आपण काही विसरतोय का?
अनिल गोडबोले
समुपदेशक
माइंड हॉस्पिटल सोलापूर
“सर मला आलेले काही आठवतच नाही. बऱ्याच गोष्टी मी विसरूनच जातो”, माझ्या समोर असलेला तिशीमधला तरुण मला सांगत होता. मी विचारलं, “नेमकं काय विसरल्यासारखं वाटतं?” त्यावर तो म्हणाला, “मी परवा दिवशी अक्षरशः घरी जायचा रस्ता विसरून दुसरीकडे वळलो.” मी म्हणालो, “होतं असं कधी कधी.. त्यावरून आपण लगेच काही सांगू शकत नाही.” त्याच म्हणण अस होत की “आतापर्यंत बऱ्याच वेळा आईने सांगितलेली कामं..
जस की, लाईट बिल किंवा इतर काम संध्याकाळपर्यंत बऱ्याच वेळा विसरून जातो.” मी म्हणालो, “अजून काही दिवस यावर लक्ष ठेवा. थोडासा प्रयत्न करून लक्षात राहील, अशी काही ट्रिक करून बघा.. आणि जर सतत असं वाटत असेल तर त्याच्यावर त्यावरती पुढचं काहीतरी करू.” साधारणपणे या घटनेला आता दीड महिना उलटला आणि ती व्यक्ती पुन्हा माझ्याकडे आली व म्हणाली, “थोडा प्रयत्न केला आता थोडा विसरायच प्रमाण कमी झाले आहे.”
वृद्ध मानसोपचार व काळजी केंद्रात दाखल असलेल्या आजोबांना, मिलिटरीमधील दिवस आठवतात, त्यांना गावाकडचे घर आठवते.. सगळ्या गोष्टी आठवतात परंतु.. आपण आता कुठे आहोत ते आठवत नाही. काल काय जेवण होतं ते आठवत नाही. (खरं तर आपल्यालाही आठवणार नाही) शर्ट घातले आहे तरीपण मी पुन्हा शर्ट घालायला पाहिजे असं त्यांना वाटतं.” मी जेवलोच नाही” असे ते ठामपणे सांगतात पण साधारणपणे दहा मिनिटांपूर्वी आमच्या सिस्टरनी त्यांना जेवण दिल होतं. परवा तर त्यांनी स्वतःच्या मुलाला ओळखण्यास नकार दिला, त्यांनी विचारलं, “ कोण आहे हा?” त्यांची सून सांगत होती, “यांनी शर्ट फ्रीजमध्ये ठेवला होता, कुत्र्याला ठेवलेल्या प्लेटमधील भात खाल्ला.” असे भरपूर किस्से ऐकण्यात आले.
प्रत्येक माणूस थोड्या प्रमाणात का होईना “विसरभोळा” असतो. विसरभोळा.. या शब्दाला अशी आपल्याकडे एक गमतीची बाजू आहे. पण आपण दररोजच्या जीवनामध्ये आपल्या विस्मरणमुळे सतत अडथळे येत असतील तर, त्याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. हे सर्व आज सांगण्यामागचा हेतू असा की आज “जागतिक स्मृतीभ्रंश जनजागृती दिवस” आहे.
2012 पासून वर्ल्ड अल्झायमर असोशीयशन, सप्टेंबर महिना स्मृतिभ्रंश जनजागृती महिना म्हणून साजरा करते. त्यामध्ये 21 सप्टेंबर हा दिवस, “जागतिक स्मृतिभ्रंश जनजागृती दिवस” म्हणून पाळला जातो. या मागचा हेतू एवढाच आहे की, स्मृतिभ्रंश मोठ्या प्रमाणावर ती वाढत चाललेला आहे. तरुणांमध्ये, वृद्धांमध्ये ह्याचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार वृद्धांमध्ये हे प्रमाण “तीन वृद्धामागे एकाला विस्मरण किवा स्मृतिभ्रंश असण्याची शक्यता आहे. तरुणांमध्ये याचे वाढते प्रमाण हे अत्यंत काळजी करण्यासारखे आहे. मेंदूमध्ये काही जैवरासायनिक बदल होतात आणि स्मृतिभ्रंश होतो आणि वयोवृद्ध व्यक्तीमध्ये साठीनंतर मेंदूतील कार्य कमी झाल्यामुळे किंवा स्मृति केंद्रातील पेशी काम कमी केल्यास स्मृतिभ्रंश होतो.
