असता तर प्रकाशला तीची कदर राहिली नसती.