कालाय तस्मै नमः
डॉ. सोनाली गायकवाड
काय असतं, वेळे प्रमाणे संदर्भ बदलतात. काल हवीशी वाटणारी गोष्ट आज नको वाटते.
परवा एक मैत्रिण पॉसिटीव्ह शब्दाची आता भीती वाटते म्हणाली.
काल परवा पर्यंत ‘be positive’ किंवा मी फार पॉसिटीव्ह आहे असं सांगणारा माणसाला आज पॉसिटीव्ह शब्द नको झालाय. हाच तर काळाचा महिमा आहे.
म्हणून म्हणायचं कालाय तस्मै नमः.
काही वर्षांपूर्वी एक सरकारी जाहिरात यायची टेलिव्हिजनवर. शबाना आझमी एका मुलाला जवळ घेऊन म्हणायची, ‘छुनेसे बिमारी नहीं फैलती, छुनेसे तो प्यार बढता है |’ फार सुंदर कल्पना होती. हो होतीच म्हणावं लागेल न, कारण आता तर असं म्हणता येणं शक्यच नाही.
काळ आणि वेळ बदलली की परिभाषा बदलते. काल सुंदर वाटणाऱ्या मनाला आनंद देणाऱ्या गोष्टी कालानुरूप तशाच राहत नाहीत. लहानपणी खेळण्याच्या गाड्या, बाहुल्यांमध्ये रमणार मन मोठं होत जातं, आणि त्या गोष्टींचं महत्व आपल्यासाठी कमी होत जातं.
संदर्भ बदलतात. आजूबाजूची परिस्थिती आणि वातावरण हे बदल करत असतात.
बालवयात सगळ्या गोष्टींना निरागसतेचा गंध आणि उत्सुकतेची चव असते. हळू हळू निरागसतेची जागा आसक्ती घेऊ लागते आणि उत्सुकतेतुन मिळालेली उत्तरं, माणसाला हळू हळू सत्य आणि कल्पना ह्यातील अंतर करायला शिकवतात.
काळाच्या ह्या पडद्या मागे बऱ्याच गोष्टीची उकल होत जाते. गुंतवणूक आणि गुंतवणुकीतून आलेली आशा, निराशा, आयुष्याच्या गाठोडीत बांधत आपण वयाच्या पायऱ्या चढत जातो. सुरवातीला त्या पायऱ्या चढण्याची उर्मी मागे वळून पाहायला वेळ देत नाही एक एक पायरी पुढे जाऊन गड गाठायचा हे आणि हेच माहिती असतं.
एक एक पाडाव मागे टाकत पुढे जात असता विसाव्याची एखादी पायरी लागते. थांबून वळून एकदा किती वर आलोय हे ही मोजमाप करायला मन सरसावत. आणि मग लक्षात येत, किती उंची गाठली ह्या ही पेक्षा, गाठोडीत किती आशा, अपेक्षा आणि निराशा किंवा समाधान बांधून आणलंय हे जास्त मौल्यवान होऊन बसत.
आणि मग जरा पुढे पाहिलं की नजरेच्या टप्प्यात येऊ लागतं, ते उतरणीच वळण. ह्या वळणावर मग हवी वाटते ती सोबत.सुख दुःखात साथ करणारी सोबत. एकटेपणा माणसाला सगळ्यात नकोशी गोष्ट असते. पण आज घडीला कित्येकांच्या वाटयाला ती आलीय.
आज घडीला जी आपत्ती, विपदा आपल्यावर आलीय ती नकोशी झालीय. कधी एकदा ह्या सगळ्यातून आपण बाहेर येऊ असं झालंय. पण काही वर्षांनी आपणच ह्या संपूर्ण लढाईत आपण कसे धीराने वागलो, कशी कशी आणि काय काय काळजी घेतली ह्याचे किस्से सांगू. आज असणार संकट उद्या अनुभवाची शिदोरी होईल.
ह्यालाच मोठे होणे म्हणतात बहुदा. वय आणि वेळ ह्या सोबत, ह्या आयुष्याच्या शाळेत आपण जे धडे गिरवतो ते पक्के झाले की, का, कशाला असे प्रश्न कमी पडतात. आणि मन मग आहे त्याचा स्वीकार करायला लागतो.
स्वतःलाच सांगतो…’कालाय तस्मै नमः’
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!