स्मृतिभ्रंश कशामुळे होतो?
आपण विसरतो ही तर खरी आपल्याला मिळालेली देणगीच आहे, आपण विसरू शकलो नसतो तर कितीतरी दु:खद आठवणी आपल्याला त्रास देत बसल्या असत्या. परंतु कुठल्याही गोष्टीचे प्रमाण असतं व प्रमाणाबाहेर सगळ्या गोष्टी चालल्या तर त्यामध्ये गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असते. साधारणपणे आपली जीवनशैली याला जबाबदार आहे. ताणतणाव एवढे वाढले आहेत की मग मेंदूतील पेशी दमून जातात आणि तात्पुरत्या प्रमाणावर स्मृतिभ्रंश होऊ शकतो. कमी वेळामध्ये जास्त गोष्टी मिळवण्याच्या नादात आजची तरुण पिढी मेंदू वरती अनावश्यक ताण देत आहे आणि मेंदूतील पेशींना त्यांचे कार्य बंद करायला भाग पाडत आहे. काहीवेळेला अपघाताने मेंदूमधील पेशीना इजा झाल्यास स्मृतिभ्रंश होतो. पण “गजनी” या पिक्चर मध्ये पहिले आहे की “मेमरी लॉस” हा अपघाताने होतो. “शॉर्टटर्म मेमरी लॉस” आणि “लॉन्ग टर्म मेमरी लॉस” असे दोन प्रकार असतात. आयुष्यातील काही घटना कायमस्वरूपी आपल्याला आठवत असतात कितीही वर्ष झाली तरी.. त्या सर्व जुन्या स्मृति असतात. तसेच दैनंदिन कामासाठी लागणाऱ्या सर्व स्मृति या “शॉर्टटर्म” असतात.
तरुणांमध्ये असलेलया स्मृतिभ्रंश ला “डिमेनशिया” असे म्हणतात व वयोवृद्ध लोकांमध्ये त्याला “अल्झायमर” असे म्हणतात.
स्मृतीभ्रंश कसा ओळखावा?
एखादी गोष्ट एखादी व्यक्ती सतत विसरत असेल व त्या विसरल्यामुळे दैनंदिन जीवनावर परिणाम होत असेल किवा सर्वसामान्य सामाजिक वर्तन अपेक्षित आहे ते होत नसेल तर (कोणत्या ठिकाणी काय बोलायला पाहिजे, काय वागायला पाहिजे हे न कळणे, )जबाबदाऱ्या पार पाडत असताना कर्तव्यामध्ये न आठवल्यामुळे अडथळे येत असतील किंवा आपण सतत विसरण्याची तक्रार करत असू तर आपल्याला “डिमेन्शिया” असण्याची शक्यता जास्त आहे.
स्मृतिभ्रंश असल्यास काय करावे?
या सर्व आजारांना वेळीच उपचार करता येतो त्यासाठी समुपदेशन किंवा मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेणे इष्ट आहे हेवा याचे प्रमाण वाढायच्या आत आपण स्वतःला अभ्यासून घेतले पाहिजे.
योगा, प्रणायमाचा यावर चांगला परिणाम होतो. व्यायाम करणे हे अत्यंत गरजेचे असून त्यामुळे विस्मरणाचा धोका कमी होतो. आपला आहार सकस असला पाहिजे. व्यसन असल्यास बंद केले पाहिजे. नियमित शिथिलकरणाची (relaxation) सवय लावली पाहिजे.
मानसोपचार तज्ञाची मदत व समुपदेशन य याचा खूप चांगला परिणाम होतो. वृद्ध व्यक्तीना मात्र कधी कधी वृद्ध काळजी व पुनर्वसन केंद्राची गरज पडू शकते. आनंदी राहणे, समाधानी राहणे व तणावपूर्ण जीवनशैलीतून स्वतसाठी वेळ काढणे अत्यंत गरजेचे आहे..
Online Counseling साठी !
रोजचे नवीन लेख वाचण्यासाठी किंवा रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या Whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
ज्यांची मुले ५ वीच्या पुढे शिकत आहेत, त्या सर्व पालकांनी रोजच्या अपडेटसाठी खाली दिलेल्या whatsapp आणि Telegram वर क्लिक करा!
“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया!”

