आयुष्य खूप छोटं आहे !!आयुष्य खूप सुंदर आहे.!!
शिरीष जाधव
पुणे.
आपल्या आयुष्यात घडलेल्या घटनांची नोंद आपल्या मनपटलावर होत असते.मानवी मेंदूचे हे कार्यच असते.या नोंदी अगदी रेकार्ड रूममध्ये ठेवलेल्या पुस्तकांप्रमाणे तपशीलाची वर्गवारी करुन ठेवलेल्या असतात.
आपण या घडलेल्या घटनांबाबत बोलतो, लिहितो.यामध्ये आनंदी घटना असतात, आपल्याला झालेल्या त्रासदायक घटना असतात, आपण दुस-याची फिरकी कशी घेतली या घटना असतात, आपण दुस-याला केलेल्या मदतीच्या घटना असतात,आपण एखाद्या व्यक्तीला कसे अपमानकारक बोलून त्याचा वचपा काढला अशा गोष्टी असतात तर कधी कधी आपण आपली बढाई लोकांना सांगत असतो.
तर सांगायचं तात्पर्य आपण विविध घटना,गोष्टी या बाबत व्यक्त होत असतो.या व्यक्त होण्यात अनेक पैलू असतात.सकारात्मक, नकारात्मक, आनंददायक,उत्साहवर्धक,प्रेरणात्मक, दु:खदायक असे अनेक विचारांचे तरंग आपण व्यक्त होऊन निर्माण करत असतो.
हे करत असताना आपण कधी कधी आपल्या वेदनेला, आपल्याला झालेल्या त्रासाला निष्कारण कवटाळून बसतो.या कवटाळून बसलेल्या बाबी आपल्या मनातील वेदनांना आणखी रुंद करतात.त्यांची स्पष्टता जास्त ठळकपणे मनपटलावर नोंदली जाते.
तुम्ही या गोष्टी विसरून जा असं मी नाही म्हणनार कारण विसरणे ही बाब आपल्या मनावर झालेल्या आघाताच्या खोलीवर ठरत असते.पण आपण जेंव्हा वारंवार हा मुद्दा बोलतो ,सांगतो त्यावेळी मनात नोंदलेली त्याची ठळकता आणखी गडद, स्पष्ट होत जाते आणि ही घटना आपल्या वेदना, त्रास जास्त वाढण्याचे महत्वाचे कारण ठरते.
पण आपण जेंव्हा दुस-याच्या वेदना पहायला लागतो त्यावेळी आपल्याला आपला प्राब्लेम , आपली वेदना ब-याचवेळा शुल्लक वाटायला लागते. आपला प्राब्लेम तेवढाच असतो .तो कमी होत नाही पण त्याची मनाला टोचण्याची तीव्रता कमी होते.मग तुम्ही असे म्हणाल की घटना शेअर करूच नयेत. तर तसही नाही.
आपण आनंद असलेल्या घटना नेहमीच शेअर कराव्यात आणि आपला आनंद नेहमी व्यक्त करुन आणखी आनंदी व्हावं. पण आपल्या वाट्याला आलेली एखादी क्लेशकारक घटना तिचा मनातला सल कमी होईपर्यंत व्यक्त व्हावं आणि ती ब-यापैकी कमी झाली की मग बाजूला ठेवून द्यावी. तिची मनात नोंदलेली स्पष्टता जेवढी धुसर होत जाईल तेवढी होऊ द्यावी. दु:खाचे मूळ कमी व्हायला याने मदतच होईल.
काही व्यक्ती असा मुद्दा वारंवार समोर आणतात.मला तो असं का म्हणाला? माझ्याशी त्याने असे का वागावे? मी त्याचं काय घोड मारलं? त्याने असं वागायला नको होत असे अनेक विचार आपण करतो.
पण ज्याच्या कडून ही घटना घडते तो मात्र याच्याशी काहीही संबंध ठेवत नाही.आपल्याला बोलून किंवा त्रास देवून तो नामानिराळा झालेला असतो. तो बोलतो किंवा वागून ती घटना सोडून देतो. आपण मात्र या असल्या मुद्दयांभोवती आपल्या मनात विचारांचे जाळं विणत बसतो.
आयुष्य खूप छोटं आहे.त्यामुळे घडलेल्या घटना स्वीकारून त्या सोडून द्याव्यात. खरं तर आपल्या अपेक्षा याच आपल्या दु:खाचे मूळ कारण असतात. आपण वास्तवाचे भान ठेवून जगलो,ज्या गोष्टीत आनंद मिळतो त्या प्रयत्न करुन करायला शिकलो ,जे आहे ते स्वीकारले आणि दुस-यांच्या भावनांची जाणीव ,आदर ठेवून आनंद वाटायला लागलो की आनंद आपल्याकडे धावत येतो. नव्हे त्याला यावचं लागतं. चला आनंद वाटत जगायला शिकूया.आयुष्य आनंदी होईल. आयुष्य खूप छोटं आहे.आयुष्य सुंदर आहे.आयुष्य आनंदी करुया.!!!


खुपच छान सर मनातल्या गोष्टी जोपर्यंत आपण एकमेकांना सांगत नाही तोपर्यंत वेक्ती निराशा पासून आनंदाकडे जात नाही ??
Khup chan. Asach Jagayla shikla pahije. Tarach happy happy rahu.