नाती…..तुमची,आमची आणि आपली …..!!!
शिरीष जाधव
अहमदनगर
काल सहज चर्चेत विषय निघाला नातं म्हणजे काय असतं.?तसं पाहिलं तर प्रश्न खूप सोपा आहे आणि प्रश्न खूप अवघड देखील आहे.आपण जन्माला आल्यावर रक्ताचे नातेवाईक त्यांच्या सोबतच नातं म्हणजे रक्ताचं नात.आई, वडील, काका,मामा,मावशी, आत्या,मामी, चुलत भाऊ, मावस भाउ आणि असे बरेच जवळचे, मग थोडे लांबचे आणि मग दुरचे नातेवाईक. ही झाली रक्ताची नाती.
दुसरा प्रकार म्हटलं की अरक्ताची नाती.म्हणजे रक्ताचा संबंध नसताना वागताना, जगताना जोडलेली नाती.अगोदर परिचय होतो. हा अपघताने किंवा गरजेनुसार किंवा अनौपचारिक पणेही परिचय होतो.मग आपण परिचित माणसांच्या मनाची काळजी घेत अशी नाती आकार घेतात.याला शॆजारपणाची किंवा सोबत काम करण्याची किंवा गरजेनुसार मनाच्या नात्यातील किनार जोडलेली असते.मनाने मग कुणी कुणाला भाऊ समजून वागते,किंवा बहीण किंवा मुलगी या नात्याने नात्याचा प्रवास सुरू होतो.यामध्ये इतरही नाती जसे आई, वडील असेही समजून नात्याची वाटचाल सुरू असते.
कधी कधी मैत्री च नातं पणं खूप जवळच असू शकतं.नाती रोपली गेली की मग नात्यात कर्तव्य आकाराला येते.मग नकळत अपेक्षा, इच्छा मनात उभारी धरु लागतात. इथं च नात्यातील मनातल्या धाग्यांचा गुंता सुरु होतो.मला त्याचा फोन आला नाही, मला मेसेज आला नाही.मी तर त्याला मला बर्थडे विश केले होते पण त्याने मला विश केले नाही. मला तो हल्ली भेटतच नाही. मला वारंवार टाळले जाते या आणि अशा विचारांच्या पाली मनात चुकचुकतात.त्याने असे केले मग मी पण असेच करणार.
मनात अपेक्षा आली आणि ती पूर्ण झाली नाही की वेदना जन्म घेते.मग नातं हळूहळू उसवायला लागतं. नात्यातल्या दोन माणसापैकी एकाने तरी नातं जपायचा प्रयत्न करायचा असतो.नातं तोडताना आपण एवढे दिवस नातं का जपलं याचा विचार करायचा असतो.
नात्याची उभारणीच मुळी मनाच्या गरजेतून झालेली असते. हे कधीही विसरायचं नसतं तरच नातं शेवटपर्यंत टिकलं जातं.नाहीतर नातं भरकटत. मग फक्त बोलायचं म्हणून बोललं जातं.मनातल्या अनुबंधाची ओल संपली की नातं तोडता येत नाही म्हणून टिकवलं जातं.
श्वास नसलेल्या शरीरासारख नातं कधीही नसावं.म्हणून रक्ताची किंवा अरक्ताची सगळी नाती मनापासून जपावीत.समोरचा माणूस कुठं आणि किती चुकला हे सांगण जेवढे सोपे तेवढेच आपण कुठं चुकलो हे सांगणे अवघड. तसही आयुष्य कधी संपेल याचा काहीही नेम नाही.
कधी संपेल हे कुणालाही माहीत नाही. तरीही माणसं मनातल्या धरबंदाच्या कसोटीवर नातं का घासून पाहतात हा मला पडलेला प्रश्न ? पण एक मात्र अगदी खरं. आपल्यावर दु:खाचा डोंगर कोसळ्यावर मायेने ओल्या होणाऱ्या पापण्यांच्या साठी मनातल्या आशा अपेक्षांच्या चढउताराकडे न पाहता नातं काळजापर्यंत जपावे.
कारण एकदा का जवळची माणसं दुर गेली की मग ती परत कधीही जवळ येत नाहीत. मनात अंतर पडले की माणसं कितीही जवळ असली तरी जवळची राहात नाहीत म्हणून नाती जपा.ती मनाची गरज असते.
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
खुप छान